वृत्तान्त – पार्किन्सन्स मित्र मंडळ मासिक सभा दि १२/७ /१५
– डॉ. शोभना तीर्थळी
रविवार दिनांक १२ जुलै रोजी अश्विनी हॉटेल येथे पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली होती प्रसिद्ध न्युरॉलॉजीस्ट डॉक्टर राहुल कुलकर्णी यांचे’ पार्किन्सन्स आजार आणि त्यावरील नवी औषधे ‘ या विषयावर व्याख्यान झाले.सभेस ८६ सभासद उपस्थित होते.
सभेची सुरुवात प्रार्थनेने झाली.त्यानंतर मंडळाचे संस्थापक सदस्य श्री.मधुसूदन शेंडे याना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यांचे मित्र शरच्चंद्र पटवर्धन आणि रामचंद्र करमरकर यांनी शेंडे यांच्या आठवणीना उजाळा दिला.त्यानंतर शोभना तीर्थळी यांनी डॉक्टर राहुल कुलकर्णी यांची ओळख करून दिली.
मधुसूदन शेंडे हे डॉक्टरांचे १२ वर्षे पेशंट होते.व्याख्यानाच्या सुरुवातीला त्यांनी शेंडे यांच्या आठवणी सांगितल्या.यातून मित्रमंडळाच्या इतिहासाचे एक पान उलगडले.
२००२ मध्ये दिनानाथ हॉस्पिटल येथे राहुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने मेळावा आयोजित केला गेला.त्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला.( याच सभेत श्री शेंडे आणि शरच्चंद्र पटवर्धन या जुन्या मित्रांची बर्याच दिवसांनी गाठ पडली.दोघेही स्वमदतगट सदृश्य काम करत होते यानंतर एकत्र काम सुरु झाले.)त्यानंतर श्री शेंडे यांनी पुण्यातील न्युरॉलॉजीस्ट,न्यूरोसर्जन यांची वाडेश्वर हॉटेल येथे सदिच्छाभेट आयोजित केली होती.स्वमदतगटाची कल्पना मांडली.त्यांच्या स्वमदत गटाच्या कल्पनेला सर्वांनी दुजोरा दिला.व्याख्यानात याचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले “शेंडे आणि पटवर्धन यांनी समर्थपणे हा गट चालू केला.यांच्याइतका सक्रीय स्वमदत गट.भारतात इतरत्र नाही.येथे बरेच जुने पेशंट आहेत.काहींच्याबाबत खूप कोम्प्लीकेशन होतात.त्यातून बर्याच गोष्टी आम्हा डॉक्टरनाही शिकायला मिळतात.”
डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्या आजच्या सभेचे आयोजनही श्री शेंडे यांच्या पुढाकाराने झाले.शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मंडळाच्या कामाचा विचार केला.
डॉक्टरांच्या व्याख्यानात त्यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने प्रचलित आणि नव्याने येत असलेल्या विविध औषधांचा मागोवा घेतला.नंतर श्रोत्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली.;शंकांचे निरसन केले.(हा सर्व मागोवा स्वतंत्रपणे देत आहे.)
दीपा होनप यांनी आभार मानले.
यानंतर जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या शुभार्थींचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
बॉक्सिंगमधील कार्यासाठी जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभार्थी विजय ममदापुरकर यांचा सत्कार करण्यात आला.सौ विद्या काकडे यांनी डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्या भाषणाचे व्हिडिओ शुटींग केले.चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.रेखा आचार्य यांनी वाढदिवसानिमित्त चहापानाचा खर्च केला.