Thursday, November 7, 2024
Homeवाचण्याजोगे काहीपगारी शुभंकर ( काळजीवाहक ) - डॉ. सौ. शोभना तीर्थळी

पगारी शुभंकर ( काळजीवाहक ) – डॉ. सौ. शोभना तीर्थळी


शुभंकर म्हणजे केअरटेकर.पक्षाघात,वयामुळे येणारे परावलंबीत्व,अपघातामुळे येणारे तात्पुरते परावलंबीत्व अशावेळी पगारी शुभंकर ठेवण्याची गरज लागते. पगारी शुभंकर हा शब्दच खर तर’ वदतो व्याधात ‘असा आहे. शुभंकर शब्दात अनौपचारिकता,जिव्हाळा आहे तर पगारी मध्ये व्यवहार औपचारिक सबंध आहेत.असे असले तरी पार्किन्सन्स मित्र मंडळाचे काम करताना अनेक पगारी शुभंकर कुटुंबीय घेणार नाहीत तेवढी काळजी घेताना आढळले. पगारी शुभंकरांच्या विविध तऱ्हा पहावयास मिळाल्या.पगारी व्यक्ती ठेवणे सर्वांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते.ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे काही सकाळी आणि रात्री साठी वेगवेगळे काळजीवाहक ठेवून इतिकर्तव्य झाले समजत स्वत:च्या मनाप्रमाणे वागायला मोकळे होताना दिसले.तर काहींनी काळजीवाह्काना घरातले सदस्यच मानले.बऱ्याच शुभार्थिना घरात अशी बाहेरची व्यक्ती असणे असुरक्षिततेचे वाटते.विश्वासार्ह वाटत नाही.पगारी काळजीवाहकाबद्दल अपवादात्मक म्हणून काही घटना घडत असतीलही पण यामुळे घाबरून न जाता गरज असल्यास पगारी शुभंकर असणे केंव्हाही चांगले असे माझे वैयक्तिक मत आहे.येथे शुभंकर शब्दाला पूर्णपणे न्याय देणाऱ्या पगारी काळजीवाहकाबद्दल लिहून याबाबतचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

शुभार्थी डॉक्टर प्रभाकर देशपांडे वय वर्षे ९० आणि त्यांच्या शय्याग्रस्त डॉक्टर पत्नी.देशपांडे यांनी एक जोडपेच घरी ठेवले. कुलकर्णी पती पत्नी त्यांच्यासाठी घरातले सदस्यच वाटायचे.हे जोडपेही त्यांना आई वडिलच मानायचे.देशपांडे म्हणजे माझ्यासाठी देवच असे कुलकर्णी म्हणायचे. दुसऱ्या मजल्यावर राहायचे लिफ्ट नव्हती.दोन जिने उतरून डॉक्टरना खाली आणायचे म्हणजे कठीण काम होते. पण कुलकर्णी रोज त्यांना खाली फिरायला आणायचे मंडळाच्या सर्व सभांना सहलींनाही ते घेऊन यायचे.पीडीबद्दल सर्व माहिती करून घ्यायचे.देशपांडे एक कलंदर व्यक्तिमत्व.प्रचंड उत्साही कधी मनात आले की आमच्यापैकी कोणाकडेही त्यांना जायचे असायचे.कुलकर्णी न कंटाळता आणायचे.ते त्रासदायक होत म्हणून आम्हीच त्यांच्याकडे अनेकदा भेटी साठी जायचो.देशपांडे यांची पत्नी निवर्तल्यावर मुलांनी त्यांना वृद्धाश्रमात ठेवले.त्यांना जवळून ओळखणाऱ्या कुलकर्णीनी आपला फोन नंबर देऊन सांगितले गरज पडल्यास मी आहे.कलंदर देशपांडेना वृद्धाश्रमाच्या नियमात,यांत्रिक व्यवस्थेत बांधून राहणे कठीण होते.ते सारखे पळून जाऊ लागले.वृद्धाश्रमचालकांनी त्यांना घेऊन जायला सांगितले आणि पुन्हा कुलकर्णीना पाचारण करण्यात आले.देशपांडेंच्या शेवटच्या श्वासापर्यंत कुलकर्णीनी त्यांची सेवा केली.

