“वैनी अव वैनी “भांडी घासा घासता माझी कामवाली मावशी रखमा हिने मला हाका मारून माझं लक्ष वेधलं.
मी किचनमध्ये पोळ्या करीत होते.पोळ्या करताना मी तिला “काय गं काही हवंय का ” म्हणून विचारले त्यावर ती म्हणाली “अव येक इचारायचं व्हत “मग विचार की असं तिला मी म्हणाले “
रखमा अशिक्षित होती जेमतेम इ .२/ ३ री शिक्षण झाले होते गरजे पुरत लेखन वाचन येत होते.
ती मला म्हणाली “वैनी पोरं दत्तक घ्यायचं म्हंजी काय करायचे ?मी रखमा ला मुलगा ,मुलगी दत्तक कोण घेतात?कसे घेतात ?का घेतात ? मुलं कायदेशीर दत्तक घेण्या साठी ची सर्व माहिती सोप्या भाषेत सांगितली
माहिती ऐकून झाल्यावर रखमा मला म्हणाली “मुलांप्रमाणे आणखी काय काय दत्तक घेता येत ?मी तिला सांगितले समाजातील धनिक लोक, सामाजिक संस्था,,पर्यावरण प्रेमी, निसर्ग प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते लोक गावाचा,शाळांचा विकास होणे करिता गाव,शाळा दत्तक घेतात टेकड्या, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू,गड, किल्ले यांचे रक्षणा करिता काही जण ते दत्तक घेतात आणि त्यांचे संरक्षण करतात,विकास करतात, संवर्धन करतात.
हे ऐकून झाल्यावर रखमा मला म्हणाली “व्हय ओ वैनी तुम्ही यातलं काय दत्तक घेतले आहे ?
मी क्षणभर खूप गोंधळून गेले काय उत्तर द्यावे मला कळेना .मी म्हटलं ” मी यापैकी काही च दत्तक घेतले नाही पण काळजी मात्र दत्तक घेतली होती.
रखमा माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात म्हणाली “म्हंजी काय ? म्या नाही समजले .
अगं रखमा मी सुरवातीला खूप काळजी करीत रहायची.काळजी करण्यातच माझा दिवस सुरु व्हायचा आणि काळजी करण्यातच मावळायचा .
मी काळजी कधी दत्तक कधी घेतली ते मलाच समजलं नव्हतं प्रत्येक वेळी कोणत्याही प्रकारचा नवा विचार कानावर पडला की, काळजी तिचं अस्तित्व दाखवायची.
मला प्रिय असलेल्या,नसलेल्या, माझ्या सहवासात आलेल्या न आलेल्या अनेक लोकांच्या बाबतीतली काळजी मी आपल्यावर लादून घ्यायची . त्यामुळे मला दूसऱ्या चांगल्या गोष्टी सुचायच्या नाहीत सदानकदा मी आपली काळजीत असायची.
“वैनी तुम्ही कशाकशाची काळजी करायच्या ? सांगा ना मला ” रखमाने मला मध्येच विचारले “.
रखमा मला आता आठवलं तरी खूप हसू येतं मला माझ्या बुध्दी ची किव येते पण मला आठवतंय तेवढं सांगते .मग मी तिला सांगितले अगं किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी काळजी करायची सांगू.
कामवाली आली नाही की,शेजारची मुलं अभ्यास सोडून खेळू लागली की, रस्त्यावर भांडणं मारामारी झाली की,हे जरातरी ऑफिस मधून उशीरा आले,लाईट गेले की,पाणी गेले की, मुलं आजारी पडली की, नातलगांचे फोन आले नाही की,गावाकडची पत्र आली नाही ,कुणाची खुशाली कळली नाही वगैरेंची मी अफाट काळजी करायची.मला सगळे सतत रागवायचे आणि म्हणायचे ” साऱ्या विश्वाची काळजी घेण्याचा ठेका तू उचललास का ? सोडून दे सारखी चिंता करणं
मग खरच मी एके दिवशी विचार केला “एवढया सगळ्या गोष्टींची काळजी मी का करत असते ? काळजी करुनही होणाऱ्या घटना होतंच असतात.मग मी माझ्या आयुष्यातील कित्येक क्षण काळजी करण्यात का घालवत आहे.?ते काही नाही आज पासून अवाजवी काळजी करणं पूर्णत: बंद करायचं आनंदी राहायचे , आलेल्या क्षणांचा चांगल्या प्रकारे उपभोग घ्यायचा.ज्याने या विश्वाची निर्मिती केली ,ज्याने पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण केली तो आपली काळजी व्हायला समर्थ असताना आपण का काळजी करायची?असं म्हणतं मी ज्याप्रमाणे लोक अन्नदान करतात, रक्तदान करतात,भूदान करतात,स़ंपत्ती दान करतात तशी मी काळजी देवाला दान केली आणि खरं सांगते रखमा मी एकदम निर्धास्त झाले . रिलॅक्स झाले .आता मी खूप खूप आनंदी आहे.मी कोणत्याही प्रकारचा ताण घेत नाही.सतत काळजी केल्यानी डॉ.म्हणतात माणसाला रक्तदाब,ह्रदयविकार,मधूमेह या सारखे आजार होऊ शकतात तेव्हा पासून मी या विकारांपासून दूर राहायचे व निरोगी जीवन जगायचे ठरवले सांगायला आनंद वाटतो मला आता कोणत्याही व्याधी नाहीत . म्हणून मी आज तुझ्यापुढे ठणठणीत उभी आहे.
