कुठल्याही आजारात इतर बर्याच गोष्टीबरोबर औषधे ही खूप महत्वाची असतात.पार्किन्सन्स याला अपवाद नाही.सुदैवाने या आजारामध्ये बरीच औषधे उपलब्ध आहेत.सध्या पार्किन्सन्समध्ये सात गटाची औषधे आपल्याला मिळतात.त्यातील बरीचशी औषधे आपल्याला माहित असतील.आपण वापरत असाल.सगळ्यात महत्वाचे औषध जे लीओडोपा ( Levodopa )आहे.जे बहुतेक सगळ्या पेशंटना कधीना कधी वापरावे लागते.सुरुवातीच्या अवस्थेत आणि तरुण वयातील पेशंटना आम्ही ते चालू करत नाही.पण जसजसे वय,आजार वाढतो तसे हे चालू करावे लागते.कमी डोस चालू करून हळूहळू तो वाढवावा लागतो.
कधी कधी लीओडोपानीही आजार नियंत्रणात येत नाही.तेंव्हा त्याच्या जोडीला काही पूरक (supportive ) ज्यांना अमलीडोपा (Amlidopa ) म्हणतात,अशा औषधांची मदत होते.शरीरातील लीओडोपा वाढवण्यास याची मदत होते.लीओडोपा शरीरात गेल्यावर ब्रेकडाऊन होते.त्यामुळे त्याची पातळी कमी होते.ब्रेकडाऊन करणार्या यंत्रणा जर अडवल्या तर शरीरातील लीओडोपाची पातळी वाढू शकते.त्यातील एक यंत्रणेचे नाव ‘मेयो’ ( Meya – monoamino – onidase ) असे आहे.दुसरीचे कॉम ( Com ) असे आहे.या यंत्रणाना अडवणारे/थोपवणारे औषध वापरले तर लीओडोपाची पातळी वाढते.थोडक्यात यासाठी लिओडोपबरोबर काही पूरक ( Supportive ) औषधे द्यावी लागतात.त्यातील एक Compinhibiter, दुसरे mayo – inhibiter आणि तिसरे carbidopa .डॉक्टर जेंव्हा प्रती जैविके (Antibiotic ) देतात तेंव्हा त्याबरोबर पूरक म्हणून एखादे व्हिटामिनचे औषध देतात तसेच हे आहे.
दुसरी औषधे आहेत त्याना डोपामिन अगोनीस्ट ( Dopamin agonist ) म्हणतात.ही डोपामिन रीसेप्टरवर जाऊन थेट परिणाम करतात.ही लीओडोपा एवढीच प्रभावी व परिणामकारक असतात.तरुण लोकांमध्ये आम्ही ही आधी सुरु करतो.जसजसे वय वाढत जाईल तसतसे दोन्ही प्रकारची म्हणजे लीओडोपा आणि लीओडोपा अगोनीस्ट अशी दोन्ही औषधे सुरु करावी लागतात.
डोपामिन अगोनीस्टमध्ये पूर्वी काही औषधे होती त्यात आता काही नवीन औषधे आली आहेत.१०/१५ वर्षात यात खूप चांगला बदल झाला आहे.
पार्किन्सन्समध्ये वापरले जाणारे आणखी एक औषध म्हणजे अॅमॅन्टेडाइन (Ameantidine) हे औषध नक्की कसे काम करते हे वैज्ञानिक जगाला एक न उलगडलेले कोडे आहे.त्याच्यामुळे डोपामिनची पातळी वाढते हे मात्र निश्चित.सुरुवातीला हे औषध फ्लूच्या पेशंटना वापरत असत.ज्याना पार्किन्सन्स आहे अशा फ्लूच्या पेशंटना ते दिल्यावर पार्किन्सन्स कमी झाल्याने ते पार्किन्सन्सला लागू पडते असे लक्षात आले.आता ते फ्लूवर वापरणे बंद झाले.पण पार्किन्सन्समध्ये चालू झाले.
शेवटचे जे औषध आहे ते शरीराच्या डोपामिन यंत्रणेमध्ये काम करत नाही.तर Cholirnigic यंत्रणेत काम करते.colerginic च्या पातळीवर परिणाम करणार्या या औषधाला Cholirnigic किंवा anti Cholirnigic औषध असे म्हटले जाते.याच्यामुळे serum मध्ये जे acytyl chalelinestrace आहे त्यावर परिणाम होतो.
अशी सात प्रकारची औषधे म्हणजे १) लीओडोपा २) Dopa – Decolrbose ३) Miopi – inhibiter ४) Compi- inhebiter ५)Dopamin agonist ६) amantidine ७) Anti Cholirnigic ही बाजारात उपलब्ध आहेत.
ही औषधे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये वेगवेगळ्या पेशंटना दिली जातात.एकाला जे लागू पडते ते दुसर्याला लागू पडेलच असे नाही.प्रत्येकाचे आजाराचे स्वरूप वेगळे व त्याची त्यावरची औषधे वेगळी.
पार्किन्सन्सवर उपचार करणे ही एक फार मोठी तारेवरची कसरत आहे.ती डॉक्टरनाही शिकावी लागते. ते काही फुटपट्टी घेतल्यासारखे नसते.की बाबा याला हे लागू पडले आता दुसर्यालाही लागू पडेल.प्रत्येक पेशंटचा त्रास पाहून त्याप्रमाणे औषधाचा डोस बदलावा लागतो.
या सात प्रकारच्या औषधात नवीन काही औषधे येऊ घातलेली आहेत.
