गप्पामध्ये आणि पर्किन्सन्स विषयक इतर लेखातही शुभंकर, शुभार्थी हे शब्द नेहमी येतात.शुभंकर म्हणजे केअरटेकर आणि शुभार्थी म्हणजे पेशंट असे मी वेळोवेळी स्पष्टही केले आहे. पण हे शब्द वापरात का आले? कोणी आणले, त्याची जन्म कथा आज सांगणार आहे.स्वमदत गटात हा शब्द सर्रास वापरला जातो. आम्ही सेतू या सर्व स्वमदत गटांना एकत्र करणाऱ्या संस्थेच्या संपर्कात आलो तेन्हां या शब्दांची ओळख झाली. पेशंट म्हटले की गलितगात्र,अंथरूणग्रस्त व्यक्ती डोळ्यासमोर येते. त्या व्यक्तीला पण आजारी असल्याची भावना निर्माण होते. शुभार्थी शब्दात तसे वाटत नाही.त्यामुळे आम्हाला हा शब्द आवडला आणि आम्हीही हे शब्द त्यावर चर्चा वगैरे न होता आपोआप वापरण्यास सुरुवात केली.
फेब्रुवारी २०१४ मध्ये पार्किन्सन्स मित्रमंडळाला अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार मिळाला.त्यावेळी मुलाखतीमध्ये हे शब्द सारखे वापरले जात होते. मुलाखत घेणारे डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी या शब्दांची जन्मकथा सांगितली.स्क्रीझोफेनियावर आधारित’ देवराई’ चित्रपटाच्यावेळी हे शब्द अस्तित्वात आले.व्याधी,पेशंट अशा शब्दाना एक स्टीग्मा असल्याने बाबा म्हणजे अनिल अवचट यांनी पेशंटसाठी शुभार्थी आणि केअरटेकरसाठी शुभंकर शब्द योजिले.एपिलप्सी,स्क्रीझोफेनिया,कोड असणाऱ्यांना तर तो अधिकच असतो.
विद्या घेणारा विद्यार्थी तसा शुभ इच्छिणारा तो शुभार्थी.शुभार्थीचे शुभ चिंतणारा त्यासाठी कटिबद्ध असलेला शुभंकर.हळूहळू सर्व स्वमदतगटात ते शब्द रूढ झाले,.अगदी सिंगापूर,अमेरिकेत ही वापरले जावू लागले.डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना अमेरिकेतून आलेल्या स्वमदत गटांच्या पत्रावर shubharthi,. shubhankar असे लिहिले जाऊ लागले..सिंगापूर येथील स्वमदत गटाने .तर सांगितले या शब्दांचा अर्थ समजला आणि हे शब्द वापरल्याने आम्हाला उभारी मिळाली.
पार्किन्सन्स मत्रमंडळातील अनेकानाही ही जन्मकथा माहित नसल्याने आणि इतर सर्वांसाठीही मुद्दाम गप्पामध्ये लिहिली.