Friday, September 20, 2024
Homeक्षण भारावलेलेक्षण भारावलेले - ३- शोभनाताई

क्षण भारावलेले – ३- शोभनाताई

आमची शुभंकर अंजली महाजन हिच्या नसानसात सामाजिक जाण, सळसळता उत्साह आणि थक्क करणारी कल्पकता भरलेली आहे. इतरांना अवाक करणारे तिचे अनेक उद्योग सुरू असतात. अवघ्या एकोणिसाव्या वर्षी कँसरने गेलेल्या लेकीच्या वियोगाचे दु:ख, केशवरावांचा वाढता पार्किन्सन्स, १०५ वर्षे वयाच्या वयस्क सासुबाई आणि त्यांच्या आजाराची मानसिक-शारीरीक पातळीवर रोज बदलणारी स्वरुपे, ह्या कशाचीही तमा न बाळगता तिचे काम अखंड चालू असते. त्याद्वारे आम्हाला ती अनेक भारावलेले क्षण देऊन जाते.

नुकताच १९ जानेवारीच्या लोकसत्तात प्रेरणा ह्या सदरामध्ये अंजलीवर लेख प्रकाशित झालेला आहे. त्यात तिच्या कामगिरीचा ब-यापैकी आढावा आलेला आहेच. पण आम्ही तिच्या सहवासात आल्यावर आम्हाला प्रत्येक वेळी तिची इतकी वेगवेगळी रुपे दिसत राहिली, की तिला हे सगळे जमवणे कसे काय शक्य होते ह्याचे आश्चर्य वाटत राहते. अंजली पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कार्यकारिणीत असल्यामुळे आमच्या अनेक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होतच असते. पण तिचे माझ्या मते जे सगळ्यात महत्त्वाचे कार्य आहे, ते ती करत असलेल्या रक्तदानाचे. तिचा रक्तगटग ओआरएच (-) आहे. तिच्या पहिल्या गरोदरपणात ते तिच्या लक्षात आले. हा खूप दुर्मिळ रक्तगट आहे. त्याचे रक्त साठवून ठेवता येत नाही, त्यामुळे जेव्हा रक्ताची गरज लागेल तेव्हाच द्यावे लागते. अंजली जेव्हा पहिल्यांदा रक्तदानाला गेली, तेव्हा हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे तिला ते देता आले नाही. त्याचे तिला फारच वाईट वाटले. तेव्हा तिने हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो आहार घ्यायला सुरुवात केली आणि ती आहारपद्धती अंजली आजतागायत अवलंबते आहे. त्यानंतर आजपर्यंत तिने एकवीस वेळा रक्तदान केले आहे. आता वेगवेगळ्या ठिकाणच्या हॉस्पिटल्सच्या रक्तदात्यांच्या यादीत तिचे नाव आहे. त्यामुळे तिला केव्हाही बोलावणे येते, आणि मग सगळी कामे बाजूला सरकवून ती धावत पळत रक्त देण्यासाठी जाते. आजवर तिच्यामुळे अनेक जणांचे जीव वाचले आहेत, इतक्या वेळा केलेल्या रक्तदानाचे वेगवेगळे अनुभव तिच्या गाठीशी आहेत. ज्या रुग्णांना तिने रक्त दिले, ते रुग्ण, त्यांचे नातेवाईक कायम तिच्यापाशी कृतज्ञता व्यक्त करतात. मी नेहमी तिला तिचे हे अनुभव शब्दबद्ध करण्याबद्दल सुचवत असते.

अंजलीच्याबाबतीत एका गोष्टीचे नेहमीच आश्चर्य वाटते, ती म्हणजे तिची कार्यमग्नता. ती शाळेत मुख्याध्यापिका असताना तिने अनेक सामाजिक उपक्रम राबवले. तिच्यातली ही सामाजिक जाणीव तिने विद्यार्थी आणि सहशिक्षकांमध्येही पेरली, असे म्हणायला हरकत नाही. अधिकारस्थानी असल्यामुळे शाळेत तिच्या कर्तृत्वाला पूरक वातावरण आणि उत्तम संधी मिळाल्या. ह्या तिच्या कार्याबद्दल आधी अनेक ठिकाणी लिहिले गेले आहे.

