गुरुवारी रात्री प्रज्ञा जोशीचा फोन आला. “काकु, मी डान्सच्या क्लासला पुन्हा जायला लागले आहे, बरं का! आणि उद्या ज्योत्स्ना भोळे सभागृहात आमचा कार्यक्रम आहे, त्याला तुम्ही नक्की यायचं आहे.” ते ऐकून मी तत्क्षणी ठरवले, की हो, ह्यावेळी आपण अगदी नक्की जायचेच. हृषीकेश नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी असणा-ऱ्या कार्यक्रमांबद्दल सांगत असतो आणि प्रज्ञाचा फोन येत असतो. होते असे, की खूप लांबच्या एखाद्या ठिकाणी कार्यक्रम असतो आणि जाणे जमत नाही. ह्यावेळी ज्योत्स्ना भोळे सभागृह म्हणजे तसे आम्हाला जवळ आणि वेळही संध्याकाळी साडेसहा-पावणे सात म्हणजे सोयीची होती. मला प्रज्ञाने ही देखिल माहिती दिली होती, की आमचा कार्यक्रम दुस-याच क्रमांकावर सादर होणार आहे, त्यामुळे नंतर तुम्हाला बसवले नाही, तर आमचा कार्यक्रम बघून तुम्ही जाऊ शकाल. तेही मला योग्य वाटले. प्रज्ञाला भेटण्याची मला खूप तळमळ लागली होती, आता ह्यानिमित्ताने तिला भेटता येणार होते.
प्रज्ञा जोशी म्हणजे आमच्या कार्यकारिणीची अतिशय उत्साही आणि आमची सर्वांची लाडकी कार्यकारिणी सदस्य. मंडळाचे असे एकही काम नाही, ज्याला तिचा हात लागला नाही. ती सगळीकडे सहभागी असते. ह्यात लहानमोठी सर्व कामे येतील. शुभार्थींना सभेचे फोन्स करणे, पत्रांवर पत्ते घालणे, नेहमीच्या मासिक सभेत सर्वांच्या सह्या घेणे, स्मरणिकेत लेख देणे, ११ एप्रिलला पार्किन्सन्स मेळाव्याच्या ईशस्तवनात गाणे, त्यातल्या विविध कामांची जबाबदारी घेणे, स्टेजवर उभी राहून आपले मनोगत व्यक्त करणे, तिथल्या प्रदर्शनात स्वत:ची कलाकृती मांडणे, देणग्या गोळा करणे, देणे समजाचे प्रदर्शनात स्वयंसेवक म्हणून पार्किन्सन्सच्या stole वर थांबणे. अशी तिच्या कामांची खूप मोठी यादी होईल. शिवाय सहल असो की सभा, सर्वांसाठी डबे भरभरून गुजराथी पदार्थ आणणे, सर्वांना घरी बोलावून आग्रहाने खाऊ घालणे, हाही तिचा एक आवडीचा छंद.
प्रज्ञाला लहान वयात पार्किन्सन्स झाला. पण औषधोपचार,मंडळातला सहभाग आणि डान्स क्लासमुळे ती त्यातून ब-यापैकी बाहेर आली. मध्यंतरीच्या काळात ती आजारी होती, दवाखान्यात होती,काहीदिवस ICU मध्ये होती. तिचा पार्किन्सन्स वाढला होता आणि मला सारखी तिला भेटायला जाण्याची इच्छा होत होती. पण तिच्या यजमानांना फोन केल्यावर ते म्हणायचे, की अहो तुम्हाला भेटल्यावर ती खूप भावनिक होते. त्यामुळे मी जावे की नाही, हा एक विचार होताच. शिवाय त्यांचे असेही म्हणणे असे, की तुम्ही दगदग करून येऊ नका, ती बरी झाली की मीच तुम्हाला तिला भेटवायला घेऊन येईन. प्रज्ञाचे घर चौथ्या मजल्यावर आहे, त्यामुळेही तिच्याकडे जाण्यात माझ्यावरची वैद्यकीय बंधने आड येत होती.
