पार्किन्सन्स मित्रमंडळाची प्रत्येक महिन्याच्या दुसर्या सोमवारी सभा असते.lock down च्या काळात ती घेणे शक्य नव्हते म्हणून व्हिडिओ कान्फरन्सचा पर्याय निवडला.11 मे ला ही सभा ठरली. डॉ.रेखा देशमुख यांचे ‘आनंदी कसे राहावे’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.कितीजण उपस्थित राहतील याचा अंदाज नव्हता.हळुहळु लोक जमा होऊ लागले.त्यात शांताताईंना पाहून सुखद धक्का बसला.शांताताई म्हणजे माझी मोठी नणंद.तिलाही पार्किन्सन्स आहे.माझे लक्ष व्याख्यानापेक्षा त्या अर्ध्यातून जात नाहीत ना याकडेच होते.त्यांना ऐकु येत असेल का?असेही वाटत होते.कोणीतरी त्यांना हेडफोन आणून लावलेले दिसले.मी माझे लक्ष व्याख्यानाकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते.
व्याख्यान संपल्यावर शांताताईंचा फोन आला.त्या खुशीत होत्या.व्याख्यान त्यांना आवडले होते.त्यांच्याकडे सकारात्मक कसे राहावे सांगणारे पुस्तक आहे ते वाचूनही छान वाटते.असे त्या सांगत होत्या.नातीने मदर्स डेसाठी सुंदर ग्रीटींग केल्याचेही त्या सांगत होत्या.त्यांनी रूमाल भरायला घेतले होते.
त्यांना मीटींगमध्ये रमेश तीळवे यांचे नाव दिसले.बेळगावकर रमेशभाऊ ना त्यांनी ओळखले होते.त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी झाली.त्यातून बेळगावबद्दल गप्पा,इतर कितीतरी गप्पा झाल्या.एकुणात त्यांचा अलर्टनेस,स्मरणशक्ती,cognition सर्व चांगले होते.पार्किन्सन्सने त्यांच्या बोलण्यावर परीणाम झाला नाही.त्यामुळे खुप बोलता येते.या सर्वांमुळे मी भारावून गेले होते.मला राहून राहून चार-पाच वर्षांपुर्वीची त्यांची अवस्था आठवत होती.
त्या दिवशी माझ्या भाचीचा नयनाचा फोन आला. फोनवर ती रडत होती. ‘मामी मी आईला माझ्याकडे घेऊन आलीय.आईची अवस्था फार वाईट आहे अजिबात हालचाल करता येत नाही मख्ख सारखी बसून राहते. काय करू ग? व्हिलचेअर आणू का?’मी तिला शांत केले थोडा धीर दिला आणि सांगितले,’तुझ्याकडे आले ना आता हळूहळू सुधारेल’. मला खात्री होती तिची ही अवस्था पार्किन्सन्स वाढण्यापेक्षा असुरक्षितता, भीती, नैराश्य यातून झाली होती. आत्मविश्वासही गमावला होता.
ती मुलाकडे होती तेव्हां मुलगा आणि सून त्यांचा व्यवसाय असल्याने सकाळी बाहेर पडत ते एकदम उशीरा घरी येत. तिच्यासाठी केअरटेकर असली तरी त्याबद्दल मनात थोडी असुरक्षितता होतीच कारण संपूर्ण मजल्यावर एका घरात एक बेडरीडन शेजारीण आणि यांच्या घरात या एकट्या. एकेकाळी सर्व घरे भरलेली. मुंबईत असूनही अनौपचारिक संबंध होते. आता सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी गेले.घर खायला उठु लागले. रोज खाली उतरून चालायला जायच्या.हळुहळु तिसर्या मजल्यावर घर असल्याने जीना उतरून जाण्याची भीती वाटायला लागली.मुलगा कधीतरी धरून खाली न्यायचा.त्याच्या उद्योगात त्याला वेळ नसे.केअरटेकरही टाळाटाळ करायची.
मुळात त्या अत्यंतउद्योगी.स्वच्छतेचे वेड. घरात बाईने काम केले तरी या सर्व पुन्हा करणार. मुंबईत लोकलने,बसने एकट्या फिरायच्या.प्रभादेवीला घर. रोज सकाळी सिद्धिविनायक पर्यंत चालत जायचे, फुलबाजारात जाऊन फुले आणायची, त्यांचे सुंदर हार करून देव्हारा
सजवायचा, भरतकाम, पर्सेस तयार करणे असे अनेक उद्योग असायचे. सारखी पाहुणेमंडळी असायची.त्यांना तर्हा तर्हा करून खायला घालायचं आमच्या मुलींनाही आत्याच्या घरी जायला आवडायचे.
कुटुंब मोठे.कोणा ना कोणासाठी रूखवत,बाळंतविडा चालू असायचे.मंगळागौर, वाढदिवस, साखरपुडा,डोहाळजेवण, अशा वेळी सजावट,उत्सवमुर्तीला तयार करण्याचे काम यांच्याकडेच असायचे.गणपती उत्सवातही यांचाच पुढाकार.
पण आता टीव्ही पाहण्या शिवाय काहीच उद्योग नव्हता.किंबहुना काही करायची उमेदच नव्हती.
