Thursday, November 21, 2024
Homeये हृदयीचे ते हृदयीहसताय ना मंडळी‌ ! हसायलाच पाहिजे ! – ये हृदयीचे ते...

हसताय ना मंडळी‌ ! हसायलाच पाहिजे ! – ये हृदयीचे ते हृदयी – १० – अंजली महाजन

मंडळी,मी विचारले की,हसताय ना ? बरोबर विचारले ना !कारण हास्य सर्वांना च खूप आवडते,मग लहान असो की,मोठा असो मग तो अज्ञ असो की,सुज्ञ असो राजा असो की,रंक असो .हास्याला कोणत्याही जातीचा,लिंगाचा भेद नाही.नुकत्याच जन्मलेल्या बाळा पासून ते वृध्दा‌ पर्यंत‌ सर्वांना मनापासून हसायला आवडते.हास्यामुळे खूप आनंद मिळतो,हास्यानंदामुळे आजूबाजूला आनंद भरून राहतो वातावरण छान राहते.


‌फक्त केव्हा हसावे याचे भान ठेवणे गरजेचे असते , स्मशानात असताना ,अपघात स्थळी असताना, एखाद्याच्या अंतकाळी , एखाद्याच्या दु:खद प्रसंगी समीप असताना हसणे योग्य नसते . सर्व लोकांना हसायला आवडत असते पण जे लोक अरसिक असतात किंवा ‌जे लोक स्थितप्रज्ञ असतात, किंवा वेडे असतात ते फारसे हसताना दिसत नाहीत.ते क्वचित प्रसंगी हसतात.


संस्कार जसे बाजारात मिळत नाही,तसेच हास्य देखील पैसे देऊन ही बाजारात मिळत नाही.हास्य हे आपल्या मनातील आनंदाचे प्रगटीकरण आहे, आणि मनात आनंद निर्माण होण्यासाठी ‌मनाला अनुकूल संवेदना होण्याची गरज असते.


मनाला अनुकूल संवेदना निर्माण होण्यासाठी घरातले‌ वातावरण अत्यंत पोषक हलकेफुलके ठेवले पाहिजे,तसेच संवेदना अनुकूल ठेवण्यासाठी सोपे आणि स्वस्त साधन म्हणजे विनोद‌ हे‌ ही एक आहे.घरातील गंभीर वातावरण टाळण्यासाठी विनोद एक तर बोलण्यातून निर्माण करता येतात नाही तर लिखाणातून निर्माण करता येतात, घरातील वातावरण हासरे रहाण्यासाठी बोलण्यातून विनोद जास्त निर्माण झाले तर घरातील सर्व मंडळी हसतमुख रहातात.


आपल्याला आलेला मानसिक ‌ताण कमी होण्यासाठी हास्य सहाय्यभूत ठरते म्हणून माणसाने हास्य केले पाहिजे.हास्यप्रियता ही माणसाची उपजत प्रवृत्ती आहे आणि हास्य ही आनंदाची अभिव्यक्ती आहे.


हास्य ही दैवी देणगी आहे,हसणे ही मानवाला निसर्गाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे . पृथ्वी वर इतके जीव आहेत पण त्यातील फक्त माणसाला हसण्याचे वरदान ‌देवाकडून मिळालेले आहे.निरागस निर्मळ हसणे माणसाचे व्यक्तिमत्त्व फुलवते.उपेक्षेने हसणे, तुच्छतेने हसणे ,खवचटपणे हसणे असेही हास्याचे प्रकार आपल्याला आजूबाजूला पहायला मिळतात पण हे हसणे मनाला निखळ आनंद देत नाही.निष्पाप हसणे‌ हे माणसाचे खरे सौंदर्य आहे.आपण निखळ खळखळून हसण्याने‌ दुसऱ्याच्या मनाला ही आनंद वाटत असतो‌.


हसण्याने मनाला आनंद मिळतोच पण हसण्याचे शास्त्रीय फायदे ही खूप आहेत, मुख्य म्हणजे हसण्याने आपल्या चेहऱ्याच्या ३२ स्नायूंना मिळतो, चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते त्यामुळे माणूस प्रसन्न दिसतो, सुहास्य वदनी माणसाच्या दर्शनानी क्षणभर आपण आपले दुःख ही विसरतो एवढी ताकद‌ या हास्यात आहे .