म्हणून मी इतरांना कुणाकुणाला अहो प्रज्ञाला भेटताय का, बघून येताय का, असे विचारायचे. आमच्यापैकी बरेचजण जाऊन प्रज्ञाला भेटून आले. कोणी सांगितले, ती अंथरुणावर पडून आहे, आम्ही गेल्यावर अजिबात उठली नाही. कोणी सांगितले, आम्ही तास दिड तास तिच्याकडे होतो, पण तिच्याच्याने बोलवतही नव्हते. तर कोणी सांगितले, की ती मिठी मारून खूप रडली. असे प्रत्येकाकडून ऐकून मला फार अस्वस्थता आली होती, की आता हिला कधी, कसे भेटावे. मग एकदा तिच्या यजमानांना तिला फोन करू ना, असे विचारूनच तिला मी फोन केला. त्यांनी होकार दिला आणि ऑन पिरीयड असेल तर ती बोलू शकेल असे सांगितले. त्यावेळी ती माझ्याशी नेहमीप्रमाणे भरभरून बोलली. एवढ्या सगळ्या घटनांमुळे ती नैराश्यात गेलेली होती. डान्स क्लास करू शकत नसल्याबद्दल तिला खूप हळहळ वाटत होती. मग मी तिच्याशी बराच वेळ बोलले. तिला सांगितले, की डोण्ट गिव्ह अप, तुझा ऑन पिरीयड तरी तुझ्याकडे आहे, त्यामध्ये हळूहळू तू हे सगळे करू शकशील वगैरे. असे सगळे बोलणे झाले, तरी आपले हे नुसते सांगणे निरर्थक आहे, ह्याची मला जाणीव होती.
अशातच पुन्हा एकदा तिच्याशी बोलले, तेव्हा तिने सांगितले, “काकु, मी आत्ता जिना उतरून खाली गेले होते. ह्यांच्याबरोबर गाडीवरून डॉक्टरांकडे जाऊन आले.” अशी थोडी थोडी प्रगती दिसत होती. त्यामुळेच आता तिचा डान्सच्या क्लासला जायला लागले असा फोन आल्यावर मला खूपच छान वाटले, जाणवले, की आता हिला जाऊन भेटलेच पाहिजे. आणि घरी भेटण्यापेक्षा असे भेटणे खूप चांगले होईल.
कार्यक्रमाला आम्ही थोडे लवकरच गेलो, जेणे करून आम्हाला नंतर लवकर उठून यायचे झाले तर ह्या मंडळींना आधीच भेटून घेता येईल. पण आम्ही इतके आधी पोहोचलो, की त्यांची स्टेजवर रंगीत तालिम सुरू होती. हृषीकेश, त्याच्या सहाय्यिका सगळ्यांची इकडूनतिकडून धावपळ चाललेली होती. आम्ही एरव्ही स्टेजवर कार्यक्रम पहातो, पण एक कार्यक्रम चांगला करण्यासाठी काय आटापिटा करावा लागतो, हे स्टेजवर दिसत होते. लाईटस्, स्टेज, पार्श्वसंगीत अशा कितीतरी गोष्टी सांभाळून पुन्हा आमच्या पार्किन्सन्सच्या पेशंट्सकडून ते करवून घ्यायचे, हे फारच कठीण काम.आठवड्यातून तीन वेळा अशी गेली सात आठ वर्षे हा माणूस आमच्या पेशंट्सना मोफत नृत्य शिकवत आहे. आता तर हृषीकेश सकाळी, संध्याकाळी अशा दोन बॅचेस घेतो.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी सर्वांना भेटले, शुभेच्छा देऊन आले. मी आले म्हणून प्रज्ञा खुश झाली होती. पहिला जो डान्सचा कार्यक्रम होता, तो तालिम म्हणून होता, त्यामध्ये कुस्ती आणि नृत्य असे एकत्रिकरण केलेले होते. हृषीकेशचे विविध प्रयोग चालू असतात. नंतर मग आमच्या पार्किन्सन्सच्या लोकांचा कार्यक्रम सुरू झाला.
