साधारण माणसाच्या ६० वयाच्या आसपास सेवानिवृत्ती होत असते मुलाबाळांची लग्न कार्य उरकलेली असतात संसारात थोडा निवांत पणा आलेला असतो .पण काही वेळेला अनेकांना वयाच्या पन्नाशीत नाना विकारांनी घेराव घातलेला असतो . अशावेळी अनेकांना आपल्या आजारासाठी औषधोपचार, पथ्यपाणी, विविध प्रकारच्या टेस्ट याकडे ही लक्ष पुरवावे लागते .हे करीत असताना ही मंडळी आपल्या आजारा बरोबर घरातल्या छोट्या-मोठ्या समस्यांवर ही सतत विचार करीत असतात,काही समस्या ह्या त्यांच्या आवाक्याबाहेर च्या असतात तरी ते विचार करीत असतात आणि त्यामुळे त्यांचे विकार आणखी बळावतात म्हणून सतत विचारात पडायचेच कशाला ?
आपले सेवानिवृत्तीचे आयुष्य शांतपणे घालवायचे असते तरुणपणात खूप कष्ट हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागते म्हणून साठी नंतर खरं सुखाच जीवन जगायचे असते .पण म्हातारपणी सगळी सुखं समोर असली तरी काहीजण नको त्या गोष्टींचा विचार करून करून आपले आजारपण वाढवून घेतात. कुटुंबातील सर्व जण आपापली काळजी घेण्यास समर्थ असतात तरी त्यांची काळजी हे वृध्द नागरिक नको तितकी करीत रहातात उदाहरण द्यायचे झाले तर नातवंडे घरात वेळेत आली नाहीत,नातवंडांची लग्न लवकर जमली नाहीत, त्यांना नोकऱ्या लागल्या नाहीत.नातवंडांची शैक्षणिक प्रगती फास्ट झाली नाही अशा एक ना दोन हजारो कारणांमुळे वृध्द नागरिक नको तितका विचार करीत आपले ताण वाढवून घेतात व त्या पाठोपाठ नाना विकारांना,आजारांना निमंत्रण देतात.
वृध्दापकाळात सतत विचारात पडायचेच कशाला ? त्यामुळे आपले कित्येक आनंदाचे क्षण वाया जातात.
काळ हा अनंत आहे.त्यापैकी आपण जन्मापासून ते मरेपर्यंत एवढाच काळ या पृथ्वीवर असतो, लहानपणापासून ते वृध्दापकाळ येई पर्यंत हा काळ देहाची सोबत करतो.क्षण हा अनंत काळाचा सर्वात लहान भाग आहे.अनेक क्षणांनी तास,तासांनी दिवस,दिवसांनी महिने , आणि महिन्यांनी वर्ष होतात हे आपणास ठाऊक आहे काळ हा आपल्या गतीने चालत असतो .काळ कधी सरतो ते आपल्या लक्षात येत नाही.काळाचा महिमा फार अगाध आहे.
वेगाने धावणाऱ्या या काळात आपण आपल्या आयुष्यात ले कित्येक क्षण वाया घालवत असतो.कित्येकदा विनाकारण विचार करीत बसतो त्यातून निष्पन्न काहीच होत नाही.आपल्याला मग नैराश्य येते काहीच करावेसे वाटत नाही काही सूचत नाही,कंटाळा येतो, त्यामुळे आपले अस्तित्व आपल्याला अर्थ हिने वाटू लागते .
पण या उलट आपण सतत विचारात न पडता हाती आलेल्या क्षणाचा चांगला विचार करून एखादी चांगली कृती करण्यात ते क्षण आनंदाने घालवू शकतो.
घरातील छोटीमोठी कामे करून साहित्य वाचून, रेडिओ ऐकून टि व्ही बघून वगैरे आपण आपल्या हाती असलेल्या क्षणांशी कधीच एकरुप होत नाही.आपण त्या क्षणांपेक्षा काळाचा विचार अधिक करतो.आपली जेवणाची वेळ,झोपण्याची वेळ,पूजेची वेळ त्या त्या वेळी ते ते करतो पण त्या क्षणात बुडून जात नाही त्या गोष्टी वेळेत होण्यासाठी आपण अधिक विचार करीत रहातो .क्षणांचा आनंद घेऊ शकत नाही.
