सोमवार दिनांक ११ मार्च रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली होती.
फिजिओथेरपिस्ट मेघन फुटाणे यांनी ‘पार्किन्सन्स शुभार्थींसाठी श्वसनक्रियेसंबधी फिजिओथेरपी’ या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले.सभेस ५०/६० जण उपस्थित होते.सुरुवातीला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टर दीपांजली कद्दू यांनी त्या करत असलेल्या नॉनमोटर सीम्पटम्स्च्या प्रयोगाविषयी माहिती दिली आणि त्यात सहभागी होण्यास सांगितले.भरत नाट्यम नृत्यांगना डॉक्टर मीनल भिडे या होमिओपाथी,बाखरेमेडी,आरईबीटी आणि नृत्योपचार याद्वारे शुभार्थींना मदत करू इच्छितात, त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली.ज्योत्स्ना सुभेदार यांनी वाढदिवसानिमित्त बर्फी देवून सर्वांचे स्वागत केले.अशोक पटवर्धन यांनी चहा दिला.
मृदुला कर्णीं यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि व्याख्यानाला सुरुवात झाली.वक्त्यांनी सुरुवातीला पार्किन्सन्सची विविध लक्षणे सांगून श्वसनाला त्यामुळे कसा अडथळा येतो याची माहिती दिली.बरगड्यांच्या आत असलेली फुफ्फुसे, हृदय, पाठीचा कणा, मानेचे स्नायू हे श्वसनासाठी महत्वाचे असतात.ताठरता या लक्षणामुळे फुफ्फुसाजवळचे स्नायू कडक झाल्याने आणि पाठीचा कणा वाकल्याने फुफ्फुसाच्या प्रसरण पावणे आणि आकुंचन पावणे या क्रियेत व्यत्यय येतो.फुफ्फुसाच्या खाली डायफ्राम असतो.तोही कडक होतो.त्यामुळे छातीच्या, पर्यायाने फुप्फुसाच्या कार्यातही व्यत्यय येतो.श्वास घेणे, सोडणे पुरेसे होत नाही .ऑक्सिजनचा पुरवठा कमी होते. श्वासनलिका ताठर झाल्याने कार्बनडायऑक्साईड बाहेर येत नाही.प्राणवायू येण्यास जागा राहत नाही.यासाठी श्वासाचे व्यायाम गरजेचे.याशिवाय कोणत्याही प्रकारचे व्यायाम ४०/५० मिनीटे तरी करावेत.
यानंतर दीर्घ श्वसन आणि तोंडाने फुंकर घालत श्वास सोडणे असा व्यायाम त्यांनी सर्वांकडून करून घेतला.श्वास घेताना पोट पुढे येणे आणि सोडताना आत घेणे गरजेचे.यानंतर डायफ्रामिक, सेगमेंटल ब्रीदिंग कसे करायचे ते दाखवले.बायपास सर्जरी झालेल्यांनीही हे करावयास हरकत नाही. श्वासाचे सर्व व्यायाम दिवसातून कधीही प्रत्येकी १० वेळा करण्यास सांगितले.यासाठी व्यायामाच्या आधी खाण्यापिण्याचे बंधन नाही.
यानंतर मानेपासून पायापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवांची हालचाल ३/४ वेळा करण्यास सांगितले.पायात थोडे अंतर ठेवून व्यायाम केल्यास तोल जाणार नाही.याशिवाय पोहणे, नृत्य, चालणे, जागच्याजागी पळणे असे कोणतेही व्यायाम करु शकता.
यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.वक्त्यांच्या विषयाशी संबंधीत नसलेल्या विषयाबाबत प्रश्न विचारले जात होते त्यांनाही मेघन फुटाणे यांनी उत्तरे दिली.बरेच प्रश्न वैयक्तिक स्वरूपाचे होते.
त्यातील महत्वाचे मुद्दे :
आयसीयूमध्ये एसीत ठेवलेल्या पेशंटला कफ होतो असे आढळते.याचे एक कारण तेथे असणारे पेशंट बहुतेकवेळा शस्त्रक्रियेनंतर ठेवलेले असतात. शस्त्रक्रियेच्यावेळी भूल दिली जाते. त्यामुळे ९५% पेशंटना कफ होतो.सक्शनद्वारे तो काढला जातो.शस्त्रक्रियेपुर्वी काही श्वसनाचे व्यायाम शिकवले जातात, ते शस्त्रक्रियेनंतर करावेत.
एरवी कफ झाल्यास वाफारा घ्यावा.फुंकर घालण्याचा व्यायाम २५/३० वेळा करावा.कफ होऊ नये म्हणून स्नायूंची, फुफ्फुसाची ताकद वाढवणे,सर्वसाधारण ताकद आणि प्रतिकारशक्ती वाढवणे महत्वाचे.
पार्किन्सन्स आणि न्युमोनिया याबद्दल सांगितलेली माहिती सर्वांसाठीच गरजेची आहे.इन्फेक्शनमुळे न्युमोनिया होतोच पण पीडी पेशंटच्या श्वासनलीकेच्या आजूबाजूच्या स्नायूंची ताकद कमी होते आणि त्याचा पॅरालीसीस होतो. श्वासनलिका दाबली जाते.अन्ननलिका जवळच असते.त्यातील अन्नकण श्वासनलीकेतून फुफ्फुसात जातात.त्यामुळे न्युमोनिया होतो.याप्रकारचा न्युमोनिया होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी म्हणजे, जास्त सॉलिड पदार्थ न खाता पातळ पदार्थ घ्यावेत.खाताना बोलू नये.ठसका लागल्यास लगेच अडकलेले कण खोकून बाहेर काढावे.
दम लागणे,थकवा येणे असे झाल्यास भिंतीला टेकून उभे राहावे, वाकावे आणि फुंकर घालण्याचा व्यायाम करावा.
वक्त्यांच्या उत्तरांमुळे सर्वांचेच समाधान झाले.