आधार/ स्वमदतगट
‘Longest journey start with single step’
अनेक समाजहिताच्या संस्था स्वमदगट यांचे बीज वैयक्तिक व कौटुंबिक स्तरावरच पेरले जाते.आणि हळूहळू त्यामध्ये समदु:खी,समविचारी व्यक्ती एकत्र येतात.संस्था मोठी होत जाते.पार्किन्सन्स मित्रमंडळ या स्वमदत गटाची सुरुवातही अशीच वैयक्तिक प्रयत्नातून झाली.इथ आधी स्वमदतगट ही संकल्पना समजून घेऊ.
एकमेकाना भेटून अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि व त्यातून शिकण्याची इच्छा असणा-या समान समस्येनी ग्रस्त व्यक्तींचा गट असे ढोबळमानाने स्वमदत गटाबद्दल म्हणता येईल यात घटस्फोट,व्यसनाधीनता,सिंगल पॅरेन्ट अशा सामाजिक समस्या असतील किंवा कर्करोग,एपिलेप्सी पार्किन्सन असे शारीरिक आजार असतील. कोणत्याही शारीरिक आजारावर डॉक्टर उपचार करतात.पण रुग्णानीही काही धडपड केली पाहिजे.ही धडपड म्हणजे स्वमदत . २१ जून २००८ च्या साप्ताहिक सकाळच्या अंकात विविध स्वमदत गटांची माहिती आली होती.त्यात डॉक्टर उल्हास लुकतुके यांनी स्वमदतीबद्दल केलेले गमतीशीर विवेचन आहे. ‘आपल्याला दोरा हवा असतो.तो आपण रिळावर गुंडाळून ठेवतो.जेंव्हा पाहिजे तेंव्हा रिळातून पाहिजे तेवढाच दोरा घेतो.तो टाके घालण्यासाठी वापरतो.पण हाच दोरा मोकळा करून ठेवला तर त्याचा गुंता होईल. गुंता झाला तर तो आपल्याला सोडवत बसावा लागेल. म्हणजे त्या दोर्याची आपल्याला मदत होण्याऐवजी अडचणच होईल. ही अडचण होऊ द्यायची नसेल तर आपल्याला दोरा कसा बाळगावा. तो कसा वापरावा. रीळ म्हणजे काय? ते कसे वापरावे,शिवण म्हणजे काय ते कसे करावे,हे सगळे माहित पाहिजे.याचाच अर्थ दोर्याचा गुंता नको असेल तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. त्याचप्रमाणे मनाची एखादी अडचण नको असेल तर मनाचा स्वभाव,मनोव्यापार माहित पाहिजे. हे सर्व माहित करून घेणे म्हणजे स्वमदत’.
असे स्वमदतीच तंत्र समजलेले एकत्र येतात. स्वत:च्या समस्या,अनुभव यांची देवाण घेवाण करतात एकमेकाला आधार देतात. अस नियमितपणे भेटण्यातून स्वमदतगटाची निर्मिती होते.थोडक्यात काय तर’ आपले आपण उभे रहा,बोलून टाका,मोकळे व्हा,करून पहा येत चला,याच संयोजन करणारा गट म्हणजे स्वमदतगट’ डॉक्टर राजेंद्र बडवे यांच्या मते “स्वमदत गट ही जगभरात शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेली गोष्ट आहे. स्वमदत गटामुळे रुग्णांचे जीवनमान ( क्वालिटी ऑफ लाईफ) तर उंचावतेच.पण आयुष्यमानही वाढते.”
कॅन्सर माझा सांगाती या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अरविंद बावडेकर अशा गटाला.”कॉम्रेडशिप इन डीसट्रेस”(comradeship in distres) अस म्हणतात. अशा तर्हेने समस्याग्रस्तांप्रमाणे वैद्यकीय जगतातही स्वमदत गटाचे महत्व पटू लागले आहे.