पहिला भाग पहिल्या बॅचच्या ज्येष्ठ लोकांचा होता. हे सगळेच पेशंट्स ज्या दिमाखात स्टेजवर येत होते, वावरत होते, ते पाहून आम्ही सगळे अगदी भारावून गेलो. त्यानंतर दुसरी बॅच आली. ते तसे नवीन असले, तरी त्यांनी कट्टा नावाचा भाग बसवला होता. फिरायला बागेत जाणे वगैरे गोष्टी त्यात त्यांनी दाखवल्या. हे सगळे पहाता पहाता आम्ही रंगून गेलो. ही आमची सगळी मंडळी हे नृत्याचे सादरीकरण अतिशय उत्तम प्रकारे आणि खूर्चीशिवाय करत होती. ह्या निमित्ताने मला आवर्जून सांगावेसे वाटते, की पार्किन्सन्सच्या लोकांचे भावविहीन चेहरा असे जे वर्णन केले जाते ते बदलून टाकावे, असे ह्या सर्वांच्या चेह-यावरचे भाव होते. रंगीत तालिम पहाताना मला सारखे वाटत होते, की अरे हे लोक दमून जातील, अजून कार्यक्रम करायचा आहे, कसे होणार. पण ती भिती ह्या लोकांनी निरर्थक ठरवली. दोन्ही बॅचेस मिळून जवळजवळ अर्धा तास किंवा जास्तच तो कार्यक्रम चालला होता. दुस-या गृपच्या कार्यक्रमाच्या वेळी तर त्यांना खेळायला चेंडू दिलेले होते, हळूहळू ते चेंडू प्रेक्षकांमध्ये फेकणे सुरू झाले आणि प्रेक्षकांनाही कार्यक्रमात सामावून घेतले गेले. समोर प्रेक्षकांत असलेली लहान मुले तर ह्यामुळे खूपच खूश झाली आणि पटापट तीदेखिल ह्या चेंडू खेळण्यात सामिल झाली. स्टेजवरचे पेशंट्सही आनंदी होते. खरे म्हणजे त्यांना पेशंट्स म्हणणेच चुकीचे. मला आनंद ह्याचा वाटला, की आता ह्या लहान मुलांच्या डोळ्यासमोर पार्किन्सन्स म्हणजे ही नृत्य करणारी माणसे रहातील.
हे कार्यक्रम अनुभवताना आम्ही इतके रंगलो होतो, की आम्हाला निघायचे आहे, हे आम्ही पूर्ण विसरूनच गेलो. त्यानंतरचे तिसरे सादरीकरण हृषीकेशच्या प्रशिक्षित विद्यार्थिनींचे होते, त्याबद्दल तर जितके बोलावे तितके कमी, असा तो सुरेख अनुभव होता. मी जवळपास ट्रान्समधे गेले, इतका देखणा आणि सुंदर प्रयोग होता. मात्र दोन देखण्या प्रयोगांच्यामधे आमचे पार्किन्सन्सचे पेशंट्स कुठेही वेगळे वाटले नाहीत, तो सगळा पाठोपाठ वहाणारा एकसंध नृत्यप्रवाह वाटला. अर्थात त्यामागे हृषीकेशची इतक्या वर्षांची साधना आहेच.
कार्यक्रमाच्या शेवटी कर्टन कॉलसाठी त्यांनी सर्व लोकांना एकामागोमाग बोलावले. प्रथमपासून असलेले आमचे श्री. व्ही. बी. जोशी आणि पार्किन्सन्सचे डान्सर्स आधी आले, नंतर बाकीच्या कलाकारांना बोलावले. मी अजूनही भारावलेल्या मन:स्थितीत होते. हृषीकेशने त्यानंतर पार्किन्सन्स मित्रमंडळाबद्दल सांगून ‘इथे तीर्थळी काकु आलेल्या आहेत, त्यांनी स्टेजवर यावे’, असे पुकारले. माझे नाव कानावर पडल्यावर मी तशा दंग मनोवस्थेतच स्टेजवर गेले. तेथे एकदम प्रज्ञा मला बिलगली. मी माझी राहिलेलीच नव्हते, त्यामुळे मला काही बोलणे सूचत नव्हते. सुदैवाने माझी अवस्था जाणून प्रज्ञानेच मला हलवून, तंद्रीतून जागे करून हृषीकेशबद्दल बोलण्याचे सुचवले. त्याक्षणी जे थोडेफार मला सुचले, ते मी बोलले, जे आता खरोखरच मला आठवत नाही. पण खाली आल्यावर ह्यांचा अभिप्राय आला, की तुझे बोलणे तुझ्याजोगे झाले नाही. तुला ओळखणा-या लोकांना ते नक्कीच भावले नसेल. न ओळखणा-यांना ते तितकेसे जाणवणार नाही.
