पार्किन्सन्स मित्र मंडळात आल्यावर आम्ही एकतर शुभंकर तरी असतो किंवा शुभार्थी तरी असतो. लॉकडाउनच्या काळात अनेक शुभंकर,शुभार्थींच्या पार्किन्सन्स पूर्व आयुष्यातील कर्तृत्व, तज्ञ त्व आणि विविध गुण समजत गेले. व्हाट्सअप ग्रुप त्यामुळे समृद्ध होत गेला.
पुण्यातील लोकांची शेअरिंग च्या कार्यक्रमात तरी थोडी ओळख होते पण परगावच्या व्यक्तींच्या बद्दल पूर्ण अनभिज्ञ असतो.
चेंबूरच्या डॉक्टर विद्या रवींद्र जोशी यांची ओळख व्हाट्सअप माध्यमातून झाली ‘वृद्धत्वाची ऐशी तैशी’ या पुस्तकास कोकण मराठी साहित्य परिषदेचे पुरस्कार मिळाला हे सांगण्यासाठी त्यांनी मेसेज केला होता. त्यानंतर त्यांनी एकदा इशाखेवरील त्यांच्या भाषणाचा ऑडिओ पाठवला.
‘अध्यात्म काळाची गरज’ हा विषय होता.
‘अहंकार घालवणे म्हणजे परमार्थ’ ही परमार्थाची सुटसुटीत व्याख्या त्यांनी केली होती. आयोजकांनी त्यांच्या पुस्तकांची ओळख सांगावी असे सांगितल्यामुळे त्यांनी शेवटी आपल्या काही पुस्तकांची नावे सांगितली. एकवीस पुस्तके प्रकाशित झालेली आणि चार पुस्तके एकत्र प्रकाशित करण्यासाठी तयार होती. लोक डाऊन मुळे हे प्रकाशन थांबले. त्यांच्या पुस्तकांची विविधता पाहून त्यांच्याबद्दलचे कुतूहल वाढतच चालले.
त्यांचे पती डेंटिस्ट आणि त्यांना पार्किन्सन्स आहे 75 वर्षापर्यंत ते प्रॅक्टिस करत होते. ते तबला वाजवतात त्याचा पार्किन्सन्स आटोक्यात राहण्यासाठी उपयोग होतो असं त्यांना वाटतं. प्राणायम, मेडिटेशन आणि व्यायाम हे दोघेही करतात. खेळाडू असल्याने पॉझिटिव वृत्ती आहे त्यामुळे त्यांचा पार्किन्सन्स आटोक्यात आहे.
विद्याताई स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहेत पण याच बरोबर एम.ए.ही केले आहे.एक मुलगी बोरिवलीला एक मुलगी अमेरिकेला आणि मुलगा बेंगलोरला असतो म्हणजे चेंबूरला हे दोघेच असतात.
चेंबूरच्या साहित्य-संस्कृती, अध्यात्मिक क्षेत्रात विविध संस्थांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार आहे. त्याच्या त्या अध्यक्षही आहेत.
त्यांची लेखणी सर्व साहित्य प्रकारात सहजपणे संचार करते. यात एकांकिका, नाटके त्यांचे लेखन,सादरीकरण स्टेजवर, दूरदर्शनवर आणि अमेरिकेतही त्याचे प्रयोग झाले.
विविध मासिकातून,दिवाळी अंकातून कथा प्रसिद्ध झालेल्या. अनेक कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. कविता लेखन आणि कविता संग्रह प्रकाशित आहेत. त्यांनी नुकतीच व्हाट्सअप वर स्वतःची एक सुंदर कविता पाठवली होती.
