दिवाळी सण आनंदाचा.प्रेमाच्या माणसांच्या भेटीगाठीचा.काहीवेळा दिवाळीत एखादी अनपेक्षित भेट घडते आणि भारावलेले क्षण देऊन जाते.या वर्षी असेच झाले.शुभार्थी उमेश सलगर यांचा फोन आला, मी फराळ घेऊन येतोय.तुम्ही घरी आहात ना? त्यांनी घरी येणे मला आवडलेच असते. पण औंधहून आमच्या घरी येणे म्हणजे दुसऱ्या गावाला जाण्यासारखेच शिवाय ते स्कूटरवर येणार.मी उत्तर देण्यापूर्वीच ते म्हणाले ‘ताई मी स्कूटरवर येणार नाही.माझा मुलगा सोडून जाणार आहे.तुम्ही काळजी करू नका’.
ठरल्याप्रमाणे ते दुपारी साडेबाराला आले.येता येता आमच्या गेटपाशी ठेवलेल्या कचऱ्याच्या रिकाम्या बादल्या घेऊन आले.आमची कामवाली आत येताना त्या आणत असते.यापूर्वी ते एकदा आले होते आणि कुटुंबांतालेच एक झाले होते.त्यामुळे त्याना काही वाटले नाही तरी मलाच ओशाळल्यासारखे झाले .आमची स्वयंपाक करणारी रंजना अजून आली नाही म्हणून मी काळजीत होते.सलगर म्हणाले मी करतो स्वयंपाक.मी कितीही नाही म्हटले तरी माझ्याकडून त्यांनी भाजी चिरायला घेतली.मला त्यांचा भाजी चिरताना व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून मीही थोडावेळ चिरू दिली.थरथरत्या हातानी त्यांनी कांदा आणि कोबी बारीक आणि एकसारखा चिरला.मलाही इतका छान चिरता येत नाही.इतक्यात रंजना आली आणि तिने सूत्रे हातात घेतली.
आता सलगर यांचे त्याच्या पोतडीतून एकेक जिन्नस काढणे चालू झाले.त्यांनी गोव्याहून खास आणलेले आंबाडे,त्रिफळे,फणसपोळी आधी काढली.नंतर स्वतंत्र डब्यातून आणलेले वेगवेगळे फराळाचे जिन्नस काढायला सुरुवात केली.अनारसे,दोन तऱ्हेच्या करंज्या,पातळ पोह्यांचा चिवडा,भाजक्या पोह्यांचा चिवडा,रव्याचे लाडू, बेसन लाडू,चकली,शंकरपाळी,आणि खास बेळगावी चवडे असा फराळ होता.विशेष म्हणजे तो सर्व त्यांनी स्वत: केला होता.ते पाहून मी आवक झाले होते.पार्किन्सन्समुळे सतत कंप असताना इतक्या गोष्टी करायचा विचार तरी कसा येऊ शकतो? हे सर्व काढताना त्यांची त्या पदार्थांच्या कृतीबाबत अखंड कोमेंट्री चालू होती.त्यातून अनारस्याचे पीठही त्यांनी घरीच केले होते असे समजले. विशेष टीप म्हणता येतील अशा अनेक गोष्टी त्यांच्या बोलण्यातून निघत होत्या.मी त्या लक्षात ठेऊन इतरानाही सांगायच्या असे ठरविले होते.पण माझ्या आता एकही लक्षात नाही.त्यांनाच पुन्हा बोलते केले पाहिजे आणि त्यावेळी रेकॉर्ड केले पाहिजे असे मला वाटले.या सर्वाबरोबर त्यांनी तांदुळाची खीरही आणली होती.
रंजनाला काही फराळ काढून ते देत होते तिचा उपवास होता त्यामुळे ती खाऊ शकणार नव्हती.मग लगेच ते म्हणाले.’ मी साबुदाण्याची खिचडी आणलीय ती खा. फणसपोळीही चालेल तुम्हाला.’
रंजना भाकरी करायला लागल्यावर ते म्हणाले,’शेवटची भाकरी ठेवा मी करतो.’ त्यांच्या भाकरी करण्याच्या कौशल्याचे रंजनालाही कौतुक आणि आश्चर्य वाटत होते. मी व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला.रंजना म्हणाली काकू मलाही व्हिडिओ पाठवा.सर्व कामात ते हक्काने मदत करत होते.
जेवायला बसल्यावर त्यांनी तांदुळाची खीर घेण्याची आठवण केली.आमचे गप्पा मारत हसत खेळत जेवण झाले.बेळगावच्या गप्पा, त्यांचे सांगलीचे घर, त्यांच्या दिवंगत पत्नी लीनाच्या आठवणी,तिचे साहित्य प्रेम, तिला वेळोवेळी भेट दिलेली पुस्तके, त्यांची ३००० पुस्तकांची स्वत:ची लायब्ररी अशा कितीतरी गोष्टी ते सांगत होते.त्यांच्या गप्पातून त्यांनी गावोगावी खूप माणसे जोडली आहेत: लोकांच्या मदतील, धावून जाणे.खायला बनवणे आणि लोकांना खाऊ घालणे, सर्व सणसमारंभ यथासांग पार पाडणे. ही त्यांची आवड आहे हे माझ्या लक्षात आले.पार्किन्सन्समुळे या कशातही खंड पडला नव्हता.उलट पार्किन्सन्स आटोक्यात ठेवण्यात या बाबी उपयुक्तच ठरत होत्या.आपल्या मुलाला आईची उणीव भासू नये यावर त्यांचा कटाक्ष होता.
थोड्या वेळात त्यांचा मुलगा संदीप न्यायला आला संदीप नाईक हा त्यांचा मानसपुत्र आहे हे त्यांच्याकडून समजले.इन्शुरन्स कंपनीत काम करणाऱ्या सलगर यांना तो गाडीचा इन्शुरन्स करायला आला असताना भेटला.पुण्यात नव्यानेच आलेले सलगर राहण्यासाठी जागा मिळेपर्यंत जागा शोधत होते. संदीपच्या घराजवळ त्यांना जागा मिळाली.सरकारी जागा मिळाल्यावर सलगर नी त्यांना आपल्या घरीच राहायला बोलावले.त्याला वेळोवेळी मदतीचा हात दिला. आणि आता संदीप त्याना विविध कामात मदतीचा हात देत होता.त्यालाही सलगरच्या रूपाने परक्या गावात वडिलधारे माणूस मिळाले होते.विवाहानंतर तो आता दुसरीकडे राहत असला तरी डॉक्टरकडे नेणे आणणे इतर काही कामासाठीही तो सलगर यांच्याबरोबर असतोच. इन्शुरन्स मध्ये असलेल्या सलगर यांनीअसा भाविष्यकाळासाठी सामाजिक विमा पुरेसा उतरवलेला दिसतो.
त्यांनी’ मनाचा विमा’ नावाचा लेख स्मरणिकेसाठी दिला होता. मनाचे ताजेपण टिकवण्याचे अनेक उपाय सांगितले होते.त्यांच्या थोड्यावेळच्या वावरातून हा ताजेपणा प्रत्यक्षातही ते टिकवून आहेत हे लक्षात आले.सलगर आनंद घेणे आणि आनंद वाटणे हे असेच चालू राहूदे.