टि.व्ही.वर कोणतीही मॅच चालू असताना खेळाशी एकरुप न होता आपण “विजय कोणाचा होईल या बद्दलच विचार करीत रहातो त्यामुळे त्या खेळातील क्षण वाया घालवतो.
मनोरंजन कार्यक्रमात विनोद झाला तरी आपण कित्येकदा हसावे की, नाही ?याचा विचार करून मग माफक किंवा कधी कधी तुच्छतेने खवचटपणे हसतो.निर्मळ हसत सुध्दा नाही.
एखाद्या वेळी आपला अपमान झाला त्याचा विचार करीत बसतो पण अपमान झाला म्हणून कधीही रडत नाही तर अश्रू अडवून ठेवतो.पण हे चुकीचे आहे नुसते विचार करीत राहण्यापेक्षा कृती केली पाहिजे.समोरच्या व्यक्तीला योग्य ते उत्तर दिले पाहिजे.कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्याने संताप आल्यावर आपण राग व्यक्त न करता त्याच्या कृतीचा फक्त विचार करीत राहिलो व रागाने उपाशी राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतो.
समाजात वावरताना अनेक घटना आपल्या मनाविरुद्ध घडतं असतात त्या घटना पाहून आपण सतत विचारात पडायचे हे योग्य नाही त्यामुळे मनावर विकारांचे थर साठू लागतात.
काही वेळा माणसाला फावल्या वेळेत घडून गेलेल्या घटना आठवतात त्यामुळे कधी भयंकर भिती वाटते तर कधी स़ंताप अनावर होतो.तर कधी असुरक्षित वाटते.मग दरदरून घाम फुटतो रक्तदाब वाढतो कधीं कमी होतो.काही वेळा खूप रडू येते तर काही वेळा आपण त्यावेळी असे कसे वागलो ? म्हणून प्रचंड हसू ही येते.
म्हणून घडून गेलेल्या घटना विसरायचा असतात त्यांचा विचार करायचा नसतो.आपण आयुष्य भर भविष्याची ही स्वप्ने सतत पहात असतो .ती सगळी स्वप्ने पूर्ण होतातच असे नाही काही अडचणी येऊ शकतात व स्वप्ने धुळीला मिळू शकतात तर काही स्वप्ने साकार पण होतात.स्वप्ने साकार झाली नाही तरी त्याच गोष्टी चा एक सारखा करीत बसण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे.गत काळातील क्षणांत न अडकता येऊ घातलेल्या क्षणांचे मूल्य आपण मनात ठरवले पाहिजे.व त्याप्रमाणे त्या क्षणांना सामोरे जावून कृती केली पाहिजे.वाईट क्षण पुन्हा पुन्हा आठवून त्यात किती रमायचं यांचा विचार निश्चित व्हायला हवा.
. चांगल्या वाईट घटनांची स्मृती कायम आपल्या मनात येणारच कारण स्मरण करणं हे मेंदूचे काम आहे आणि त्याच काम तो करीत असतो पण आपण त्या घटनांचा विचार करायचाच कशाला ?जे झालं ते कृष्णापॆण म्हणायचे व नवीन क्षणांचा उपभोग घ्यायचा.घडून गेलेल्या वाईट घटनांचे पडसाद आपल्या मनात उमटू देऊ नयेत.किंवा चांगल्या घटनांनी हुरळून जाऊ नये ,जमिनीवरुन दोन फुट चालू नये.घडून गेलेल्या चा़ंगल्या वाईटाचा सतत विचार करू नये.
अपमानाने, किंवा निंदानालस्ती ने आपला स़ंताप वाढू न देता खूप विचार न करता “हो का ?हे असं आहे का ? बरं ठीक आहे ” अशी स्वतःची भूमिका करून घेतली गेली तर विचारात गुरफटून जाणे निश्चितच कमी होईल.
