मायेऽऽ,अन्न वाढा हो,.. भुकेल्याला शिळी भाकर द्या हो …आंधळ्याला पैसा दे भगवान, पार्वती बोले सदाशिवा,… दे दान सुटे गिरान या विनंत्या आपण ऐकतोच आणि आता या चालीवर एक नवी याचना आपल्या घराघरांमधून ऐकतो …. एसेमेस वाढा वो मायबाप ! मला मत द्या हो! माझा कोड आहे अमुक-अमुक!
नवनवीन स्पर्धा आणि इडियट बॉक्सने इडियट करून ठेवलेल्या आपल्या तमाम प्रेक्षकांच्या खिशाला आवाहन!!
रस्त्यावर देवळापाशी उभ्या असलेल्या भिकार् याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि निघून जातो. सिग्नलला गाडी थांबली की उघड्या वाघड्या बारक्या पोरांचा प्रशिक्षित जथा चेहऱ्यावर केविलवाणे भाव आणून आपल्याला भिडतो. हल्ली सकाळच्या वेळी फिरायला निघालो की शहरातील रस्त्यांवरून, कडकड आवाज करत स्वतःच्या उघड्या अंगावर चाबकाचे फटकारे मारत पोतराज आपल्यापुढे हात पसरतो. आपल्याला चिकटू पाहतो. हॉटेलात काही खायला गेलो तर बाहेर पडल्यापडल्या भिकारी कलावंत हातात लहान मूल घेऊन आपल्याकडे भयाण व्याकुळ नजरेने पाहतात आणि आपल्या खिशाचा एक्स रे काढतात . आपण हॉटेलमध्ये खाणे महापाप आहे ही भावना त्या नजरांनी आपल्याला भोसकू पाहते. ही सर्व माणसं आपण टाळू शकतो. पण एसएमएस मागणारे भिकारी कलावंत आता थेट आपल्या घरात घुसले आहेत. त्यांच्यात आणि एका गोष्टींमध्ये खूप साधर्म्य आहे ,मला ते नेहमी खूप जाणवतं. काही गुंडांच्या टोळ्या लहान लहान मुले पळवतात. त्यांना भीक मागण्याचे प्रशिक्षण देतात आणि मग भीक मागण्याच्या जागा ठरवून देऊन तिथे भीक मागण्याची नोकरी देतात. माणसाच्या अंतःकरणाल्या दयेचा व्यापार होतो. सगळ्या शहरभर पसरलेल्या भिकाऱ्यांकडून गोळा केलेल्या भिकेतून ही गुंडांची टोळी आपल्या चैनी पूर्ण करते. त्यांचा बॉस रुबाबदार पणे महागड्या गाडीतून फिरतो. कुठेतरी छोटीशी देणगी देतो.लहान मोठे उपक्रम करतो आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवून घेतो.
याच प्रकारचा भिकेचा नवा सुधारित फंडा अत्याधुनिक टोळ्यांनी स्वीकारलेला आहे.. आता त्यांना गरिबांची मुले पळवावी , शोधावी लागत नाहीत आणि चोरावीही लागत नाहीत. श्रीमंतांची, मध्यम वर्गातली पोरंपोरी आपणहून त्यांच्याकडे चालत येतील असे वातावरण ते तयार करतात. इंडियन आयडॉल, स्वप्न स्वरांचे,आयडिया सारेगमप , ताक धिना धिन, अंताक्षरी, हास्य सम्राट ,सुपरस्टार,आणि अशा बऱ्याच काही वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून ती मुलं कलाकारांच्या वेषात तुमच्या पुढे उभी केली जातात. स्पर्धांचा देखावा होतो. जोरदार …!! परीक्षक नेमले जातात.ते मार्कही देतात, सल्लेही देतात आणि एवढं सगळं करून सुद्धा शेवटी मात्र या मुलांचे भवितव्य लोकांनी पाठवलेल्या एसेमेस वर अवलंबून ठेवले जाते. या चकचकीत, झगमगित स्टेजवरून ही चांगल्या घरातली मुलं आपल्याकडे एस एम एस ची भीक मागतात.
आयुष्यात इतरत्र भिकारी रस्त्यावर आपल्याला अडवत असतात आणि हे नव्याने तयार केलेले भिकारी टीव्हीवरचे कार्यक्रम आपण पाहत असताना दर पाच-दहा मिनिटांनी आपल्याला गाठतात. भारताची तरुण पिढी एस एम एस ची भीक मागताना अत्यंत केविलवाणी दिसते.
एकीकडे गुणवत्ता म्हणायचे तर एसेमेस चे मतदान कशासाठी? राज्य चालवणारा लोकप्रतिनिधी निवडताना आम्ही थेट मतांची भीक मागतो आणि घालतो पण!
इथे तर रोज एसएमएसच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या खिशातून लाखो रुपयांची लूट केली जाते . लोकांना भावनिक आवाहन करून एकेका घरातून हजारो रुपये लुबाडले जातात. रस्त्यावर भिकाऱ्यांचे सैन्य उभे करण्यापेक्षा हा किफायतशीर धंदा आहे.
