Friday, November 8, 2024
Homeक्षण भारावलेलेक्षण भारावलेले - ७ - शोभनाताई

क्षण भारावलेले – ७ – शोभनाताई

आमच्या गाण्याच्या क्लासमधल्या सुनिता पोतनीस त्या दिवशी मॅडमना म्हणल्या,’पार्किन्सन्सच्या एक ८३ वर्षाच्या पेशंट आहेत आणि त्यांना गाणे शिकायचे आहे कोणी आहे का शिकवणारे?’

मॅडम म्हणाल्या, ‘त्यांना अगदी प्राथमिक शिकायचं असेल तर तुम्ही जाऊन पहा त्यांना कितपत जमते ते आणि तुम्हीच का नाही शिकवत?’
पार्किन्सन्स म्हंटल्यावर मी कान टवकारले ‘कोण आहेत पेशंट?’ मी विचारले. पोतनीस म्हणाल्या मालती अग्निहोत्री म्हणून आहेत. सातारा रोड ला राहतात’ मी म्हटलं, ‘ अरे या तर मला माहिती आहेत.आमच्याच मंडळातल्या आहेत. मी त्यांच्याकडे गेले आहे काही वेळा.’ खरंतर खूप दिवसापासून मला त्यांच्याकडे जायचे होते पण जमत नव्हते. त्यांचे तीन जिने चढून जावे लागतात हा माझ्यासाठी अडथळा होता मालती अग्निहोत्री आणि रामचंद्र अग्निहोत्री या दोन्ही पती-पत्नीला पार्किन्सन्स होता. रामचंद्र अग्निहोत्रीना जावून अडीच वर्षे झाली. मला मालतीताईना भेटायला जाणे शक्य झाले नव्हते. त्यावेळी मी त्यांना फोन केला होता आणि माझी अडचण सांगितली होती. आता पोतनीस जात आहेत म्हटल्यावर त्यांच्याबरोबर आपण जाऊन भेटू असे मला वाटले.

मालती अग्निहोत्री म्हणजे एकदम उत्साही, प्रेरणादायी व्यक्तिमत्व. दोघांना पण पार्किन्सन्स होता पण त्यांच्या पतीना स्विकारता नाही आला. ते लवकरच शय्याग्रस्त झाले. मालतीताईनी मात्र पार्किन्सन्सला चांगल्या प्रकारे स्वीकारलं. खरंतर त्यांचा पार्किन्सन्स गुंतागुंतीचा होता बऱ्याच पीडी पेशंटच्या बाबतीत गीळण्याची समस्या असते. त्यांच्याबाबतीत ही समस्या होती पण थोडी वेगळी त्यांना लिक्विड काही गिळता येत नव्हतं. न्यूरॉलॉजिस्टच्या सल्ल्याने त्यांच्या पोटात नळी बसवली होती. सर्व नळीतून घ्यावे लागायचे. डॉक्टर म्हणाले होते की, पाव गोळी, अर्धी गोळी असं थोडं थोडं करत वाढवून तुम्ही गोळी गिळण्याचा प्रयत्न करा.ते जमले तर नळी काढू. आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्या नळी लावलेल्या अवस्थेतच सहजपणे फिरत होत्या. चष्मा घालावा तसं ते त्यांच्यासाठी सहज होते.

त्यावेळी आम्ही आमच्या स्मरणिका किंवा काही द्यायचे असले तर जवळच्या लोकांना घरी जाऊन द्यायचो. यामुळे पोस्टाचा पोचेल की नाही हा प्रश्न असतो तो प्रश्न येणार नाही आणि त्या निमित्याने गाठीभेटी होतात असा विचार असे. गेलो की त्या खूप आदरातिथ्य करायच्या. कुठल्याही वेळी गेलं तरी हसतमुखाने स्वागत करायच्या. एकदा काय झालं राव नर्सिंग होम मध्ये आम्ही एका पेशंटला भेटायला गेलो होतो आणि भेटायची वेळ नसल्याने थोडे थांबावे लागणार होते. माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणी होत्या मी त्यांना म्हटलं इथे आमच्या अग्निहोत्री म्हणून पेशंट जवळ राहतात आपण जाऊयात का? त्या म्हणाल्या चालेल. माझ्या पर्समध्ये पत्त्यांची एक यादी असते अग्निहोत्रीना फोन केला आणि येऊ का विचारले. दुपारची वेळ होती तरी त्या चालेल म्हणाल्या. आम्ही गेलो तर त्या व्हीलचेअरवरून दार काढायला आल्या. मनातून मला थोडे वाईट वाटले नंतर आम्ही आत गेल्यावर आम्हाला काहीतरी द्यायला व्हीलचेअरवरून उठल्या. चालत काम करू लागल्या.मी प्रश्नार्थक नजरेने पहिले. ते लक्षात आल्यावर त्या म्हणाल्या, की

‘ मला दमणूक होते म्हणून मी व्हीलचेअर घेतली आहे. येरझा-या घालायच्या असतील, इकडेतिकडे जायचे असेल, तर मी व्हीलचेअर वापरते. एरवी माझी मी उठून कामे करत असते.आत्तासुद्धा काही काम नव्हते म्हणून मी बाईला झोपायला सांगितले.म्हणून मी दार काढायला व्हीलचेअरवरून आले’.तेव्हा असाही विचार करता येतो हे लक्षात आल्यावर मला खूप गंमत वाटली.अनेकांना मी हे उदाहरण देते. पण घरच्या लोकांना वाटते एकदा व्हीलचेअर दिली की चालण्याचा प्रयत्नच होणार नाही.अर्थात प्रत्येकजण मालतीताईसारखा असणार नाही हेही खरेच.
मालतीताईना स्वत:ची शक्ती कशी पुरवून वापरायची. असलेल्या परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे हे छान जमले आहे. त्या आणि त्यांचे पती दोघेही शाळेत शिक्षक होते या रेणुकास्वरूप मध्ये स्पोर्ट्सच्या शिक्षिका होत्या त्यामुळे खिलाडु वृत्ती, हार मानायची नाही जिंकण्यासाठी लढायचे हा त्यांचा बाणा जगण्यातही आहे.