रखमा ने शांतपणे सगळं ऐकून घेतल्यावर कामे पूर्ण करून घरी जाताना मला म्हणाली “वैनी मी बी आता कशाकशाची काळजी करीत बसणार नाय आनंदाने कष्ट करून खाऊन पिऊन लेकरांसंग मस्त दिवस घालवणार “माझे हे ही दिवस लवकरच जातील.
पार्किन्सन्स मित्रमंडळ मधील सर्व मित्र,मैत्रिणींनो वरील लेख प्रपंच लिहिण्या मागचा माझा उद्देश तुम्हाला समजला असेलच .
पार्किन्सन्स झाल्याचे निदान ऐकल्यापासून शुभार्थी तर काळजी करतोच पण त्याच बरोबर घरातील सर्व सदस्य लहाना पासून थोरांपर्यंत सर्वजण या आजारा विषयी प्रचंड काळजी करु लागतात. काळजी करुन करुन सर्वजण बेजार होतात.
एक लक्षात ठेवा सर्वांनी काळजी करून हा आजार बरा होत नाही तर त्याचा आनंदाने स्वीकार करून आपण त्यावर मात करू शकतो.
पार्किन्सन्स आजार हार्टफेल सारखा जीवघेणा नाही,आपण त्यावर औषधोपचार करुन काही प्रमाणात मात करून गुणवत्तापूर्ण जीवन जगू शकतो.
मात्र त्यासाठी आपण डॉ.वर पूर्ण विश्वास ठेवून, नियमित सल्लामसलत करून औषधे आहार,व्यायाम मनोरंजन,याकडे लक्ष नियमितपणे दिले पाहिजे.
पार्किन्सन्स मलाच का झाला?यावर रामबाण औषध नाहीच का?आता मला हाय क्वालिटी लाईफ मिळणार नाही का ?अशा अनेक गोष्टी विषयक अजिबात विचार करायचा नाही.
या आजारा विषयी माहिती नसणारे अनेक लोक समाजात वावरताना आपल्याला फुकटचे सल्ले देतात ते काही वेळा काळजीपोटी देतात काही वेळा उगिचच देतात ते ऐकून ही आपण अधिक काळजीत पडतो.समोरच्याला वाईट नको वाटायला
म्हणून सगळं ऐकून घ्यायचं पण त्याच क्षणी ते सोडून पण द्यायचे असते्. आपल्या संतांनी म्हंटलय ना ” ऐकावे जनाचे पण करावे मनाचे ” ते काही उगिच नाही.
काळजी मुळे आपले मानसिक आरोग्य बिघडते नाना व्याधी जडतात म्हणून आपण आपल्या मनाला चांगल्या कृतीत गुंतवून ठेवायचे मग काळजी आपोआप आपल्यापासून दूर दूर निघून जाते.आपल्या आजूबाजूला फिरकत सुद्धा नाही.आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विविध प्रकारच्या घटनांची आपण काळजी करू नये असे जर शुभार्थी व शुभंकर यांना मनापासून वाटत असेल तर त्यांनी चांगले छंद जोपासले पाहिजेत.वाचन,लेखन,विणकाम,भरतकाम,चित्रकला,बैठेखेळ,मैदानी खेळ, शब्दकोडी, वगैरेंमध्यै स्वत:ला झोकून दिलं पाहिजे.मग काळजी आपल्या वाटेला जात नाही काळजी इतकी घाबरते की, आपल्या आजूबाजूला फिरकत सुद्धा नाही.शुभार्थी शुभंकर अनेकदा
कित्येक फालतू गोष्टींची काळजी करून जीवनातील मौल्यवान क्षण वाया घालवतात.
तेव्हा मित्रमैत्रिणींना विनंती पार्किन्सन्स झाला की,पहिली काळजी दूर फेकून द्या आनंदी रहा, पार्किन्सन्स ला सोबत घेऊन आपल्याला आनंदी जीवन जगायचे आहे हे पक्के लक्षात असू द्या.
एवढ्या तेवढ्या गोष्टींची काळजी करत बसाल तर आनंदाचे क्षण भुर्रकन उडून जातील
काही जण केअरटेकर जरा जरी उशीरा आला, फिजिओथेरपी स्ट नेहमीच्या वेळेत आला नाही, डॉ. नी त्वरित फोन उचलला नाही, थोड्या वेळासाठी लाईट गेले, कामवाली मावशी आली नाही अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी काळजी करीत रहातात.त्यामुळे मनावर ताण येतो म्हणून रिलॅक्स रहायचे,शांत रहायचे,होईल सगळं नीट होईल असं आपल्या मनाला बजावत रहायचं.आणि करता करविता तो परमेश्वर आहे तो सर्वांच भलं करील यावर विश्वास ठेवायचा.
तात्पर्य काळजी करायची नाही . आईजी, बाईजी, ताईजी, रावजी, कोणी असोजी
बिलकूल काळजी करायची नाही आणि काळजीचं नसत़ लचांड मागे लावून घ्यायचे नाही.
लेखिका
अंजली महाजन पुणे
०२/०५/२०२१
फार छान लिहिले आहे अंजलीताई!
अंजली, लेख छान झाला आहे.