कोणी म्हणू शकेल घडलेल्या घटने बद्दल विचार करीत बसायचे नाही तर मग काय करायचे?त्यावर पण उपाय आहे.रोजच्या दैनंदिन जीवनात संताप,चिड,राग, वगैरे भावना उद्दिपित करणाऱ्या घटना घडल्या तर त्या भावना मनात दाबून ठेवून विचार करीत बसायचे नाही तर संबंधित व्यक्ती शी स्पष्ट बोलून गोष्टींचा साक्षमोक्ष लावून टाकावा.
कोणत्याही प्रकारच्या गोष्टी चा विचार करीत बसण्यापेक्षा ती ती कृती करुन टाकावी.विनोद घडला तर खळखळून हसावे, दुःख द घटना घडली तर हमसाहमसी रडावे,मतभेद झाले तर मत मा़ंडावे,अन्याय झाला तर आवाज उठवावा, म्हणजे त्या क्षणी त्या क्षणांतून मोकळे होता येईल.व अहोरात्र विचार करीत बसावे लागणार नाही.
असे वागण्याने मनात काही साठून रहात नाही.त्याचे रुपांतर मानसिक आजारात होत नाही.मन पूर्ण शुद्ध, स्वच्छ,व निर्मळ राहू शकते.म्हणूनच आपल्या भावना व्यक्त करा,मोकळे व्हा, आनंदी रहा मग सत्यदर्शन घडण्यास वेळ लागणार नाही.
माणूस सुरवातीला भूतकाळात व नंतर भविष्याचे विचार करीत जगू लागतो पण खरं तर त्याला वास्तवातच म्हणजे वर्तमान काळात जगणेचं भाग असते पण तो भूत आणि भविष्य काळाच्या विचार चक्रात अडकतो भूतकाळात असे का घडले असावे ! आणि भविष्यात हे असे कधी घडेल या च विचारात हातातील मौल्यवान क्षण निसटून जातात.पण एक गोष्ट लक्षात घ्या “गेलेले क्षण कधीच परत आणता येत नाहीत जशी पिस्तुलातून सुटलेली गोळी परत येत नाही.
अनाथ,दलित,अपंग,पिडीत,शोषित,अशी हजारो लाखो माणसे या जगात रोजचा दिवस सुखाने घालवत असतात , जीवन जगतच असतात.आपल्या व्यंगाचा,आपल्या परिस्थिती चा विचार बाजूला ठेवून ते स्वाभिमानी वृत्तीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात डोक्याला हात लावून बसत नाहीत.
म्हणून बुद्धिजीवी माणसाने जीवन जगताना जगण्यातल्या सुंदर पणावर,चांगूलपणावर,नितांत श्रद्धा ठेवावी.कारण ते प्रत्यक्ष दिसतं भूत, भविष्याचा विचार करीत बसण्यापेक्षा समोर आलेले क्षण स़ंपूर्ण आनंदाने जगणे,आपले सर्वस्व त्या क्षणात समपॆण करणे केव्हाही चांगले आणि त्याक्षणी चांगल्या वाईट भावनांना सामोरे जाणे योग्य असते.
आपण रहातो त्या घराचा,प्रा़तांचा,देशाचा स्वर्ग करणे किंवा तेथील लोकांचे आयुष्य नरकमय करणे या दोन्ही गोष्टी माणसांच्या कृतीशील असण्यावर,विचारांवर अवलंबून आहेत
बालपण,तरुणपण, आणि म्हातारपण या तीन ही अवस्थांमधून मानवी देह जातो त्या त्या वयानुरूप मानवाच्या मनात विचार येत असतात पण जीवन जगताना कोणत्या विचारांना किती थारा द्यायचा हे त्याने ओळखून कृतीशील असण्यावर भर दिला पाहिजे.
म्हणून विचारांचा अतिरेक नको
तर मग सतत विचारात पडायचेच कशाला?
लेखिका
अंजली महाजन पुणे
६ सप्टेंबर २०२१
विचारांचे सारखे फुटणारे धरण त्यातून मनावर येणारे मळभ रोखण्यात उपयोगी पडू शकणारा लेख