त्यानंतर एकदा आम्ही गेलो तेव्हा त्यांच्या पोटावर असलेली नळी काढलेली होती आणि आता त्यांना गोळी गिळता येत होती.पाणी प्याल्याचे समाधान मिळत होते. त्यांनी प्रयत्नपूर्वक हे साध्य केले होते आणि न्यूरॉलॉजिस्टच्या सांगण्यावरूनच नळी काढली होती. इतर व्यायामाबाबतही त्या नियमित होत्या.त्यांना जिथे नळी लावली होती तिथे पोटात अजून थोडं दुखत असे.

त्यादिवशी शिकवणाऱ्या बाई येणार म्हणून त्यांची मुलगी आली होती. सुनिता त्यांच्या नात्यातील होती त्यामुळे त्यांचे संबंध अनौपचारिक होते सुनीताच्या मालती ताई गुरु होत्या आणि आता सुनीता त्यांची गुरु होणार होती. आम्ही गेल्यावर त्या व्हीलचेअरवरून आल्या. ऊठून पेटी वाजवण्यासाठी खुर्चीवर बसल्या. सगळे अगदी सहजपणे चालले होते. त्यांची केव्हापासून ची गाणं शिकण्याची इच्छा पूर्ण होणार म्हणून त्या खुश होत्या सुनीता जे शिकवत होती ते सहजपणे करत होत्या. काही वेळाने त्या पार्किन्सन पेशंट आहेत हे मी ही विसरून गेले.

सुनिताबरोबर मी गेले तेंव्हा पार्किन्सन्सविषयी काही बोलायचे नाही असे ठरवले होते.मला त्यांचे पेटी शिकणे अनुभवायचे होते.
त्या स्वतःवर विनोद करत होत्या ईतरांवर विनोद करत होत्या. त्यांची मुलगी त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगत होती जास्तीत जास्त स्वावलंबी कस राहायचं असा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांच्या कॅलेंडरवर दुधाचा हिशोब,गॅस केव्हा आला त्याच्या तारखा, वेगवेगळी बिल भरण्याच्या तारखा, फिजिओथेरपिस्ट,मसाजीस्ट,बिकानेरवाला, वाणी असे विविध फोन नंबर असे सर्व लिहिलेलं होतं आणि गरजेनुसार त्या फोन करून स्वतः सर्व मॅनेज करत होत्या आम्ही गेल्या गेल्या त्यांनी बिकानेर वाल्याकडे फोन करायला सुरुवात केली होती आमच्यासाठी त्यांना खायला मागवायचं होतं आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला काही खायचं नाहीये तरी त्यांनी बर्फी मागवली आमच्याबरोबर खाल्ली ही.

त्यांच्याकडे दिवस-रात्र राहणारी एक बाई ठेवलेली आहे तरीही स्वतःला जमेल तेवढे त्या करतच असतात.मुलगी अधून मधून फेरी मारत असते.
त्यांचे घर तिसऱ्या मजल्यावर त्यामुळे त्यांचे खाली उतरणे होत नाही तेवढी ताकद त्यांच्यात नाही.त्यांच्या बरोबर राहणारी बाई आणि त्या हे दोनच चेहरे,आणि घराच्या भिंती.घराला बाहेरचे दृश्य दिसेल रस्त्यावरची हालचल दिसेल असेही काही नाही.अशावेळी शुभार्थीला नैराश्य येण्याची शक्यता असते. पण मालती ताई हे वेगळेच रसायन आहे. त्यांच्यात कोठे ही कंटाळलेपणा,दुर्मुखलेपणा,कुरकुर नाही.उलट आनंदी दिसत होत्या.शेजारच्या चाळीस पन्नाशीच्या बायका येतात आम्ही गप्पा मारतो,हसतो, खिदळतो,खानपान करतो.असे त्या
सांगत होत्या.मला याचे खूप आश्चर्य वाटले.

त्यांची शारीरिक अवस्था फारशी चांगली नाही.इतक्या वर्षाचा पीडी.या कशाचेच त्यांना काही नव्हते.त्या सहजपणे वावरत होत्या.चहा पिण्यासाठी, पेटी वाजविण्यासाठी खुर्चीवर बसल्या.मध्येच व्हीलचेअरवरून बाथरुमला जाऊन आल्या.मुलगी सांगत होती उलट ती आम्हालाच सारखीच तुमची सर्दी झाली,पाठ दुखली अशी कुरकुर का असते?.असे रागावते.

मी घरी परतले ती एक सकारात्मक उर्जा घेऊनच.निराशेने ग्रासलेल्या शुभार्थीनी एक दिवस मालती ताई यांच्याबरोबर घालवला तर त्यांचे नैराश्य कोणत्याही समुपादेशनाशिवाय निघून जाईल असे मला वाटले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क