लीओडोपामध्ये एक नवीन औषध जगभरात वापरायला सुरुवात झाली आहे.ते म्हणजे द्रवरूप लीओडोपा ( Liquid Leodopa ) लीओडोपाची गोळी घेतली तर ती शरीरामध्ये जाते काहीजण दोन तासांनी घेतात काही चार तासांनी तर काही सहा तासांनी.प्रत्येक रुग्ण त्याच्या गरजेप्रमाणे डोस घेतो.गोळी घेतली की शरीरात काही वेळाने एक विशिष्ट प्रकारची पातळी येते.काही काळानंतर ती हळूहळू कमी होते.थोडक्यात लीओडोपाची पातळी वर खाली वर खाली अशी होत राहते.ही पातळी जेंव्हा सर्वात जास्त असते तेंव्हा आपल्याला कळते की आपला On period चालू आहे.जेंव्हा ती खाली येते तेंव्हा off period चालू होतो.हा असा on आणि off चा त्रास लीओडोपाची पातळी वरखाली, वरखाली झाल्याने होतो.यासाठी डोसेस adjest करावे लागतात.मेंदूमध्ये जेंव्हा नैसर्गिकरीत्या डोपामिन तयार होत असते तेंव्हा ते सतत एका ठराविक पातळीत असते आणि मेंदूतल्या ज्या पेशीमध्ये जाऊन क्रिया होणे अपेक्षित असते तेथे बरोबर जाते आणि क्रिया करते.असे काही औषध वापरता येईल का? जे मेंदूच्या नैसर्गिक कृतीप्रमाणे असेल असा विचार झाला.मग काही लोकात त्यांच्या आतड्यात नळी घालून हळूहळू एकेक थेंब लीओडोपा देत गेले तर हि पद्धत मेंदूच्या क्रियेसारखी होती.यातून On आणि Off चा त्रास कमी होऊ शकतो असे लक्षात आले.असे द्रवरूप लीओडोपा अजून तरी भारतात उपलब्ध नाही.वर्ष दोन वर्षात येऊ शकेल.हे औषध जेल स्वरूपात आहे.ते तोंडाने घ्यावयाचे नाही तर, शस्त्रक्रियेद्वारे पोटात नळी घालावी लागते.ती नळी वेगळ्या प्रकारची असते.एका नळीतून अन्न गेले पाहिजे दुसर्या नळीतून द्रवरूप जेल स्वरूपातील लीओडोपा गेले पाहिजे.त्यासाठी Y किंवा T आकाराची नळी पोटात घालून त्यातून हे औषध दिले जाते.डीपब्रेन स्टीम्युलेशन अथवा त्याप्रकारची इतर शस्त्रक्रिया झाली आहे आणि पेशंटची तब्येत खालावली आहे.अशाना द्रवरूप लीओडोपा दिल्यावर चांगल्या प्रकारचे परिणाम दिसून आले आहेत.पण हे औषध अजून नवीन आहे. त्यामुळे खात्रीलायक (First Hand Infermation ) आलेली नाही.ज्या डॉक्टरांनी हे वापरले त्यांच्या बोलण्यात ते चांगले आहे असे आले.आणि U.K.मध्ये ज्यांचा आजार बर्यापैकी वाढलेला आहे अशाना हे औषध चांगल्या प्रकारे मदत करते असे लक्षात आले.परंतु आत्ताच त्याबद्दल बोलणे अवघड आहे.
दुसरे औषध जे प्रभावी होण्याची शक्यता आहे ते म्हणजे Dopamin agonist.यासाठी पूर्वी Bromocryptin नावाचे औषध वापरले जाई. आज ते कोणी वापरण्याची शक्यता कमी आहे.१९९० ते २०००० पर्यंत ते खूप वापरले गेले.आता रोपार्क (Ropark),Pramimpretal ,pramipeg, praramipel अशा पद्धतीची औषधे वापरली जातात.यात आता पॅच ( patch )च्या स्वरुपात औषध उपलब्ध झाले आहे ते तोंडाने न घेता.शरीराला एक पॅच लावला जातो.त्यातून औषधे शरीरात दिली जातात.२४ तास पॅच लावायचा दुसर्या दिवशी अंघोळीच्या वेळी काढायचा दुसरा लावायचा.भारतात हे औषध अजून उपलब्ध नाही.भारताच्या हवामानात पॅच टिकून राहण्यात तांत्रिक अडचणी आहेत.त्यामुळेही ते भारतात आले नाही.पण ते उपलब्ध झाल्यास रुग्णांना देणे सोयीचे होईल.पेशंट काहीवेळा तोंडात गोळी टाकतो,ती खाली पडते,कधी थुंकून टाकतो,कधी गोळी अडकते म्हणून घेऊ शकत नाही.मग गोळ्यांची पूड करून घेतात.या सर्वात हवे तेवढे औषध पोटात जाते का ते समजत नाही.यासाठी पॅच खूप चांगला आहे.
