Thursday, November 21, 2024
Homeक्षण भारावलेलेक्षण भारावलेले - २ - शोभनाताई

क्षण भारावलेले – २ – शोभनाताई

आमची फिजिओथेरपिस्ट रेनिसा सोनी हिच्याकडे आम्ही काशीकरसरांची वाट पहात थांबलो होतो. बेल्ट बांधण्याचे प्रात्यक्षिक रेनिसाला दाखवण्यासाठी ते येणार होते. वेळेच्या बाबतीत ते अगदी काटेकोर, त्यामुळे मला थोडी काळजी वाटत होती. श्री. मोरेश्वर काशीकर हे आमचे शुभार्थी. आज ते ७६ वर्षांचे आहेत. २०११ साली त्यांना पार्किन्सन्स झाला.

१९६१ साली पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून काशीकरसर इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून उत्तीर्ण झाले. पुढे जवळजवळ ३९ वर्षे त्यांनी नोकरी केली आणि निवृत्त झाल्यावर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्रासंबंधित सल्ला आणि सेवा देणे सुरू केले. त्याचबरोबर त्यांनी योगोपचाराचे प्रशिक्षण आणि सेवाही सुरू केली. पुण्यातील प्रसिद्ध कबीरबागेत ते शिकवायला जात होते. कबीरबागेत शिकवल्या जाणा-या योगोपचारात वेगवेगळी साधने वापरली जातात, त्यात बेल्ट्सही असतात. हे बेल्ट्स बांधण्याचे कौशल्य सरांनी आत्मसात केले.

पार्किन्सन्सच्या आजारात शुभार्थी पाठीतून वाकतात. त्यासाठी काशीकरसरांनी सुचवले होते, की शुभार्थींनी सुरुवातीपासूनच बेल्ट बांधण्याची सवय लावून घेतली, तर ही वाकण्याची क्रिया कमी व्हायला मदत होते. आतून बेल्ट बांधून वरून शर्ट घालून बाहेर वावरणे सहज शक्य असते. एकदा त्यांनी अश्विनी सभागृहातील कार्यक्रमातही हे बेल्ट बांधण्याचे प्रात्यक्षिक दाखवले होते. ते पाहिल्यानंतर ब-याचजणांनी त्यांना घरी बोलावले आणि त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन काशीकरसर बेल्ट कसा बांधायचा ते दाखवायचे. ह्यापूर्वी ते आमच्या घरीदेखिल त्यासाठी येऊन गेलेले होते.

पार्किन्सन्सच्या बाबतीत सरांचे सातत्याने स्वत:च्या शरीरावरही प्रयोग करणे सुरू असते. मंडळाच्या २०१५ सालच्या स्मरणिकेमध्ये त्यांनी ‘ट्रिमर्सशी मैत्री – एक प्रयोग’ हा स्वत:वर केलेल्या प्रयोगांवर आधारित एक उत्तम लेख दिला होता. त्यांनी संशोधन म्हणूनच हा प्रयोग केलेला होता. ह्याचा उपयोग होवो अथवा नाही, पण निदान करून पहाण्यास तरी हरकत नाही, अशी त्यांची त्या संशोधनामागची भूमिका होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या प्रयोगावर लिहीले होते.

एकंदरीतच योगोपचाराबद्दल त्यांना अतिशय आस्था. त्यामुळे प्रत्येकाने दररोज व्यायाम केला पाहिजे, असे ते सतत सांगायचे. स्मरणिकेतल्या लेखाखाली त्यांचा फोन नंबरही दिला असल्यामुळे बरेचजण फोन करून त्यांना बोलवत. सुरुवातीला ते स्कूटर चालवायचे, तेव्हा प्रत्येकाच्या घरी स्कूटरवरून जात असत. काही काळाने पार्किन्सन्समुळे त्यांच्या पायामध्ये काही समस्या निर्माण झाली, मग स्कूटर चालवणे बंद करून ते रिक्षाने जाऊ लागले. ‘सर्वांना मी हवे तितक्या वेळा प्रात्यक्षिक दाखवण्यास तयार आहे, पण पुढे त्याचा उपयोग करून घेताना कोणी दिसत नाही,’ ह्या एकाच गोष्टीचे सरांना वाईट वाटायचे. सर कधी आले नाहीत तर ब-याचदा मला त्यांना फोन करावासा वाटायचा, पण त्याचवेळी भितीसुद्धा वाटायची. कारण ते मलाही पहिला प्रश्न ‘रक्तदाब कसा आहे तुमचा, मी शिकवलेली आसने करताहात की नाही’ हाच विचारायचे. माझी पंचाईत अशी व्हायची, की खोटे बोलण्यासाठी जीभ रेटायची नाही आणि खरे बोलायची लाज वाटायची, कारण मी काही व्यायाम केलेला नसायचा. पण तरीसुद्धा न चिडता सर कितीही वेळा पुन्हा बोलावले तरी यायचे, आणि आता फिजिओथेरपिस्टकडेही ते त्यासाठीच येणार होते.