परंतू आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात कोणालाही खळखळून हसायला वेळ नसतो . हास्य ही माणसाच्या आयुष्याच्या जीवनातील मोठ्यात मोठी गोष्ट आहे हे माणसाला विसरून चालणार नाही.पण काही लोक सदैव एरंडेल प्यायल्या सारखे तोंड करून समाजात वावरताना दिसतात, काही लोक कायमच गंभीर चेहरा ठेवून कोणत्याही प्रसंगी कोणत्याही क्षणी समाजात वावरताना दिसतात,त्यांच्याकडे पाहून असे वाटते जणू काही साऱ्या जगाच्या उद्धाराचा बोजा यांच्या चे डोक्यावर दिलेला आहे.साऱ्या विश्वाची काळजी ‌जणू यांनाच व्हायची आहे.काही जणांचे नित्य सुतकी चेहरे पाहून असे वाटते की जणू यांच्या घरात नुकतीच एखादी दुर्घटना घडली आहे की काय.


‌जीवन हा एक सुंदर खेळ आहे.या खेळात तुम्ही हसतमुख राहिलात तर तुमच्या कुटुंबातील लोक तसेच शेजारी पाजारी ही हसत राहतील.माणसाने सुहास्याचे मूल्य जाणले पाहिजे, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या समोर येईल तेव्हा स्मित हास्य तरी केले पाहिजे.
हास्याला लिंग भेद नाही स्त्रीच्या सौंदर्याची शोभा सुहास्याने वाढते हे जरी खरे असले तरी, सुहास्य केवळ स्त्रीसाठी आल्हाददायक आहे असे नाही तर‌ पुरूषा़साठीही आल्हाददायक आहे तेव्हा जसे स्त्रीने हसले पाहिजे तसे पुरूषाने ही हसले पाहिजे.सुहास्य हे एक निरोगी मनाचे लक्षण आहे.


हास्यात एक प्रकारची महान शक्ती असते , सामर्थ्य असते,एखादी कुरुप व्यक्ती जर हसली तर ती‌ सुध्दा हसताना‌ सुंदर दिसते .माणसाच्या अंगावर उंची वस्त्रे ,उंची अलंकार नसतील पण मुखावर हास्याचा दागिना असेल तर तो त्याला अधिक शोभादायक वाटतो.
. हास्य ही माणसाची सुंदर भावना आहे.तेव्हा ही भावना योग्य त्यावेळी व्यक्त केली पाहिजे ती दाबून ठेवून नये .


हास्य ही स्वतंत्र अशी सहज प्रवृत्ती आहे.आवाज करून हास्य फक्त मनुष्य प्राणी करू शकतो,परंतू माणसाचे हास्य हे ह्रदयातून आले पाहिजे.हसणे याचा अर्थ हॅ हॅ हॅ करून दात दाखवणे नव्हे हे हास्य नकली ठरते,कृत्रीम हास्याला दात काढणे असे म्हणतात.माणसाने हसण्याचा देखावा करू नये.ह्रदयात चांगला भाव असेल तर हसण्याची क्रिया लागलीच घडते,क्षणाचाही विलंब हसण्यासाठी लागत नाही.हसणे हे सूर्यप्रकाशा सारखे आहे . कोवळी सूर्य किरणे अंगावर घेतल्याने जसे शारीरिक आजार बरे‌ होतात.तसेच सुहास्य केले की, मनाचे रोग बरे होतात मन ताजेतवाने रहाते.माणसाचा निरुत्साह निघून जातो .


जसं जसा माणूस मोठा‌ होऊ लागतो , तेव्हा काही वेळा पहिल्या पेक्षा अधिक प्रमाणात तो ईश्वर भक्ती करू लागतो अध्यात्म जाणून घेऊ लागतो हे करत असताना त्याची अशी‌ समजूत होऊन जाते की,आता आपण हसलो तर चालणार नाही,आपण विनोद केलेला चालणार नाही,कोणाची चेष्टा मस्करी केलेली चालणार नाही.आपण सदैव गंभीर चेहराच करुन बसले पाहिजे असे त्यांना वाटत असते म्हणून ते समाजात फारसे मिसळत नाहीत अलिप्त राहू लागतात.