तिसरे एक औषध जगभरात काही वर्षे चालले आहे.ते पुतळा होणे( freezing ) हा त्रास ज्याना आहे त्यांना उपयोगी पडते.पुतळा होणे म्हणजे चालता चालता माणूस एक ठिकाणी थांबून जातो.तो पुढे जाऊच शकत नाही.बर्याच वेळेला रस्त्यात कोसळतो.मग धरून उचला,चार जणांनी धरून चालवा.असे करावे लागते १५/२० मिनितापर्यंत पाय हलत नाहीत असा त्रास होतो.हा त्रास कमी करण्यासाठी पुतळा झाल्यास लगेचच घेण्यासाठी एक इंजक्शन मिळते.हे त्रास झाल्यावरच घेण्यासाठी त्रासापासून सुटका करणारे ( Rescue Type ) इंजक्शन आहे.त्रास झाल्यावर लगेचच घेण्यासाठी आपल्याबरोबर खिशात एक,दोन इंजक्शन पेशंट ठेवतात.त्रास झाल्यास स्वत:च ते टोचून घेतात.इंजक्शन घेतल्यावर त्रास कमी होऊन चालण्यास मदत होते.असेल त्या ठीकाणाहून कोणाच्याही मदतीशिवाय घरी जाता येते.यासाठी Apo-morfin जगभरात उपलब्ध आहे.पण भारतात नाही. काही डॉक्टरनी वेगवेगळ्या मार्गांनी ते आणून वापरून पहिले.पण सातत्याने त्याची उपलब्धता कठीण आहे.पुतळ्याच्या समस्येवर उपयोगी असल्याने ते भारतात येण्याची शक्यता आहे.
चौथे एक औषध जे भारतात येण्याची शक्यता आहे.ते म्हणजे Amantidine नावाची जी गोळी आपण घेतो,ती दिवसातून दोनदा, तीनदा, चारदा घ्यावयास लागते.ती चोवीस तासात एकदाच घ्यावी लागेल अशा पद्धतीत मिळण्याची शक्यता आहे.दुर्दैवाने पीडी पेशंटना एकापेक्षा जास्त गोळ्या घ्याव्या लागतात माझा एक पेशंट तर दिवसात १९ गोळ्या घेतो.त्यादृष्टीने आता जास्त गोळ्यांची संख्या कमीवर कशी आणता येईल असे संशोधन चालू आहे.गोळ्या कमी झाल्याने पेशंटचा Compliance वाढतो.
आणखी एक असे औषध येऊ घातले आहे जे पीडीच्या लोकांचे जीवन बदलण्यासाठी खूपच महत्वाचे ठरेल.Safinamide नावाच्या औषधाचा अभ्यास चालू आहे.पुण्यात सुद्धा काहीजणांनी वापरले आहे.पीडी पेशंटच्या सुरवातीच्या अवस्थेत आणि प्रगत अवस्थेतही याचा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकेल.पुढील ५/७ वर्षात हे उपलब्ध होऊ शकेल.आणि एक महत्वाचे औषध म्हणून वापरले जाईल.हे औषध पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने परिणाम करणारे आहे त्यामुळे आपण सध्या जी औषधे वापरतो त्याच्या बरोबरीनेच वापरायचे आहे.त्यामुळे चालू असलेली औषधे बंद होतील असे काही वाटत नाही.
कॉफीमुळे पीडीचा त्रास कमी होतो.ज्यांनी पूर्वी खूप कॉफी प्यायली आहे अशांना पीडी होण्याची शक्यता खूप कमी असते.हे लक्षात घेऊन कॉफीत असे काही गुण आहेत का ज्याचा पीडी पेशंटना उपयोग होईल असा शोध चालू झाला.कॉफीत जो कॅफिन नावाचा पदार्थ असतो.त्याचा मेंदूशी काही संबंध आहे का? हा पदार्थ मेंदूच्या adinosin नावाच्या यंत्रणेवर क्रिया करणारा असतो.त्याच्याशी निगडीत अभ्यास चालू आहे.आणि असे लक्षात आले की त्या औषधाने पार्किन्सन्सचा त्रास कमी होण्यास मदत होते.याचा अर्थ खूप कॉफी प्याल्याने पीडी बरा होतो असे नाही..पण फार पूर्वी खूप कॉफी प्यायाली असेल तर व्यक्तीला पीडी होण्याची शक्यता खूप कमी असते.अशा पद्धतीच्या औषधावरही शोध चालू आहेत. त्याचा फायदा किती होईल हे आत्ताच सांगणे अवघड आहे.हे जे अभ्यास आहेत ते बराच काळापर्यंत म्हणजे पाच,सात,दहा वर्षापर्यंत चालणारे असतात.आणि एखादे औषध अभ्यासासाठी घेतले तर त्याचा रुग्णांना फायदा होईल का? याच्या निष्कर्षापर्यंत यायलाही पाच,सात,दहा वर्षे लागतात.८० ते ९० टक्के औषधाना अशा अभ्यासातून जावे लागते.त्यांचा फायदा किती,तोटा किती,दुष्परिणाम किती हे तपासावे लागते.पूर्वीच्या काळी भारतातही असे अभ्यास व्हायचे.त्यामुळे रुग्णांनाही त्याचा फायदा होत असे पण लोकाना वाटते की रुग्णांचा गिनिपिग सारखा वापर केला जात आहे.पण जगात सर्वत्र असेच आहे आपण जर अशा अभ्यासात सहभागी झालो तर आपल्या पुढच्या पिढ्यांना त्याचा फायदा होईल.
