आम्ही दोघे आमच्या समोरच्या बागेमध्ये रोज हास्य क्लबला जातो..हे थोडे आधी जातात मी थोडी उशिरा जाते. हास्य क्लब संपला की हे परत घरी परततात मी थोडी थांबते आज अनेकजण मला येऊन सांगू लागले. काका पडले. घरी गेल्यावर त्यांना बघा कुठे लागलय आम्ही त्यांना पाणी दिले, उठवलं पण तरी तुम्ही एकदा पहा. माझ्या लक्षात आलं त्यांनी तासभर व्यायाम केला याचा अर्थ त्यांना फार लागलेलं नाही. थोडेफार खरचटले असेल मी घरी आले आणि पाहिलं तर त्यांच्या गालाला डोळ्याखाली खूपच खरचटलेले होते.,थोडी सूज होती. बाकी काही झालेलं नव्हतं पण यानंतर अनेकांनी अनेक सल्ले दिले कोणी म्हणालं काकाना काठी द्या.आम्हीही सांगितले त्यांना. दुसरा कोणी म्हणालं काका पळत सुटतात आम्ही त्यांना किती वेळा सांगतो सावकाश चाला ते काही ऐकत नाहीत त्यांना तुम्हीच सांगा ना.त्यांची काळजी यांच्याविषयीची कळकळ मला समजत होती.परंतु प्रत्यक्षात त्याना काठी देणे किंवा ते हळू चालणे शक्य नव्हते.असे सल्ले कोणी दिले तर ते गप्प बसून ऐकून घेतात.त्यांनी बोललेले इतरांना समजत नाही त्यामुळे त्यांच्याकडे दुसर मार्ग नसतो. मी बरोबर असले तर सर्वाना वस्तूस्थिती सांगतेच. दुसऱ्या दिवशी हास्यक्लबमध्ये सर्व एकत्र असताना मी वस्तुस्थिती सांगितली.तीच गप्पामाध्येही शेअर करत आहे.
मागच्या गप्पामध्ये काठी वापरण्याबद्दल चर्चा झाली होती,त्यावेळी मी माझ्या यजमानांना काठी का देत नाही त्याचा उल्लेख केला होता पण तोच मुद्दा थोडा अधिक विस्ताराने सांगते.मेंदूतील डोपामीन तयार करणाऱ्या पेशी कमी झाल्याने पार्किन्सन्स होतो हे आता सर्वाना माहित आहेच. हालचालीवर नियंत्रण करण्याचे काम डोपामिन करत असते.डोपामिन कमी झाल्यावर मेंदुनी दिलेला संदेश ( Order )आणि योग्य त्या अवयवापर्यंत तो पोचून त्या अवयवाने कार्यवाही करणे यात सुसूत्रता राहत नाही.प्रत्येक शुभार्थीमध्ये या मुव्हमेंट डीसऑर्डरचे स्वरूप वेगळे असते.कंप,हालचाली मंदावणे,चालताना पावले जवळ जवळ पडणे अशा बाबी होतातच पण काही शुभार्थींच्याबाबत चालण्याचा वेग वाढतो बऱ्याच जणांना तो थांबवणेही कठीण जाते.माझ्या यजमानांच्या बाबत ते पळत आहेत असे वाटणे हा त्याचाच भाग आहे.पूर्वी ते जलद चालतात असे वाटायचे आता ते कंबरेत वाकल्यामुळे ते पळत आहेत असे वाटते.(यामुळे आणखीन एक गमतीशीर समस्या झाली.रस्त्यावर बसलेल्या कुत्र्याला वाटले ते आपल्याला हाकलायला येत आहेत त्यामुळे त्यांनी ह्यांच्या अंगावर यायला सुरुवात केली असे दोनतीन वेळा झाले.)
शुभार्थीसाठी काठी वापरायची किंवा नाही यासाठी न्यूरॉलॉजिस्ट,फिजिओथेरपिस्ट यांचाही सल्ला घ्यावा.माझ्या यजमानांच्या बाबत ते पाठीत थोडे वाकल्यावर न्युरोफिजिओथेरपीस्टला भेटण्याचा सल्ला दिला गेला. त्यासाठी आम्ही निवारात जात होतो.तेथे सुरुवातीला त्यांना काठी द्यावी असा विचार होता परंतु फिजिओथेरपिस्टने काठी घेऊन चालायला लावल्यावर काठी टेकवल्यावर पाउल टाकताना गडबड होते असे त्यांच्या लक्षात आले. काठी टेकणे आणि चालणे यांचा मेळ (Coordination ) साधणे शक्य होत नाही आणि पडण्याची भीती आहे हे लक्षात घेऊन त्यांनी काठी घेऊ नका सांगितले आता त्यांच्यासाठी आणलेली काठी मी वापरते थोडक्यात अशी disorderअसणाऱ्या शुभार्थीनी काठी घेणे टाळायला हवे.इतरांसाठी काठी वापरणे चांगलेच.प्रत्येक गोष्टीत ती साधी वाटली तरी तज्ञांचा सल्ला घेणे केंव्हाही चांगले हे येथे आवर्जून सांगावे असे वाटते.