वैद्यकीय व्यवसायिक असल्याने वैद्यकीय विषयावरची पुस्तकेही आहेत. त्यातील ‘किडनी कथा आणि व्यथा’ हे पूर्णपणे वैद्यकीय माहिती देणारे पुस्तक आहे तसेच सर्वसामान्य साठी मधुमेहींसाठी खास पाकक्रिया सांगणारे पुस्तक आहे. ‘365 भाज्यांच्या पाककृती आणि त्याविषयी आरोग्यविषयक टिपणी’, ‘शांत झोप येण्यासाठी’ अशी काही पुस्तकांची नावे उदाहरणादाखल सांगता येतील. यात योग विषयक पुस्तकही आहे. सौंदर्यविषयक पुस्तकात ‘सौंदर्य राखण्यासाठी आणि स्पर्धेत भाग घेण्यासाठी मार्गदर्शन’ हे पुस्तक आहे. ‘केसांची निगा आणि गंगावन चे विविध प्रकार’ हे सांगणारे पुस्तक आहे. ‘केवळ तिच्याचसाठी’ ही अल्झायमर वरील कादंबरी आहे. विविध मासिकात, दिवाळी अंकात,दैनिक सकाळ,तरूणभारत इ.वृत्तपत्रात वर्षभर लेखमालिका लिहिणे हेही चालू असतेच. सरोगसी वर त्यांनी एक नाटक लिहिले आणि त्याचे प्रयोगही केले. लेखनाबरोबरच त्या विविध विषयावर महिला मंडळे, कॉलेज, आकाशवाणी अशा विविध ठिकाणी व्याख्यानेही देतात. अध्यात्मिक विषयावरील लेखन, व्याख्याने व्हिडिओ हा आणखी एक विशेष. ‘आरोग्यासाठी मनाचे श्लोक’, ‘आत्माराम’, ‘दास सर्वोत्तमाचा’ ही प्रकाशित होत असलेली कादंबरी आणि ‘दासबोध जीवनाचा मार्गदर्शक’ ही पुस्तके लिहून तयार आहेत. रामदासांवरील कादंबरी लिहिण्यासाठी त्यांच्या जांभ या मूळगावी त्या जाऊन आल्या.रत्नागीरीत नवरात्रात 9 दिवस अध्यात्मिक विषयावर व्याख्याने दिली. हे काम कॅन्सर झाल्यावरच आहे. हो त्या कॅन्सर पेशंट आहेत.
आपण शरद पोंक्षे यांचा कॅन्सर आणि त्याला धीरोदात्तपणे तोंड देऊन त्यांच्या स्टेजवर नाटकासाठी उभे राहणं हे विविध वाहिन्यांवर व्हाट्सअप मेसेज मधून ऐकले, पाहिले आहे. त्याच प्रकारचा कॅन्सर विद्याताईंनाही झालेला आहे. हेवी किमोथेरपी होती. किमोथेरपी च्या काळात आठ दिवस बरे जात असायचे. तेवढ्यात त्यांनी प्रकाशित करायच्या असलेल्या पुस्तकांची प्रुफे तपासायचे किचकट काम केले. पण लाकडाऊन मुळे प्रकाशन थांबले. पण त्याची त्या खंत करत बसल्या नाहीत.
प्रत्येक गोष्ट स्वीकारून पुढे जायचे याचा विचार केला की आजार विसरणे सोपे जाते असे त्यांचे साधे सोपे तत्वज्ञान आहे. अध्यात्मावर त्यांनी फक्त पुस्तके लिहिली नाहीत तर स्वतः ते आचरणात आणले आहे. त्यांच्याशी बोलताना अहंकार घालवणे म्हणजे परमार्थ हे त्यांनी स्वतःच्या जीवनात आत्मसात केल्याचे जाणवले.
त्यांच्या या भरघोस कार्यामुळे त्यांच्यापर्यंत पुरस्कार चालून आले नाही तरच नवल.
अखिल भारतीय नाट्य संमेलनात नाट्यलेखन पुरस्कार,
‘आरोग्यासाठी मनाचे श्लोक’ या पुस्तकासाठी कोमासप पुरस्कार अशी काही नावे सांगता येतील.
स्वमदत गट अनेकांसाठी गरज आहे. डॉक्टर विद्याताई आणि त्यांचे पती डॉ.रवींद्र अशा स्वयंपूर्ण व्यक्तींना स्वमदत गटाची गरज असतेच असे नाही. निगडीचे डॉक्टर सुभाष इनामदार हे विद्याताईंचे वैद्यकीय शिक्षण घेतानाचे क्लासमेट. ते मंडळाची माहिती अनेकांना देतात विद्याताईंच्या पतींना पीडी झाल्यावर त्यांनी त्यांचा नंबर व्हाट्सअप ग्रुप वर ॲड करण्यास दिला. त्यांच्यामुळे मंडळाचे भूषण ठरावे असे हे जोडपे आमच्यापर्यंत पोहोचले म्हणून त्यांचेही आभार.
पुढच्या गप्पात अशाच एका कर्तुत्वी व्यक्तीबद्दल.
पार्किन्सन्स विषयक गप्पा – ५९ – शोभनाताई
RELATED ARTICLES