आता ही झाली औषधे ज्यांच्या येण्याची शक्यता आहे. आणि आपण त्यांचा वापर करू शकू.अजून दोन प्रकारचे औषधे पिडीवर वापरली जातात.एक म्हणजे पीडी रुग्णात अलिप्तता.( Apathy ) नावाचा त्रास असतो.यात कोणाशी बोलायला नको,कुठे जायला नको,कुणी यायला नको असे वाटते.एके ठिकाणी बसून राहतात..रुग्णात उदासपणा असतो असे नाही.पण त्याला काहीच करायची इच्छा होत नाही.सगळ्या गोष्टीत अलिप्त झालेले असतात.सगळ्या जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोनाच बदललेला असतो.ही अलिप्तता कमी करता येईल का? अलिप्तता कमी झालीकी हालचाली वाढतील का? यासाठीही अभ्यास चालू आहेत.एक प्रकारचे औषध आहे जे अलीप्ततेवर फायदा होतो आहे असे दिसते.हे जे औषध आहे ते परत पॅच स्वरुपात वापरले जाणारे आहे.ते भारतात मिळते पण थोडेसे महागडे आहे.महिन्याला चारपाच हजार लागू शकतात.या पॅचमुले पीडीचे दृश्य स्वरूपातील त्रासही कमी होतात असे ऐकले आहे.अजून तरी मी कोणत्याही रुग्णासाठी हे वापरले नाही.पण ज्याना विस्मृतीचा त्रास आहे ज्याला आपण डिमेन्शिया ( Dementia ) म्हणतो.अशा रुग्णात हे औषध गेली बरेच वर्षे आम्ही वापरत आहोत.याच औषधाचा अलिप्ततेतही फायदा होईल.
आत्तापर्यंत पीडीमध्ये डॉक्टर किंवा पेशंट फक्त दोन ते तीन गोष्टीवरच लक्ष देतात.कंप किती आहे,.पायाच्या हालचाली किती मंद झाल्या आहेत,बोलणे किती हळू झाले आहे.पण बाकीच्या गोष्टी ज्याना Nonmotor Symtoms म्हणतात.यात विस्मृती,हायपोटेन्शन,भास,अलिप्तता,बद्धकोष्ठता इत्यादींचा समावेश होतो.त्यासाठी वेगळ्या प्रकारची औषधेही पीडीच्या पेशंटसाठी असू शकतात.त्यांचा फायदा झाला तर आयुष्याची गुणवत्ता सुधारू शकते.असे बर्याच अभ्यासात लक्षात आले आहे.त्यामुळे अशा लक्षणावारही औषधे निर्माण करण्यासाठी प्रयोग चालू आहेत.
Nonmotor Symtoms मध्ये भासाची समस्या बर्याच पेशंटमध्ये आढळते.भासासाठी बरीच औषधे प्रचलित आहेत.Vidnypin सारखीसारखी अनेक औषधे पीडीमध्ये भास कमी करण्यासाठी वापरली जातात.फक्त पार्किन्सन्स पेशंटना होणारे भास यावरही संशोधन चालू आहे.असे औषध पुढच्या एकदोन वर्षात येण्याची शक्यता आहे.पण ही औषधे येण्यात बर्याच धोरणात्मक आर्थिकव्यवस्थेशी निगडीत अडचणी,अडथळे येतात.ज्या कंपनीचे औषध आहे,ती विचार करणार, भारतात औषध द्यायचे की नाही,दिले तर त्याची किंमत काय असेल.कारण परदेशातील किंमत भारताच्या दसपट असते.एवढी महागडी औषधे द्यावीत का? की भारतासाठी किंमत कमी ठेवावी?किंमत कमी ठेवली तर ती औषधे स्मगल होतील का?अशा अनेक गोष्टींवर त्याना विचार करावा लागतो.भारतीय सरकार आणि भारतीय संस्था अशा प्रकारची औषधे भारतात आणू शकतात.पण मग ते औषध युरोपीय लोकांवर उपयोगी पडते,तसेच भारतीय लोकांवर उपयोगी पडेल का? याचा भारतीय लोकांवर वापरून वेगळा अभ्यास करावा लागेल.हे सगळे होऊन मग औषधे बाजारात येतात.
पार्किन्सन्स हा बर्यापैकी कॉमन आजार आहे.१% लोकात तो होऊ शकतो.म्हणून नवी औषधे विकसित करण्यासाठी भरपूर प्रयत्न चालू आहेत.मला खात्री आहे,पुढच्या २ते५ वर्षात बरीच नवीन औषधे बाजारात येतील.आणि पीडी पेशंटचे जगणे जास्त सुखकर गुणवत्तापूर्ण होऊ शकेल.
नवीन औषधे डॉक्टर आपल्याला सांगत राहतील.इंटरनेटवरती सुद्धा बरीच माहिती मिळू शकेल.पण असे होते की,एखाद्या माणसाला एखाद्या गोळीचा फायदा झाला की त्याची ब्रेकिंग न्यूज होते.आणि लोकाना वाटते झाल आता सर्व काही बरे करण्याची गुरुकिल्ली आपल्याला मिळाली आहे.तर हे आपण किती स्वत:साठी वापरायचे.हे डॉक्टरांशी बोलूनच ठरवावे.
पार्किन्सन्समध्ये ज्या शस्त्रक्रिया होतात त्याच्या तंत्रात पण बरेच बदल झालेले आहेत,होऊ घातलेले आहेत.अद्ययावत तंत्र वापरले जात आहे.अद्ययावत हार्डवेअर आणि सॉफ्ट्वेअर वापरली जातात.त्यामुळे पार्किन्सन्सच्या शस्त्रक्रियाही पूर्वीपेक्षा सोप्या झालेल्या आहेत.त्यामुळे फायदा होण्याची शक्यताही वाढली आहे.
अजून बरीच औषधे अहर्त पण ती पाईपलाईन मध्ये आहेत.प्राण्यांच्या पातळीवरच आहेत.हळूहळू ती बाजारात येतील.मग आपण त्यांच्याबद्दल बोलू शकू.परत एका वर्षाने आपण याच विषयावर बोलू.तेंव्हा सांगण्यासारखे बरेच काही असेल.
(डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी छापण्यास परवानगी दिल्याबद्दल तसेच सौ विद्या काकडे यांनी व्हिडिओ शुटींग केले व त्याआधारे व्याख्यान व प्रश्नोत्तरे यांचे लेखन केल्याबद्दल त्यांचे आभार.)