सध्या तिच्या घरी खूप अवघड परिस्थिती आहे. हे अर्थातच तिने सांगितल्यानंतर आम्हाला समजले. केशवरावांचा पार्किन्सन्स सध्या वाढलेला आहे. त्यासाठी त्यांनी मदतनीस नेमलेला असला, तरी अंजलीलाही त्यांच्याकडे खूप लक्ष द्यावे लागते. तिच्या सासुबाई पडल्या, पडल्यामुळे त्यांनाही ब-याच शारीरीक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. पण त्यांची स्मृती अजूनही शाबुत असल्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे त्यांचे सगळे करावे लागते. भरीला तिला नात्यागोत्यांचे देशस्थी व्याप सांभाळावे लागतात, कुळधर्म-कुळाचार यथासांग पार पाडावे लागतात. जे ती अगदी मनापासून करत असते. ह्या सगळ्यामुळे गेले वर्षभर तिला ब-याच गोष्टी करता आल्या नाहीत. एकतर दिवाळी अंकांमध्ये ती खूप लेखन करते. किमान ५-७ दिवाळी अंकांमध्ये तरी तिचे लेख येतात. काव्यवाचनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये ती कवितावाचन करत असते. पण सध्या दिवसरात्र यजमान आणि सासुबाईंच्या सेवेत असल्यामुळे हे सगळे साधता येत नसल्याची किंचीत चुटपुट अंजलीला लागते. मात्र त्यात कुठे तक्रारीचा सूर नसतो, हे विशेष. मला लक्ष देता आले नाही, हीच तिची भावना असते. तरीसुद्धा वेगवेगळ्या पुरस्कार समारंभांना उपस्थित राहून ते घेणे सुरूच असते. आमच्या मंडळाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांना ती स्वत: ग्रिटींग्ज करून आणत असते. मध्यंतरी एकदा ती स्वत: आजारी होती, नंतर केशवराव आजारी होते पण तिने ग्रिटींग्ज तयार ठेवली होती. मग आमच्यापैकी कोणीतरी जाऊन ती घेऊन आले.

पण ह्या सगळ्या व्यापातही आपले हिमोग्लोबिन कमी होऊ नये, ह्याकरीता अंजली दक्ष असते, ह्याचे मला प्रचंड आश्चर्य वाटते. इतक्या व्यवधानांमधून आपल्या आहाराकडे लक्ष ठेवणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आता वयाची साठी आली, आपल्याला रक्त देता येईल की नाही ह्याबद्दल तिला खंत वाटत होती. पण नुकतेच तिला समजले की हिमोग्लोबिन व्यवस्थित असेल, तर तुम्ही वयाच्या पासष्ठीपर्यंत रक्त देऊ शकता. मला आणि सविताला जेव्हा अंजलीने ‘मी अाणखी पाच वर्षे रक्तदान करू शकणार आहे’ असे हुरुपाने सांगितले, तेव्हा सविता अगदी सहजपणे उद्गारली, ‘अंजली, तुझ्या रुपाने देव दिसला!’

खरेच अंजली, अशावेळी तुला काय म्हणावे समजत नाही, इतके तुझ्या कर्तृत्वाने आम्ही भारावून जातो. तू आमच्या परिवारातील आहेस, आमच्या अगदी जवळची आहेस, ह्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.

शब्दांकन – सई कोडोलीकर.

http://parkinsons-diary.blogspot.in

www.parkinsons.org

Parkinson’s Mitramandal, Pune हे युट्युब चॅनेलसुद्धा अवश्य पहा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क