सरांनी दाखवल्यानंतर ब-याच वेळा मी प्रयत्न केला, पण माझ्याकडून ते बेल्ट बांधणे योग्य त-हेने होत नव्हते हा एक भाग. दुसरे म्हणजे फिजिओथेरपिस्टला दाखवले की तिच्या फिजिओथेरपीनंतर ती तो बेल्ट बांधून देईल, हा हेतू होता. आमच्या फिजिओथेरपीस्टलाही ते शिकण्यात रस होता. रेनिसा सोनी नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकत असते.

अजून का बरे आले नाहीत ह्या विचारात आम्ही असतानाच सर आले. ते आत शिरले तेव्हा लक्षात आले, की ते एकदम फ्रिझ झाले आहेत. त्यांना हा फ्रिझिंगचा त्रास सुरू झाला आहे, ह्याची मला कल्पना नव्हती. फ्रिझिंग म्हणजे माणसाचा काही काळापुरता एकदम पुतळा होतो, त्याला अजिबात हालचाल करता येत नाही. पार्किन्सन्सच्या काही लोकांना हा त्रास होत असतो. ही तात्पुरती अवस्था असते, अशावेळी माणसे अगदी घाबरून जातात. पण सर काही गडबडले नाहीत. त्यांनी शांतपणे मला हात केला, तेथे असलेल्या सहाय्यकाला बोलावून घेतले आणि त्याला धरून ते कसेबसे आत आले. मी त्यांना बसायला खुर्ची दिली, त्यावर ते बसले. हे सगळे पाहून मला कानकोंडल्यासारखे झाले आणि मी त्यांना विचारले, ‘तुम्हाला असा त्रास होतोय हे तुम्ही आम्हाला सांगितले असते तर आम्ही आलो असतो तुमच्या घरी.’ ह्याच्याआधी हे बेल्ट बांधणे शिकायला आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावर सर म्हणाले, ‘नाही, मला त्यात काही अडचण नाही.’ तशाच अवस्थेत खुर्चीत बसून ते पुढे म्हणाले, ‘अहो, कितीतरी वेळ मी रिक्षासाठी उभा होतो, पण रिक्षा काही मिळेना. मग माझा मुलगा विमानतळावर चालला होता, त्याने मला इथे सोडले. म्हणून मला यायला उशीर झाला. त्याबद्दल रिअली सॉरी.’ ते ऐकून मला अतिशयच अवघड वाटले. त्यांनी खरेतर आता मी येत नाही असेे सांगितले असते तरी चालणार होते, तरीही अशा अवस्थेत ते इथेपर्यंत आले होते आणि प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी उत्सुक होते. इतका त्रास सोसूनही काशीकरसर येतात, हे पाहून माझ्या डोळ्यात अक्षरश: पाणीच आले.

स्वत: सर मात्र शांत होते. कारण फ्रिझिंग झाल्यावर काय करायचे ह्याबद्दल त्यांच्या डोक्यात ठोकताळे होते. त्याप्रमाणे त्यांनी केले आणि ते फ्रिझींगमधून थोडे बाहेर आले. त्यांनी रेनिसाला ते बेल्ट बांधून दाखवले. मला खूप आश्चर्य वाटले. काशीकरसरांची लोकांना शिकवण्याची ही धडपड कमालीची होती. अशा परिस्थितीत कोणीही काही करायला कुठे जायचा विचारही केला नसता, पण सरांनी तो विचार तर केलाच, शिवाय ते करताना, मी फार काहीतरी करतोय, अशा त-हेचा कोणताही आव नव्हता.

रेनिसालाही ते खूप आवडले. तिनेही हा उपाय फार छान असल्याची पावती दिली. फिजिओथेरपी झाल्यावर ती ह्यांना बेल्ट बांधायची आणि तो बांधल्यावर ह्यांना छान वाटायचे. तुम्ही दिवसभर जरी तो बेल्ट बांधून बसलात तरी काही अडचण वाटत नाही, इतका तो सोयीचा आहे. आश्चर्य म्हणजे, मी अनेकदा प्रयत्न करूनही मला तो बेल्ट बांधणे जमले नव्हते, पण काशीकरसर मात्र स्वत:चा स्वत:लासुद्धा बेल्ट बांधायचे. सभेला येताना म्हणायचे, मी बेल्ट बांधूनच येतो. तो ते स्वत:च स्वत:ला कसे बांधू शकायचे, ही माझ्यासाठी नवलाची गोष्ट होती.