१२ जुलै २०१५ ला अश्विनी हॉटेल येथे झालेल्या पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या सभेत श्रोत्यांच्या प्रश्नाना डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी दिलेली उत्तरे.
प्रश्न १ – पार्किन्सन्सच्या औषधामुळे केंव्हा तब्येत बिघडेल सांगता येत नाही त्यामुळे सकाळी फिरावयास जाणे,व्यायाम करणे जमत नाही यासाठी काय करता येईल.
उत्तर -औषधांचे डोसेस हे प्रत्येक पेशंटनुसार वेगळे असतात.त्यामुळे सर्वाना एक असे सर्वसाधारण विधान करता येणे अवघड आहे.लीओडोपा घ्यावयास सुरुवात केल्यावर सुरुवातीला चांगले परिणाम दिसून येतात.परंतु मेंदूतल्या पेशींचे प्रमाण जसे कमी कमी होत जाते.तसतसे गोळीचा परिणामही कमीकमी होत जातो.आधी ज्या गोळीचा परिणाम आठ तास दिसेल मग पाच तास,मग तीन तास,असे करत कदाचित पुढे दोन तासही दिसणार नाही.गोळीचा परिणाम कमी झाला की,सर्व शरीर ताठरते.मग पेशंट Off पिरिएड मध्ये जातो.त्यातून बाहेर येण्यासाठी अजून एक गोळी पेशंट घेतो.ज्या पेशंटचा आजार वाढलेला आहे त्याना आम्ही सांगतो,७,१२,५किंवा ७,११,३,७,१० अशी जी वेळ ठरवलेली असेल त्यात अर्धा तास पुढे मागे करु शकता पण अगदी दोन तास वगैरे करता येणार नाही.असे झाल्यास Off पिरिएड वाढतो.त्रास वाढतो.डॉक्टरांकडून तुम्ही On पिरिएडचा जास्तीत जास्त वापर करता येईल अशा प्रकारे गोळ्यांचा डोस अॅड्जेस्ट करून घ्या.On वेळेचा जास्तीत जास्त वापर करता येईल अशी दिनचर्या आखा.म्हणजेच सकाळी उठल्या उठल्या पहिली गोळी घेतली की,त्या On वेळेत सकाळचा दिनक्रम् व्यवस्थित पार पडता येईल,व्यायाम करु शकाल.जेवणाच्या आधी घेतली तर जेवण व्यवस्थितपणे करू शकाल.संध्याकाळी घेतली तर फिरता येऊ शकेल.रात्रीच्यावेळी,एखादी दीर्घकाळासाठी परिणाम करणारी गोळी घेतली तर रात्रीच्यावेळी कूस बदलण्यास त्रास होणार नाही.Extended release च्या गोळ्यांमुळे गोळ्यांची संख्या कमी होऊ शकेल.
थोडक्यात सांगायचे तर रोपार्क ही गोळी तीनदा घ्यायला लागते पण त्याची एकदा घ्यावयाची गोळी मिळते.याप्रमाणे गोळ्या कमी व्हायची शक्यता आहे.पण एकदा तुम्ही जर २० गोळ्या घेत असाल तर त्या १० वर येण्याची शक्यता कमी.त्यामुळे दिलेला डोस Optimum आहे असे समजा आणि नियमितपणे घ्या.
प्रश्न २ – पार्किन्सन्स किती टक्के आहे ते समजण्याचा काही मार्ग आहे का?
उत्तर – पार्किन्सन्स किती टक्के आहे हे सांगणे कठीण आहे.दोन प्रकारच्या स्केल आम्ही वापरतो.एक स्केल आहे त्यासाठी पेशंटला एक दीड तास तपासावे लागते.मग त्याची स्केल कळते.Yon & Yang ही स्केल सर्वसाधारणपणे वापरली जाते.त्यानुसार डॉक्टर पहिली अवस्था आहे की पाचवी हे सांगू शकतात.लक्षणे एका बाजूला आहेत की दोन्ही बाजूला हे पहावे लागते.एका बाजूला असल्यास पेशंटला इतरांची मदत लागत नाही.
दोन्ही बाजूला असल्यास थोडी मदत घ्यावी लागते.दोन्हीकडे लक्षणे आहेत आणि खूप जास्त मदत लागते,कधी कधी अंथरुणावरून पेशंट उठूच शकत नाही.अशा ज्या अवस्था आहेत.त्यांचे अवस्था ( स्टेज ) एक ते पाच असे वर्गीकरण करता येइल.एकुणात हे लक्षणावरूनच ठरवावे लागते
प्रश्न ३ – औषध घेतल्याने शरीराची हालचाल वाढते.आणि कमी केल्याने शरीरातील शक्तीच कमी होते.या मधील पातळी नाही का?
उत्तर – हो बरोबर आहे तुमचे म्हणणे.पार्किन्सन्स चा आजार एक तराजू आहे.औषध घेतले की पारडे जड होऊन पेशंट On होतो.आणि कमी घेतले की पारडे हलके होऊन पेशंट Off होतो.ही तारेवरची कसरत आहे.
