Sunday, October 6, 2024
Homeवृत्तांतगुरुवार दिनांक १४ सप्टेंबर २०१७ सभावृत्त

गुरुवार दिनांक १४ सप्टेंबर २०१७ सभावृत्त

गुरुवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची मासिक सभा हॉटेल अश्विनी येथे पार पडली. सभेस ६०/ ७० सभासद उपस्थित होते.वक्त्या डॉक्टर सोनल चिटणीस ४.३० ला येणार होत्या.त्यामुळे प्रार्थनेनंतर सुरुवातीलाच शुभंकर, शुभार्थी यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.लता अवचट आणि उषा चौधरी यांची पंचाहत्तरी झाली.लताताईनी यानिमित्त बर्फी आणि उषाताईनी पेढे वाटले.राजीव ढमढेरे,सविता ढमढेरे ५/६ महिन्यानंतर अमेरिका दौरा करून आले.राजीव ढमढेरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अमेरिकेहून आणलेली चॉकलेटस वाटली.
९४ वर्षाचे कलबाग हे एकटेच राहतात. कार्यक्रमाला त्यांची कॅनडास्थित भाची स्मृती हळदीपूर आल्या होत्या..त्यांनी तेथील समाजाचा पेशंटकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि येथे आल्यावर समाजाचा दृष्टीकोन यात फरक जाणवल्याचे सांगितले.इकडे समाजात वावरताना पेशंटला संकोच वाटतो.कलबाग यांनी मात्र एकटे राहूनही स्वत:ला चांगले रमवून घेतले असल्याचे सांगितले.या सभेंला बरेच नविन शुभार्थी आले होते, मेहता पती पत्नी इंदापूरहून आले होते.सौ दिवाण यांना त्यांचा मुलगा घेऊन आला होता.त्यांनीही आपल्या आईच्या पीडीविषयी अनुभव सांगितले.

डॉक्टर सोनल चिटणीस आल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले.अरुंधती जोशी यांनी त्यांची ओळख करून दिली.डॉक्टर चिटणीस यांनी श्रोत्यांशी संवाद साधत व्याख्यानाला सुरुवात केली.काही वस्तू सांगितल्या. त्या डोळे बंद करून डोळ्यासमोर आणायच्या आणि डोळे उघडून आठवून सांगायच्या.ही अगदी छोटी क्रिया वाटली तरी आजूबाजूचा परिसर न्याहाळून अशी क्रिया करीत राहिल्यास बोलणे, आठवणे या मंदावलेल्या क्रियांची गती वाढण्यास मदत होते.पीडीमध्ये औषधाबरोबर व्यायामही महत्वाचा असतो.तो का महत्वाचा असतो हे सांगताना प्रथम त्यांनी पार्किन्सन्सची लक्षणे, अवस्था,विविध प्रकार यांची माहिती सांगितली.शरीराच्या हालचालीवर नियंत्रण करणारा डोपामिन हा स्त्राव कमी झाल्याने कंप,गतिमंदता,ताठरता या गोष्टी होतात.बाहेरील अवयवाप्रमाणे जीभ,स्वरयंत्र,श्वास नलिका,अन्ननलिका या बोलणे,गिळणे हे कार्य करणाऱ्या यंत्रणांवरही हा परिणाम होत असतो.

बोलण्याच्या पातळीवर आवाजातील चढउतारावर परिणाम होतो.बोलताना एक शब्दावरच अडखळणे, शेवटच्या शब्दाचा उच्चार न होणे यामुळे समोरच्या व्यक्तीला बोलणे समजत नाही.संवाद साधता येत नसल्याने बोलणे,बाहेर जाणे कमी होते. यातून नैराश्य येते.यातच ताठरतेमुळे आपल्याला काम जमणार नाहीअसे वाटते.त्यामुळे काम न करणे,इतरांचा आधार घेणे सुरु होते.आत्मविश्वास कमी होतो.व्यायामाने यावर मात करता येते.अर्थात प्रत्येक व्यक्तीत हे सारखे नसते.काहीना बोलता चांगले येते. हालचाली करता येत नाहीत. काहीना हालचाली चांगल्या करता येतात पण बोलण्यात दोष निर्माण होतो.शरीर यंत्रणा एकसंध असल्याने बोलणे,गिळणे,आठवणे या सर्वांवर इतरही अनेक बाबींचा परिणाम होता असतो.याचे निट निदान झाल्यावरच औषध योजना ठरवण्यात येते.पीडीची औषधे आणि इतर काही आजार असल्यास त्याची औषधे, B12,D Vitamin ची कमतरता,मेंदूला रक्त प्रवाह,ऑक्सिजन यांचा पुरवठा कमी होणे याचा परिणाम होत असतो. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळात लक्षणात चढउतार होत असेल तर कोणत्या गोळ्या आहेत त्यांचा परिणाम होतो का हे पाहणे आवश्यक आहे. त्यानुसार निरीक्षण करून डॉक्टरना सांगणे आवश्यक आहे.