प्रत्येकाची स्वतःची हसण्याची व‌ इतरांना हसवण्याची अशी खास लकब असते फक्त मनुष्य च असा एक प्राणी आहे की, विनोद करु शकतो व मनमुराद स्वतः हसून इतरांना हसवू शकतो म्हणून माणसाने नित्य हसले‌ पाहिजे.प्रत्येक माणसाला ‌जीवनात भरभरून आनंद हवा असतो आणि म्हणून तो मिळवण्यासाठी तो प्रयत्न शील रहात असतो.हास्य हे एक शरीरातील आरोग्य वर्धक रसायन आहे आणि त्या योगे माणसाचे मन आनंदी ताण विरहित रहाते हलकेफुलके रहाते.


आता हास्यानंद मिळण्यासाठी माणसाने काय केले पाहिजे ?तर माणसाने भरपूर विनोदी कथा , कविता वाचल्या पाहिजेत . विनोदी चित्रपट पाहिले पाहिजेत, अनेक विनोदी नाटके पाहिली पाहिजेत.हास्यानंद मिळण्यासाठी विनोदाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यातील विनोद वाचले पाहिजेत, मित्रपरिवार, नातेवाईक जमल्या नंतर गंभीर विषयांवर चर्चा करीत बसण्यापेक्षा एखाद्या विनोद वीरावर चर्चा करावी.
विनोदी कथा,कविता, वाचताना तर आपल्याला इतके हसू येते की, त्यावेळी आपल्या अवतीभवती कोणी असले‌ तरी आपल्या ला त्याचे भान नसते आपण पुस्तकातील विनोदी प्रसंगाला भरभरून हसून ‌दाद देत रहातो व विनोदाचा आनंद घेतो.


ज्येष्ठ नागरिकांना तर घरबसल्या टि.व्ही.वरील काही विनोदी कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन हास्यानंद मिळवता येतो.सध्या टि.व्ही.वर चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्य जत्रा,टेंशन वरची मात्रा हास्य जत्रा वगैरे सारखे अनेक कार्यक्रम अनेक वाहिन्यांवर चालू असतात.ते पाहून सुध्दा आनंद मिळतो.


आपल्या कडे अनेक मान्यवर लेखकांनी विनोदी साहित्य निर्माण करुन‌ हास्याचा खजिना आपल्यापुढे ठेवलेल्या आहे.प्र.के अत्रे,पु.ल.देशपांडे,द.मा.मिरासदार अशा अनेक विनोदी लेखकांची भली मोठी यादी आहे.त्यांचे साहित्य वाचल्यानंतर खरा हास्यानंद मिळाल्याशिवाय रहात नाही.


तसेच अनेक विनोदी अभिनेते, अभिनेत्री यांचा ही विनोदी अभिनय पाहून आपल्याला प्रचंड हास्यानंद मिळतो.अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे,विजय चव्हाण,दामूआण्णा मालवणकर,शरद तळवलकर वगैरे अनेक विनोदी कलाकारांचा चित्रपटातील अभिनय पाहून आपली हसून हसून पुरेवाट लागते.


आपल्या जीवनात हास्याला अनन्यसाधारण महत्व आहे . म्हणून ‌आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी कसे राहतील याकडे लक्ष दिले पाहिजे.
अनेकदा अनेक जण‌ जसे म्हणत असतात “स्वतः जगा,व इतरांना ही जगू द्या”तद्वत मी म्हणेन “स्वतः हसा व इतरांना ही हसवत ठेवा “.मग काय मंडळी हसणार ना‌? हसायलाच पाहिजे.


लेखिका
अंजली महाजन
१० फेब्रुवारी २०२२

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. ‘हास्य’ह्या केवळ दोन अक्षरी शब्दाचे महत्व किती अनन्यसाधारण आहे ते विविध अंगाने परामर्श घेऊन लेखिका अंजली महाजन यांनी फार सुंदर शब्दात विशद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क