प्रत्येक पेशंटमध्ये On आणि ऑफच्या अवस्था टाळता येतीलच असे नाही.गोळ्यांचे डोस कमी जास्त करून डॉक्टर फाईन ट्युनिंग करावयाचा प्रयत्न करतात.परंतु प्रत्येक पेशंटमध्ये ते होईलच असे असे नाही.लीओडोपाची गोळी घेतली की पहिल्या काही वेळात डोपामिनची लेव्हल वाढते.पुढच्या काही वेळात ती कमी होते.आपल्याला हवी असते तशी सातत्याने एक लेव्हल मिळणे शक्य होत नाही.मग अशा स्ट्रेट लेव्हल मध्ये राहण्याच्या आजूबाजूला एक उंबरठा ( Threshold ) असतो. या उंबरठ्याच्या लेव्हल मध्ये राहिले तर On आणि Off चा त्रास होणार नाही.पण हा उंबरठा हळूहळू कमी होत जातो..मग या कमी असलेल्या उंबरठ्यावरून तुम्ही खूप लवकर On आणि Off मध्ये जाता.हा उंबरठा वाढवणे डॉक्टरांच्या हातात नाही.ते शरीरानेच तुम्हाला दिलेले आहे. डॉक्टरांचे काम एवढेच की पेशंट उंबरठ्याच्या बाहेर जाणार नाही असा डोस adjust करणे.पण प्रत्येक वेळी On आणि Off टाळता येईलच असे नाही.काही पेशंट असे म्हणतात की On पिरिएड बरा असतो.आम्ही क्रिया करू शकतो.काही म्हणतात की on पिरिएड मध्ये इतक्या जास्त हालचाली होतात की शरीराला आवरणे कठीण होते.त्यापेक्षा थोडे ऑफ मध्ये राहिलेले चालेल.मग तुमचा किती On आणि किती ऑफ पिरिएड आहे ते पाहून त्यानुसार डोस Adjust केले जातात.काही पेशंटमध्ये तर शरीराच्या उजव्या बाजूला On तर डाव्या बाजूला ऑफ असतो अशा लोकात डोस कसा Adjust करणार?
प्रश्न ४ – Thresholdम्हणजे काय हे अधिक स्पष्ट करावे.
उत्तर – Threshold हा तुमच्या मेंदूत किती पेशी शिल्लक आहेत त्यावर अवलंबून आहे.पार्किन्सन्स त्यावर अवलंबून आहे.पेशींची संख्या कमी झाली की Threshold हळूहळू कमी होतो.लीओडोपाचा परिणाम जास्त कमी, जास्त कमी होतच राहणार आहे.पण Threshold कमी झाला तर On आणि ऑफ वाढत जाते.पार्किन्सन्स च्या रुग्णात Threshold हळूहळू कमीच होत असतो.लीओडोपा आणि त्याबरोबर लीओडोपा agonist देऊन तो Threshold नियंत्रणात आणला जातो.ज्या पेशंटना खूप जास्त On आणि Off चा त्रास आहे.त्याना आम्ही Amlodipin ची गोळी देतो.त्यांनी त्रास कमी होतो पण जास्त दिले तर भास व्हायला लागतात.परत ही तारेवरची कसरत आहे.
प्रश्न ५ – वय वर्षे ८०असलेल्या पेशंटने डीप ब्रेन स्टीम्यूलेशनची( DBS ) शस्त्रक्रिया करावी का?
उत्तर – वय ८० ला पेशंट किती क्रियाशील आहे त्यावर ते ठरवावे लागेल.आमचे एक डॉक्टर वय वर्षे ९० ला ओपीडी बघतात.नियमित काम करतात.मग ती शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि पेशंट यांनी चर्चा करून ठरवावे.याबाबत सर्वसाधारण असे विधान करता येणार नाही.पेशंट या वयात कार्यरत असेल,मनाने सुदृढ असेल आणि त्याला इतर कोणताच आजार नसेल अशा पेशंटना DBS शस्त्रक्रियेचा उपयोग होईल.शस्त्रक्रियेतील रिस्क आता बर्यापैकी कमी झाली आहे.
प्रश्न ६ – शस्त्रक्रिये नंतर on / off होत असेल तर काय करावे.?
उत्तर – गोळ्यांचा डोस अॅड्जेस्ट करून जसे on / off वर नियंत्रण केले जाते .तसेच शस्त्रक्रियेनंतर बॅटरीचा चार्ज कमी जास्त करून नियंत्रण करता येते.नॉनमोटर लक्षणांवर शस्त्रक्रियेचा फायदा होत नाही.शस्त्रक्रिया ही
मुख्यत्वे मोटर सिम्पटम्ससाठीच असते.पेशंटला भास,डीमेन्शीया अशी नॉनमोटर लक्षणे मोठ्या प्रमाणावर असतील तर शस्त्रक्रियेचा फायदा होत नाही.खूप प्रमाणात on / off असेल, मंद हालचाली ( Bradykinesia )असतील तर त्याला शस्त्रक्रियेचा उपयोग होतो.
प्रश्न ७ – शस्त्रक्रियेचे फायदे दिसायला कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती वेळ लागतो?
उत्तर – शस्त्रक्रियेचा फायदा हा पहिल्या दोन तीन आठवड्यातच दिसायला लागतो.मग पेशंटच्या लक्षणानुसार
गोळ्यांप्रमाणेच बॅटरी अॅड्जेस्ट करायला लागते.
प्रश्न ८ – शस्त्रक्रिये नंतर नळी बाहेर लोंबकाळते का?
उत्तर – नाही नळी बाहेर दिसत नाही.ती शरीराच्या आत असते.तुम्ही अंघोळ करु शकता,डोक्यावरून पाणी घेऊ शकता,तेल लाऊ शकता.
प्रश्न ९ – पार्किन्सन्समध्ये पेशी मरतात हळूहळू कमी होतात.हे नुकसान किती झाले आहे हे मोजणारे
Biochemical Parameters आहेत का? बायोप्सी करता येते का?