अनिल कुलकर्णी आणि शिला कुलकर्णी या दोघानाही पीडी असल्याने पगारी शुभंकर असायचाच.सुरुवातीला त्यांचा ड्रायव्हरच दोघांचा सहाय्यक होता.दोघांच्या पिडीची लक्षणे वाढत गेल्यावर दोघांना स्वतंत्र शुभंकरांची गरज निर्माण झाली.अनिल कुलकर्णी पडल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली.त्यानंतर सकाळचा रात्रीचा वेगळा सहाय्यक,शीलाताइंची सहाय्यक, वरकामाची बाई,स्वयंपाकाची बाई,हरकाम्या ड्रायव्हर असे विस्तारित कुटुंबच तयार झाले.याशिवाय ते शनिवार रविवार त्यांच्या फॉर्म हाउसवर जातात.तो लवाजमा वेगळाच.सभेला येताना दोघांचे सहाय्यक आणि ड्रायव्हर असे सर्व येत..अनिता तर शिला ताईंच्या बरोबर नृत्योपचारात सामील होऊन नृत्य शिकायची त्यामुळे आम्हा सर्वांच्या परिचयाची आहे.शीलाताई विणकाम करतात.आम्ही त्यांच्याकडे गेलेल्यावेळी त्यांनी अनितासाठी स्वेटर करायला घेतला होता..कुलकर्णी यांच्या निधनानंतर ड्रायव्हर आणि सहाय्यकासह शीलाताई सभाना येतात

अग्निहोत्री पती पत्नी दोघानाही पीडी आहे.रामचंद्र अग्निहोत्री शय्याग्रस्त. त्यांची पत्नी थोडी चालती फिरती.त्यांच्याकडेही दोघांसाठी स्वतंत्र सहाय्यक.एकदा मी थोडी अवेळीच त्यांच्याकडे गेले तर सहाय्यक झोपलेली. अग्निहोत्री म्हणाल्या मीच तिला म्हणते जरा दुपारी झोपत जा.मध्यंतरी बरेच दिवस अग्निहोत्रींचा फोन लागत नव्हता.माझ्याकडे त्यांच्या सहाय्यकाचा ही फोन आहे हे लक्षात आले आणि चौकशीसाठी फोन केला तर घराला रंगकाम चालू असल्याने काही काळापुरते ते तळजाईला शिफ्ट झाले होते अर्थात ही सहाय्यिका तिथेच होती.तुम्ही दिलेल्या पुस्तकातील व्यायाम मी आजोबांकडून करून घेते असे ती सांगत होती.असे परस्पर संबध जिव्हाळ्याचे होणे तुम्ही त्यांच्याशी कसे वागता यावरही अवलंबून आहे. देविदास शिरवईकर यांच्याकडे एका खेड्यातून नर्सिग शिकायला आलेला विद्यार्थी राहायला होता. दिवसभर एक बाई होत्या.संध्याकाळी कॉलेज संपवून तो येई.रात्रीची ड्युटी त्याची असे.त्याचा राहायचा प्रश्न सुटला होता आणि यानाही प्रेमानी काम करणारा सहाय्यक मिळाला होता.तो त्यांच्या घरचाच झाला होता.

दिवाणे यांनी संध्याकाळी फिरायला जाण्यासाठी विद्यार्थी सहाय्यक समितीमधला एक विद्यार्थी ठेवला होता. कुंदा प्रधान या स्वत:च्या कवितेचे वाचन,संत साहित्य निरुपण असे कार्यक्रम करायच्या.प्रधान यांच्यासाठी सहाय्यक ठेवण्याची वेळ आली तेंव्हा त्यांनी ठेवलेल्या सहाय्यीकेला चांगलेच ट्रेंड केले.स्वत:चे कार्यक्रम चालूच ठेवले आणि घरात असलेल्या वेळी प्रधानाना क्वालिटी टाईम देणे सुरु केले. त्यांच्याकडे आम्ही भेटायला गेलो तर हे पती पत्नी आणि सह्य्यिका यांच्यातील सुसंवाद पाहून आम्हाला खूप छान वाटले.