पीडीमध्ये बोलण्या,गिळण्याबरोबर पोश्चर,गेटची समस्या,तोल जाणे, पडणे,फटिग अशा अनेक बाबी औषधाने बऱ्या होणाऱ्या नसतात त्यासाठी व्यायामच लागतो.त्यासाठी त्या त्या विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. या सर्व व्यायामाचे दिवसभराचे शेड्युल करणे आवश्यक आहे.त्याची सवय होते. तो एक प्रकारचा रियाज असतो.आजाराच्या अवस्थेनुसार जीवन शैली ठरवणे आवश्यक आहे.म्हणजे नेमके काय हे सांगणारे व्याख्यानातील महत्वाचे मुद्दे पुढे देत आहे.

बोलणे, गिळणे याचा विचार करता प्रथम स्पीच लँग्वेज pathologist कडून आपली बोलण्या ,गिळण्याची समस्या कोणत्या अवस्थेत आहे हे समजून घ्या.यासाठी असलेल्या डिव्हाईसद्वारे हे तपासता येते.त्यानुसार व्यायाम दिले जातात.

समस्या फार वाढण्याच्या आधीच व्यायाम केल्यास पीडी पूर्ण बरा होणार नसला तरी परिस्थिती नियंत्रणात आणता येते.

गिळण्याची समस्या असल्यास पाणी पिणे टाळले जाते.तसे न करता straw ने पाणी प्या. पेल्याने पाणी पिताना मोठे घोट घेतल्याने ठसका लागतो.खाद्य पदार्थ मउ करून खा. कण राहु द्रेऊ नका.ठसका लागू नये म्हणून गिळताना हनुवटी खाली करा.पाणी, अन्न श्वास नलिकेत गेल्यास न्युमोनिया होऊ शकतो.

जीभ आतल्या आत थांबते असे वाटते.तिचे नियंत्रण कमी होते.अशावेळी जीभ बाहेर, आत,बाहेर,वरती,खालती करणे असा व्यायाम करावा.बोलणे आणि गिळणे या दोन्हीसाठी तो उपयुक्त आहे.

तोंडात अन्न घालताना ते योग्य ठिकाणी ठेवले गेले पाहिजे. फार पुढेही नको फार मागेही नको.नंतर हनुवटी थोडी तिरकी खाली करायची.असे केल्याने अन्न नीट आत जाऊ शकते नाहीतर अडकते,ठसका लागतो.अन्नकण छातीत अडकतात.

वासाची क्षमता कमी होते यासाठी विविध पदार्थांचे वास घेऊन पहा. सौम्य वास आले नाहीत तर तीव्र वास घ्या.

घास तोंडातून बाहेर येतो याचा अर्थ जिभेचे आणि ओठांचे नियंत्रण गेले आहे.व्यायामाने यावर नियंत्रण आणता येते.ओठ बाहेर काढणे,दाबणे,इकडे तिकडे स्ट्रेच करणे अशी क्रिया मधून मधून करत राहावी.

श्वास पुरेसा घेतला न जाणे, योग्य प्रकारे न घेणे याचाही बोलण्यावर परिणाम होतो.तोंडाने श्वास घेऊन,तोंडाचा फुगा करून हळूहळू श्वास सोडावा.तज्ञांचा सल्ला घ्यावा.

बोलण्याची क्षमता वाढवण्यासाठी आ,ई ऊ नंतर ई ऊ आ असे म्हणा.ओम म्हणा.अशा प्रकारचे विविध व्यायाम प्रकार सांगितले. असे स्वरावर काम केल्याने बोलण्याच्या अवयवांना व्यायाम होतो.ओठ,जीभ, स्वरयंत्र या सर्वांनाच अशक्तपणा आलेला असतो. त्यामुळे व्यायाम अतीही नको, कमीही नको.थांबून थांबून करा.(प्रत्येकाची क्षमता कमी जास्त असल्याने तज्ज्ञ व्यक्ती हे ठरवू शकेल.)

ज्यावेळी बोलणे अजिबात समजत नाही अशा वेळी पिक्चर बोर्ड बनवा.

शारीरिक व्यायामाबरोबर मेंदूचे व्यायामही महत्वाचे.

शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यासाठी इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करणे,नावे आठवणे,शब्द आठवणे,,गाणी आठवणे,गाणी म्हणणे,ऐकणे,रांगोळी काढणे,नृत्य म्हणजे तालावर हालचाली करणे,बागकाम करणे, ताटात रवा घेऊन त्यावर अक्षरे काढणे अशा विविध क्रिया करत राहा.मेंदूला यामुळे चालना मिळते.

यानंतर डॉक्टर चिटणीस यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांच्या विषय कक्षेच्या बाहेरच्या प्रश्नांनाही न कंटाळता उत्तरे दिली.सभा संपली तरी श्रोत्यांचे व्यक्तिगत प्रश्न विचारणे चालूच होते.

सोनल चिटणीस यांच्याबरोबर त्यांच्या विद्यार्थिनीही आल्या होत्या.त्यांचे काही प्रकल्प चालू आहेत त्यासाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांची नावे लिहून घेतली.

– डॉ. सौ. शोभना तीर्थळी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क