उत्तर – Substantia nigra हा मेंदूतील असा भाग आहे की ज्याला आपण हात लाऊ शकत नाही.हात लावला तर ऑपरेशन टेबलवरच काहीही होण्याची शक्यता असते.त्या ठिकाणी दुसरा काही आजार,ट्युमरअसेल तर डॉक्टर १००% हात लावणार नाहीत.कारण Substantia nigraच्या आजूबाजूला खूप महत्वाचे structures आहेत.
Biochemical Parameters अजून आला नाही.
तसेच Substantia nigra महत्वाचा नाही तर Substantia nigra मध्ये तयार होणार्या पेशी (cells )मधून Basal Ganglia या भागात किती प्रमाणात activation होते त्यावर सर्व अवलंबून आहे. Substantia nigraमधील पेशी १० च आहेत पण त्यांची क्रिया चांगली होत असेल तर त्या दहा पेशी उत्तमच आहेत.आणि पुरेशाही आहेत.
प्रश्न १० – पीडी आणि दृष्टी तसेच पीडी आणि मूत्र संस्था यांचा काय संबंध आहे.
उत्तर – पीडी मुळे दिसण्यावर काही परिणाम होत नाही पण काही पेशंटमध्ये ज्याला PSP म्हणतात तो आहे
त्यांना डोळ्यांच्या हालचाली स्लो होतात त्त्यामुळे पटकन एकीकडून दुसरीकडे बघता येत नाही
लघवीची समस्या मात्र पीडीच्या बर्याच पेशंटमध्ये दिसते.जसजसे वय वाढते तसे प्रोस्टेट सारख्या त्रासानेही लघवीचा त्रास होतो.पार्किन्सन्सचा आजार बर्यापैकी जुना झालेला असेल अशा पेशंटना लघवीचा त्रास होऊ शकतो.लघवीला घाई होणे, रात्री बर्याचवेळा कपडे खराब होणे,लघवीला जोर करावा लागतो यासारखे त्रास होऊ शकतात. मग हा त्रास प्रोस्टेटचा आहे का हे आम्ही पाहतो.आणि त्याला वेगळ्या प्रकारे उपचार केले जातात. युरॉलॉजिस्टच्या सल्ल्याने काही औषधे घेतली तर आपला त्रास कमी होतो.
प्रश्न ११ – संशोधनासाठी देहदान करायचे असेल तर तशी व्यवस्था आहे का?
उत्तर – हो तशी व्यवस्था आहे.जसे नेत्रदानाचा फॉर्म आपण आधीच भरून देतो तसेच देहदानाचा फॉर्म भरु शकतो.
प्रश्न १२ – संशोधनासाठी मेंदूचे दान करु शकतो का? माझी ओळखीच्या एका पेशंटने पुण्यात देहदान केले. त्यांना मेंदू दान करायचा होता.पण एकदा देहदान केल्यावर मेंदू देण्यास नकार मिळाला.त्यामुळे मेंदू दान पद्धत अत्यंत त्रांगडी वाटते.
उत्तर – आता सांगता येण अवघड आहे.कारण त्यापद्धतीच संशोधन होऊ शकत.बेंगलोरला एक संस्था आहे.त्यामध्ये एक ब्रेन बँक आहे.अशा पद्धतीच्या पेशंटचे मेंदू तेथे ठेवले जातात.आणि त्यावरील संशोधनाचा फायदा नंतर होऊ शकतो.या संस्थेत ठेवलेले मेंदू त्यांच्याकडे मृत झालेल्या लोकांचे असतात.आणि पेशंट ने आधी त्याबाबतचा फॉर्म भरलेला असेल तरच मेंदू घेतात..
प्रश्न १३ – बर्याचदा कोणी घरात घुसले आहे,मारते आहे,गळा दाबते आहे असे भास होतात.शांत झोप लागत नाही.
उत्तर – भास हा पूर्ण वेगळा विषय आहे.भासाची औषधे वेगळी,उपचार वेगळे.पीडीच्या गोळ्यांचा डोसही थोडाफार बदलावा लागतो.माझे असे म्हणणे आहे,पीडी झालेल्या प्रत्येक पेशंटला कधी ना कधी भास होतातच.त्या भासांकडे दुर्लक्ष करायचे.कारण ते भास आहेत काहीच खरे नाही.असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केल्याने भास असतील पण पेशंटला त्याचा त्रास होणार नाही.जगणे सुसह्य होते.पण हे भास खरे आहेत, सगळे नातेवाईक आपल्या विरुद्ध गेले आहेत असे वाटून पेशंट जेंव्हा पोलिसांकडे तक्रार करतो,तेंव्हा अशा पेशंटना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते.शरीरातील डोपामिनची लेव्हल वाढल्याने असे भास होतात.पीडी मध्ये डोपामिन लेव्हल कमी झालेली असते म्हणून गोळ्या दिल्या जातात.गोळ्या दिल्याने ती वाढते.भास हे बर्याचदा पार्किन्सन्स आजारामुळे होतात.त्यावरच्या औषधाने ते वाढू शकतात..त्यामुळे अशा पेशंटना डोपामिनची लेव्हल कमी करावी लागते.डोपामिन कमी केल्याने पीडी वाढू शकतो.त्यामुळे परत ही तारेवरची कसरत आहे.भासाचा त्रास पण व्हायला नको.आणि पीडी पण आटोक्यात राहिला पाहिजे.वेळ प्रसंगी पेशंटला अडमिट करून उपचार करावे लागतात.काही पेशंटना इतके जास्त प्रमाणात भास होतात की त्यांना आयसीयूमध्ये २४ तास दाखल करावे लागते..बांधून ठेऊन सलाईन देऊन २४ तास झोपून ठेवावे लागायचे.