टीव्हीवरच्या एका वाहिनीला जाहिराती मिळत नव्हत्या. त्यांनी गाण्यांची स्पर्धा लावली. स्पर्धेसाठी बजेट तयार केले 25 लाखांचे ! 25 लाखांच्या बजेट साठी एसेमेस चे पीक काढायचे ठरले. शहरा शहरांतून जाहिरात करून मुलं निवडली. ती निवडताना त्या शहरांच्या आर्थिक गणितांचा विचार केला गेला. मुलांच्या जातींचाही आणि मग प्रत्येक स्पर्धका मागे दर दिवशी हजारो एसएमएसचा पाऊस पडू लागला. फोनी कंपनीशी केलेल्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे दर एसेमेस मधून 50 टक्के हिस्सा टीव्ही वाहिनीला मिळू लागला. कंपनीचाही धंदा वाढला आणि मग टीव्ही च्या वाहिनीला 25 लाखाच्या भांडवलावर सव्वा कोटी रुपये मिळाले. जाहिराती मिळाल्या. स्पर्धकांना काय मिळालं… तर फुक्कट गाण्याची संधी! रस्त्यावरचा पेटीवाला भिकारीही गातोच की. पण लोक त्याला काहीतरी बक्षिशी देतात…. थेट. इथे सगळं काही…,,कोण्या म्हणे नामवंत (?) दिग्दर्शकाबरोबर संधी!
हे सगळे दिसायला चांगलं असलं तरी हा चॅनलवाल्यांचा धंदा आहे. प्रेक्षकांना भावनिक आवाहन करून एसएमएसचे पैसे लुबाडायचे. दर सेकंदाच्या जाहिरातीचे पैसे करायचे. आम्ही कार्यक्रम पाहायचा. त्यांचा टीआरपी वाढवायचा. आमची पोरं स्टेजवर फुकट उभी करायची. हजारो-लाखो प्रेक्षकांसमोर यांनी त्यांचा अपमानही करायचा. गचांडी मारल्यासारखे त्यांना तिथून हाकलायचंही. या प्रसंगाच्या रडारडीचेही पैसे करायचे. पुढे गुणवत्ता असलेल्या आणि अशा अंतिम फेरीत आणलेल्या किंवा आलेल्या( त्यातही प्रादेशिक तोल सांभाळून मुंबई दिल्ली हे गणित सांभाळायचे ) स्पर्धकांना प्रेक्षकांकडे आवाहन करून एसएमएसची भीक मागायला लावायची. त्या गोळा होणारॅ भिकेवर त्यांचे इंडियन आयडॉल, हास्यसम्राट, महागायक, महानर्तकी किंवा तत्सम भंकस लेबलं अवलंबून ठेवायची. ज्याला जास्त भीक मिळेल तो विजेता. अनेक स्पर्धांमध्ये ही भीक कमी मिळाली म्हणून गुणवंतांवर अन्याय होतो . एखादा कमी लायकीचा स्पर्धक त्याच्या प्रादेशिक आवाहनामुळे जास्त भीक मिळवून विजयी होतो. हे विजेतेपद टिकाऊ आहे? आणि यातले किती विजेते पुढे आयुष्यात विजय मिळवतात?
असो त्यांना भीक मागू द्या. आपण मात्र नक्की ठरवूया यापुढे अशी भीक घालणार नाही. अखंड भारताचे स्वप्न पूर्ण झाले नाहीच.पण स्वतःच्या आर्थिक स्वार्थापायी ही टीव्ही वाली /चैनल वाली मंडळी नवा प्रादेशिक अलगतावाद तयार करत आहेत. भारताचे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ असे झोन करून तुकडे करतात तर कोणी पुणे विरुद्ध कोल्हापूर, मुंबई विरुद्ध नाशिक विरुद्ध मराठवाडा औरंगाबाद असे महाराष्ट्राचे तुकडे करणारे अलगतावादाचे विष लोकांच्या मनात भिनवत आहेत. लोकांच्या मनात मी भारताचा,मी महाराष्ट्राचा अशी भावना येण्याऐवजी मी पुण्याचा, मुंबईचा ,औरंगाबादचा, लातूरचा अशी विषवल्ली मना मनात रुजते आहे.त्यातही जातींचा विचार होतो . रस्त्यावरच्या भिकाऱ्याला आपण निर्विकारपणे भीक देतो. एसेमेस स्वरूपात दिली जाणारी भीक विषारी होते. इथे एसे मेसेचे दान जातीवर,प्रदेशावर, दिसण्यावर दिले जाते आणि मग त्यातून स्पर्धकांची आणि नागरिकांची पण मने पूर्णपणे खराब होतात
तेव्हा या फोनी आणि चॅनल कंपनीला आमची विनंती आहे की हे समाजाला नासवायचे धंदे आता बंद करा. चित्रविचित्र विकृत जाहिराती आमच्या अंगावर तुम्ही फेकताच. आमच्या मनात आता असे काही विकृत चित्र तयार करू नका. स्टेजवर उभ्या केलेल्या तरुणाईला येथे खरोखर गुणवत्तेलाच न्याय मिळतो हे पटले पाहिजे.
लेखक : किरण सरदेशपांडे
खरमरीत शब्दात कानउघाडणी. स्वतःच्या आजारातल्या समस्यांना तोंड देताना समाजभान असणे कौतुकास्पद.