कार्यक्रम संपल्यानंतर सगळे कलाकार खाली आले, सर्वांना भेटले. त्यावेळी प्रज्ञाने पुन्हा आम्हाला आवर्जून आमच्याजवळ रहाणा-या श्री. वाघोलीकरांसोबत जाण्यास सांगितले. मी प्रज्ञाच्या ह्या उत्साही, सळसळत्या रुपाकडे पाहून थक्क झाले होते. आधी नाजूक अवस्थेत असलेली प्रज्ञा संध्याकाळी पाचपासून आता साडेआठ नऊपर्यंत ह्या कार्यक्रमात गर्क होते, तो संपेपर्यंत ताजीतवानी रहाते, भोवतालाचे भान राखते, माझी काळजी करते, हा तिच्यातला डान्स थेरपीमुळे झालेला अमुलाग्र बदल पहाणं, हा माझ्यासाठी नि:शब्द करणारा अनुभव होता. फार भारावलेले क्षण होते ते. मला नि:शब्द केलेले जे काही असे मोजके क्षण आहेत, त्यातला हा एक महत्त्वाचा.
हृषीकेश आणि त्याचा नृत्याचा कार्यक्रम ह्याबद्दल स्वतंत्रपणे लिहावे लागेल, पण आजचे माझे भारावलेपण होते ते प्रज्ञाला बघून. ती आजारपणातून पुन्हा यशस्वीपणे बाहेर येते, . डान्स क्लासला जायला सुरुवात करते.ही अत्यंत कौतुकाची, अभिनंदनीय बाब आहे.अनेक शुभार्थीच्या बाबत मी पाहिले ते अशा वेळी नैराश्यात जातात आणि त्यातून बाहेरच येत नाहीत.प्रज्ञाने मात्र जिद्दीने स्वत:ला मुळपदावर आणले.आणि स्टेजवर येऊन नृत्य करून दाखवले. इतरांसाठी हे प्रेरणादायी आहे.अर्थात तिला बरे करण्यात तिचे न्यूरॉलॉजिस्ट डॉक्टर राहुल कुलकर्णी,प्रज्ञाच्या मागे ठामपणे उभे राहणाऱ्या पती नलीन यांचे शारीरिक आजाराच्या पातळीवरचे महत्व मोठेच आहे पण मानसिक पातळीवर बाहेर येण्याचे सगळे श्रेय माझ्या मते हृषीकेशच्या नृत्योपाचाराला, त्याच्या प्रेमाला, ज्या मायेने तो आमच्या पेशंट्सकडून ह्या हृदयीचे त्या हृदयी घातले जावे अशा पद्धतीने नृत्य करून घेतो त्या पद्धतीला, प्रियेशा आणि तन्वी आणि इतर सहाय्यिकांना,तिला प्रोत्साहन देणाऱ्या सहकलाकाराना जाते. पेशंट्स त्याला अतिशय मानतात आणि त्यांचे आयुष्य आनंदी, सुसह्य करण्यात त्याचे हे फार मोठे योगदान आहे. आमच्या प्रज्ञाला मानसिक दृष्ट्या या आजारातून बाहेर काढून, छान बरे करून त्याने तिला नृत्याला उभे केले, ह्यासाठी त्याच्याबद्दलच्या भावना शब्दात व्यक्त करता येणार नाहीत.
शब्दांकन – सई कोडोलीकर