दोन पाच वर्षे भास चालू आहेत असे अनेक पेशंट माझ्याकडे आहेत.त्याना भासाचा त्रास होत नाही कारण ते ,भास आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे, हे ते करू शकतात.
बद्धकोष्ठही पीडी पेशंटमध्ये आढळते.बद्धकोष्ठ व पीडी हातात हात घालून जातात.खरे तर पीडी होण्यापूर्वी सात आठ वर्षे तरी बद्धकोष्ठचा त्रास सुरु झालेला असतो.जर एखाद्याला हा त्रास नसेल तर पीडीचे शिक्कामोर्तब करण्यापूर्वी त्याला पीडी आहे की नाही याचा मी दोनदा विचार करतो.यासाठी बर्याच प्रकारची औषधे द्यावी लागतात.काही लोकांना एनिमा पण द्यावा लागतो.
प्रश्न १४ – Rewas treatment काय आहे?
उत्तर – Rewas म्हणून एक औषध आहे.ते पॅचच्या स्वरुपात मिळते.एका महिन्याचा पॅचचा खर्च तीन ते चार हजार आहे.एका पॅचची किंमत १०० ते १५० रुपये असते.अंघोळीनंतर लावायचा दुसर्या दिवशी अंघोळीच्यावेळी काढायचा.अंघोळीनंतर दुसरा लावायचा.पण ते तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच वापरा.त्याची खरच गरज आहे का ते बघून ठरवा.
प्रश्न १५ – पुण्यात DBS शस्त्रक्रिया करतात का?
उत्तर – पुण्यात DBS शस्त्रक्रिया तेव्हड्या प्रमाणात होत नाहीत.पुण्यात एके ठिकाणी सुरु झाली आहे.पण डॉक्टर बाहेरून येऊन करतात.मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया येत्या १/२ वर्षात सुरु होण्याची शक्यता आहे.बेंगलोर,मुंबई,हैद्राबाद,या ठिकाणी लोक शस्त्रक्रियेसाठी जातात.
प्रश्न १६ – स्टेमसेलबद्दल काही माहिती द्या.
उत्तर – स्टेमसेल थेरपीचा फायदा होईल असे १९९० मध्ये सांगितले गेले.त्याला आता जवळजवळ २० ते २५ वर्षे झाली.तेंव्हा मी विद्यार्थी होतो.आणि परीक्षेत लिहायचो स्टेमसेल नावाची थेरपी आहे त्याचा पीडीला फायदा होईल.पण गेल्या २५ वर्षात ती थेरपी पुस्तकातच राहिली.त्याचा पेशंटना काही फायदा झाला नाही.काही वेळा असे सांगितले गेले की स्टेमसेल थेरपीने सगळे आजार बरे होऊ शकतात.असे औषध म्हणजे अमृतच म्हणावे लागेल.अजून तरी असे औषध जगात कुठेही आलेले नाही.एकाच औषधाने मुलाचा मतीमंदपणा पण बरा होईल,डायबेटीस बरा होईल आणि पार्किन्सन्सही बरा होईल.पण असे होणे नाही.मग आम्हा डॉक्टरांची गरजच नाही.जाऊन फक्त ते औषध घ्यायचे.स्टेमसेलमध्ये क्षमता आहे पण अजून ते संशोधनाच्या पातळीवरच आहे.दुर्दैवाने संशोधनाच्या पलीकडे गेलेले नाही.
प्रश्न १७ – पार्किन्सन्स अनुवांशिक आहे का?
उत्तर – पार्किन्सनच्या पेशंटमध्ये अनुवंशिकता खूप कमी असते.५% पर्यंत शक्यता आहे.ज्यांचा पार्किन्सन्स तरुण वयात सुरु झालेला. आहे.ज्यांच्या नात्यात पण कुणाला झालेला आहे अशा लोकांत तो अनुवांशिक असू शकतो.जगामध्ये असे काही भाग आहेत की,जेथे अनुवंशिक असू शकतो.पण भारतात याचे प्रमाण ५% पेक्षा कमी आहे.
प्रश्न १८ – इन्शुरन्स कंपनी कधी कधी क्लेम देत नाहीत त्यासाठी काय करावे.
(या प्रश्नाचे उत्तर रामचंद्र करमरकर यांनी दिले.)
तुम्ही इन्शुरन्स काढता तेंव्हा तुम्हाला जेजे विकार असतील त्या कशावरही इन्शुरन्स कंपनी तुम्हाला काही देत नाही.हा विकार जर इन्शुरन्स काढल्यावर झाला असेल तर नियमाप्रमाणे क्लेम मिळेल.म्हणून आधी त्या नियमांची खातरजमा करावी आणि मग इन्शुरन्स घ्यावा.
माझ्या आईला २० ते २२ वर्ष्यापासून पार्किन्सन चा त्रास आहे dr. syndopa plus हि गोळी ३ वेळा pramiprex er १.5 सकाळी १० वाजता सांगितली आहे.पण हि औषधे 5 वर्षापूर्वी सुरु केली आहेत.तिला बी.पी.,शुगर आहे.७-८ वर्षापूर्वी स्ट्रोक चा त्रास झाला होता पण वेळीच लक्ष्य दिल्याने आटोक्यात आला. पण त्यामुळे डाव्या पाय जड झाला आहे व तो सतत हलत असतो. पार्किन्सन मुळे डावा हात व डावा पायाच हलतो .तेव्हा हि औषधे बरोबर आहेत का व याचा डोस एव्हढंच ठेवावा कि कमी करावा हे सांगा.