रेनिसाला सर म्हणाले, ‘ह्यावेळी हा बेल्ट आपण पाठीत बाक न येण्यासाठी बांधला. पण तो आणखी विविध कारणांसाठी आणि आजारांसाठी वापरता येऊ शकतो. आम्ही जेव्हा हा अभ्यासक्रम केला, तेव्हा मी विविध प्रकारच्या रेखाचित्रे आणि जवळपास ४०० पानांच्या नोटस् काढलेल्या आहेत. माझ्याकडे सगळे साहित्य तयार आहे, जर कोणी शिकणारे असेल, तर माझी शिकवण्याची तयारी आहे.’ त्यावर रेनिसाने त्यांना, ती आणि तिच्या वरिष्ठ बाई मिळून शिकण्यासाठी येतील, असे सांगितले. त्यानंतर सर मला तुमची फिजिओथेरपिस्ट केव्हा येणार आहे असे पुन्हापुन्हा विचारायचे आणि त्याप्रमाणे मीही रेनिसाला विचारत असे. पण तिच्या व्यग्र वेळापत्रकामुळे तिला ते जमले नाही. नंतर नंतर सरांना काय सांगायचे हा प्रश्न मलाच पडायला लागला. पण ह्यावरून त्यांची हे ज्ञान पुढे जावे ह्यासाठी होणारी तळमळ लक्षात येते. पार्किन्सन्स मित्रमंडळात फिजिओथेरपीचे, इंजिनिअरिंग कॉलेजचे वगैरे बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या संशोधनप्रकल्पांसाठी येतात. त्या सगळ्यांना काशीकरसर मनापासून मदत करतात, पण ते स्वत: हाडाचे संशोधक असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हातात घेतलेल्या कामाचे गांभीर्य नसते, त्यांचा त्यांना खूप रागही येतो.

सध्या सरांचा पार्किन्सन्स थोडा वाढलेला आहे. त्यांचे फ्रिझिंग वाढले आहे. जानेवारी महिन्यात त्यांचा वाढदिवस असतो, म्हणून तुम्ही येताय ना विचारण्यासाठी त्यांना फोन केला होता. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, मंडळाच्या सभेमध्ये सुरुवातीची प्रार्थना सांगायचे काम काशीकरसर करतात. तर ती प्रार्थना सांगण्यासाठी ते यावेळेला असणार आहेत ना, हेही मला विचारायचे होते. त्यावर ते म्हणाले, ‘मला खूप अशक्तपणा आहे. त्यामुळे यावेळेला मी येत नाही, पुढच्या वेळेला मी नक्की येईन. मी सध्या पार्किन्सन्सच्या लोकांनी कोणता व्यायाम करावा, कसा करावा यासंदर्भात एक माहितीपत्रक करत आहे. रेखाचित्रे काढून माझे काम तयार आहे, तर ते बुकलेट आपण करू या.’ हे ऐकून मी स्तिमित झाले. तब्येतीच्या अशा परिस्थितीतही हे बुकलेट आपण काढावे आणि लोकांपर्यंत पोहोचवावे, ह्या त्यांच्या विचारांना ऐकून त्यांना केवळ ‘काशीकरसर, तुम्हाला हॅटस् ऑफ!’ असे म्हणावेसे वाटले. आता त्यांचे काम पुरे झाल्यावर आम्ही निश्चितच त्या बुकलेटच्या प्रति काढून सर्वांना देऊ. पण सरांच्या निमित्ताने एक नमूद करते, की आमच्या आजुबाजूला ज्या ज्या अशा उत्साही व्यक्ती आहेत, त्या सगळ्या आम्हाला सतत सकारात्मक ऊर्जा पुरवत असतात आणि त्यांच्यामुळेच आमच्या आयुष्यात असे अनेक भारावलेले क्षण येत असतात.

आज काशीकरसरांचा वाढदिवस आहे. पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे त्यांचे अभिष्टचिंतन. त्यांच्या ज्ञानाचा आम्हाला असाच कायम लाभ होत राहो, ही सदिच्छा.

शब्दांकन – सई कोडोलीकर.

अधिक माहितीसाठी
http://parkinsons-diary.blogspot.in हा ब्लॉग पहा.

www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.

Parkinson’s Mitramandal, Pune हे युट्युब चॅनेलसुद्धा अवश्य पहा.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क