सर्वांनाच आर्थिक दृष्ट्या दिवसभरासाठी माणूस ठेवणे परवडणारे नसते.पण यावरही बिल्डींगचा वॉचमन,घरात इतर काम करणारी बाई यांचा काही वेळासाठी विशेषत: सकाळचे सर्व विधी उरकताना आधार घेतला जातो या सर्वांबरोबर प्रथमपासून चांगले संबध असले तर हे लोकही आनंदाने मदत करतात. हे सर्व खरे असले तरी अनेकांना असे सहय्यक ठेवणे परवडणारे नसल्याने कामधंदा सोडून शुभार्थीच्या मागे लागावे लागते.शब्बीर सय्यद यांच्याबाबत असेच होते.त्यांच्या पत्नीवर घर चालणार होते दीर औषधाचा खर्च करायचा.मग त्यांच्या पत्नीने घरीच ब्युटी पार्लर सुरु केले. जेंव्हा ती काम करत असे तेंव्हा दहावी शिकणारा मुलाला अभ्यास सोडून त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागे.दिवसभर त्यांना ठेवता येईल असे विरंगुळा केंद्र तिने शोधले पण तसे मिळाले नाही.

हे सर्व पाहिले की पार्किन्सन्स मंडळासाठी किती काम आहे याची जाणीव होते.आता संस्था रजिस्टर होत असताना उद्दिष्टामध्ये असे विरंगुळा केंद्र आर्थिक दृष्ट्या दुर्बलांसाठी विविध तरतुदी केलेल्या आहेत.शेंडे ,पटवर्धन द्वयीनी बागेत सभा घेत कधीकधी दोघांचीच सभा घेत हे बीज रुजवले. आत्तापर्यंत अनेकांच्या मदतीवर व्याप वाढला. अशीच इतर स्वप्नेही आमच्या हयातीत नसली तरी भविष्यात नक्की पुरी होतील.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. लेख अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण झाला आहे. ताई म्हणतात तसे ही जाणीव जरूर होत असते की निव्वळ “शुभंकर” शब्दा्मुळे जी आत्मियता आपसूकच निर्माण होते ती पगारी जोडणीमुळे पूर्णतया व्यवहारी (कोरडीही) बनते. तरीही काही सेवाभावी वृत्तीची उदाहरणे तुम्हाला सापडली आहेतच की ज्यांच्या काम करण्याच्या पद्धतीकडे पाहाताना तुमच्याकडे काम करताना ते आपण “पगारी शुभंकर”आहेत ही भावना मनी न ठेवता ज्याला सर्वस्वी सेवाभावी वृत्ती म्हटली जाते त्याच भूमिकेतून ते आपली सेवा रुजू करतात. ही निश्चित्तच अभिनंदनीय अशीे बाब आहे. अर्थात हेही तितकेच सत्य की पगारी व्यक्ती ठेवणे सर्वांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते. काहीं ठिकाणी कुटुंबातीलच एखादी व्यक्ती काळजीवाहक म्हणून कार्य करताना दिसते (अर्थात मुली जास्त प्रमाणात); पण हेही आढळते की सर्वस्वी कुटुंबातील व्यक्तीवरही अवलंबून राहाणे सहजी शक्य नसते…अनेक अडचणी येतात. वेळेची मर्यादा त्याशिवाय त्या व्यक्तीचे स्वत:चे असे जीवन इ.इ. थोडक्यात पगारी शुभंकर हाच एकमेव पर्यात अशा परिस्थितीत समोर येतो आणि त्याला अन्य विकल्प नाहे. काही ठिकाणी (अनेक कारणास्तव) छोटेमोठे मतभेद होत असतात….त्यात काही गैर नाही, ती बाब तत्वत: स्वीकारून एखाद दुसर्‍या प्रसंगावरून एकूणच पगारी शुभंकर ही सोय तसेच विकल्प दूर करू नये असे वाटते. शोभनाताई यानी देखील लेखाचा जो शेवट केला आहे तो याच भावनेतून केला आहे, ते मला आवडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क