सोमवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली होती. यावेळी स्पीच थेरपिस्ट डॉक्टर नमिता जोशी यांचे व्याख्यान झाले. सभेस ४०/५० जण उपस्थित होते.यावेळी शुभार्थींची तपासणीही त्यांनी केली
प्रार्थनेनंतर शुभंकर, शुभार्थी यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.वाढदिवसानिमित्त नारायण कलबाग यांनी राजगिरा वडी आणि वसू देसाई यांनी आंबा बर्फी आणली होती.
यानंतर विजयालक्ष्मी रेवणकर यांनी अनुवादित केलेल्या ‘पार्किन्सन्सविषयक मौलिक सूचना’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ शुभार्थी नारायण कलबाग यांच्या हस्ते झाले. शोभना तीर्थळी यांनी पुस्तकाची पार्श्वभूमी आणि विजयालक्ष्मी रेवणकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला.
शरच्चंद्र पटवर्धन यांनी श्रवणोपचार म्हणून छोटा एम पी थ्री प्लेअर शुभार्थीना मोफत दिला होता. त्याबद्दल मनोगत व्यक्त केले.शेखर बर्वे यांनी वैविध्यपूर्ण शब्दकोडी असणारे, घरातल्या सर्वांसाठी ज्ञान आणि मनोरंजन करणारे ‘फुल मनोरंजन’ हे मासिक सर्व शुभार्थीना मोफत दिले.त्यांनी आपल्या पत्नीवर याचा आधी प्रयोग केला होता.मेंदूला व्यायाम म्हणून हे साधन त्यांना उपयुक्त वाटले.
डॉक्टर नमिता जोशी आणि त्यांच्या सहकारी यांचे आगमन झाले आणि कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली.नमिता जोशी यांची ओळख शोभना तीर्थळी यांनी करून दिली.त्यांच्याबरोबर स्पीच थेरपिस्ट ऋतिका सोनटक्के,पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या साक्षी,निधी आणि फिजिओथेरपिस्ट मेघन फुटाणे आल्या होत्या.
डॉक्टर नमिता यांनी सुरुवातीला पार्किन्सन्ससाठी स्पीचथेरपीची थोडक्यात माहिती दिली.
पार्किन्सन्ससाठी घ्याव्या लागणाऱ्या गोळ्यांचा बोलण्यावर परिणाम होतो असे सांगितले.त्यामुळे गोळ्या घेतल्या घेतल्या फोनवर बोलायचे असेल तर तसे न करता गोळ्यांचा परिणाम संपत आल्यावर बोलावे असा सल्ला दिला.बोलताना आवाज,उच्चार, अनुनासिकता आणि सहजता यांचा विचार करण्याची गरज सांगितली.श्वासाची तीव्रता जितकी जास्त तितकी आवाजाची तीव्रता जास्त असते.श्वासाचे नियंत्रण,श्वास रोखण्याची क्षमता आणि बोलताना त्याचा वापर या बाबी महत्वाच्या असल्याचे सांगितले.’Think loud speak shout’ असा कानमंत्र दिला.याला अनुसरून सर्वांच्याकडून एक Activity करून घेतली.आपल्या आवाजाचे रेकॉर्डिंग करून व्यायामाने आवाजात फरक पडत आहे का हे पाहण्यास सांगितले.
यानंतर भ्रामरी प्राणायाम कसा करायचा हे सांगून त्याचे प्रात्यक्षिक करून घेतले.श्वास घेतला की पोट पुढे येणे,श्वास सोडताना पोट आत घेणे असा श्वासोच्छवास करायला हवा.
आता सर्वांची तपासणी करण्याचा तिसरा टप्पा सुरु झाला.ज्यांनी गोळी घेवून बराच वेळ झाला आहे त्यांची तपासणी आधी करण्यात आली.याबाबत सर्वांनी सहकार्य केले.
यावेळी उर्वरित शुभंकर, शुभार्थी एकमेकांशी ओळखी करून घेणे,बर्वे यांनी दिलेल्या पुस्तकातील कोडी सोडवणे, अनुभव शेअर करणे यात गुंतले होते.
नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकाची विक्रीही यावेळी करण्यात आली.