एकदा माझ्या भाच्याचा फोन आला आम्ही दोघेही कामासाठी गावाला चाललोय, नयना पण गावात नाही तुझ्याकडे आईला सोडू का? मी लगेच होकार दिला. त्या आल्या तेव्हा त्यांना हालचाल करता येत नव्हती. मला वाटले मुंबई-पुणे प्रवास केल्याने असेल कदाचित पण तसे नव्हते.
पार्किन्सन्स मध्ये नीरसता ( Apathy ) हे लक्षण दिसू लागते तसे त्यांचे झाले होते.काहीच करावेसे वाटत नव्हते.खुर्चीवरून धरून उठवावे लागत होते.त्यांच्या मनालाच हलवावे लागणार होते.मी त्यांना बागेत घेऊन गेले.त्यांचीवर्ग मैत्रिण आमच्याजवळ राहते ती भेटली.हास्यक्लबच्या वातावरणात त्या थोड्या खुलल्या नंतर मी वेबसाईटवर न्युरालाजिस्ट व इतर तज्ञांची व्याख्याने ऐकवली. ऋषिकेश ची डान्सची डॉक्युमेंटरी दाखवली एका दिवसातच त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसायला लागले. माझा नातू आर्य तेव्हा आमच्याकडे असायचा.तिसरीत असेल पण आमच्याबरोबर सभांना येऊन त्याला पार्किन्सन विषयी माहिती होऊ लागली होती तो काहीतरी सांगायचा. आत्या आजी म्हणून तिच्यामागे असायचा त्याला त्या ज्युनियर डॉक्टर म्हणायला लागल्या. त्याच्या बरोबर असण्याने ही त्यांच्या आनंदात भर पडत होती. दोन-तीन दिवसात बागेतील सर्वजणी किती फरक पडला यांच्यात आता असे म्हणायला लागल्या.
त्या जिना चढून आमच्याबरोबर प्राणायामासाठी येऊ लागल्या. आमच्या गाण्याच्या क्लासला आल्या. त्यांची आधीची अवस्था पार्किन्सन्स पेक्षा एकटेपणातून, असुरक्षिततेतून होती हा माझा कयास बरोबर होता त्यांना थोडे दिवस राहण्याचा खूप आग्रह केला पण त्यांना वाटत होते मला स्वतःची तब्येत सांभाळून दोघांचे करावे लागेल. त्या मुंबईला गेल्यावर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असे झाले. मी त्यांना म्हणायची नयनाकडे राहा ती घरी असते तिची मुले असतात.तिच्या सासरच्या माणसांनाही काही प्राब्लेम नाही. पण त्यांना ते पटायचे नाही. जुन्या पीढीतील लोकांना मुलीकडे राहणे नको असते. आता अशी अवस्था आली होती की मुलीने जबरदस्तीने घरी आणले. आईची अवस्था पाहून आता काय करू असे तिला झाले होते. तिला धीर धर सर्व काही ठीक होईल असे सांगितले ती पार्किन्सन्स इन्फो या व्हाट्सअप ग्रुप वर सामील झाली. शुभार्थींच्या कलाकृती, पेंटिंग, अनुभव, लेख आईला दाखवू लागली नातवंडांच्या सहवासाने, लेकीच्या प्रेमळ स्पर्शाने, कधी धाक दाखवून स्वतःच्या गोष्टी स्वतःचं करायला लावल्याने, फिजिओथेरपिस्टच्या फिजिओथेरपीने, मसाज केल्याने त्यांच्यात हळूहळू बदल होऊ लागला. बाथरूम मध्ये स्वतः जाऊन आंघोळ करू लागल्या खाली चालायला जाऊ लागल्या पूर्वीप्रमाणे आम्हाला फोन येऊ लागले संक्रांतीसाठी पुतण्याच्या नातीला कर्नाटकी कशिदा काढलेला फ्रॉक स्वतः तयार केला. बेडशीटवर भरतकाम करायला घेतले. त्याचे फोटो नयनाने पाठवले ते पाहून मला गहिवरून आले. आता गाडी रुळावर आली होती.
मधल्या काळात त्या पडल्या हीप जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया झाली 80 वर्षे वय, त्यात पार्किन्सन्स असे असून त्यातूनही त्या बऱ्या झाल्या.
नयनाने आईला घरी आणल्यापासून आईच्या पार्किन्सन्सचे स्वरूप समजून घेऊन अत्यंत संयमाने,पेशन्स ठेऊन कणखरपणे आणि हळुवारपणेही आईला हाताळले होते.आणि आजच्या स्थितीला आणले होते.तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
आपल्या शुभार्थीचा पार्किन्सन्स वाढला आहे की मानसिक अवस्थेमुळे वाईट अवस्था झाली आहे हे प्रथम समजून घ्यायला हवे.त्याप्रमाणे उपाय हवेत.
औषधोपचाराबरोबर पुरक वातावरण,शुभंकराची भक्कम साथ हे असल्यास पीडीसह आनंदात राहता येते हे आत्तापर्यंत अनेक शुभार्थींच्या बाबतीत दिसून आले आहे.शांताताईंच्या उदाहरणाने त्यात आणखी एकाची भर पडली.
क्षण भारावलेले – १२ – शोभनाताई
RELATED ARTICLES