Thursday, October 3, 2024
Homeवृत्तांत१४ जानेवारी २०१९ सभा वृत्त. - शोभनाताई

१४ जानेवारी २०१९ सभा वृत्त. – शोभनाताई

                         पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या नवीन वर्षाच्या कार्यक्रमाची  सुरुवात १४ जानेवारीच्या सभेने झाली.यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्यस्तरीय अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांचे ‘आपली तब्येत सांभाळा’  या विषयावर व्याख्यान झाले.सभेस ७०/८० जण उपस्थित होते.चिपळूणहून प्रदीप करोडे,औरंगाबादहून रमेश आणि आरती तिळवे,सांगलीहून श्री मुळीक हे आलेले होते.मंडळाचा मोठ्ठा आर्थिक भार उचलणाऱ्या अमेरिकास्थित सुधाताई कुलकर्णी आता भारतात आलेल्या आहेत, त्याही आवर्जून उपस्थित होत्या.कलबाग यांची भाची हळदीपूर कॅनडाहून आल्या की सभेस येतात, त्याही आल्या होत्या. ठरल्याप्रमाणे संक्रांतीनिमित्त बहुसंख्य जण काळे कपडे घालून आले होते.ओळखी करून घेतल्या जात होत्या. एकूण उत्साहाचे वातावरण होते.

                    शुभंकर, शुभार्थी यांचे वाढदिवस साजरे झाल्यावर मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.

         डॉक्टर भोंडवे यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात केली. आपली तब्येत सांभाळून पार्किन्सन्ससह आनंदी राहण्यासाठी प्रथम त्याचा स्वीकार आवश्यक.

         यानंतरची पायरी  न्यूरॉलॉजिस्टकडे जाणे. ते त्यातले तज्ञ असतात. कोणतेही प्रश्नचिन्ह मनात न आणता त्यांनी सांगितल्यानुसार औषधे घेणे. यानंतर आपल्या तब्येतीत काही बदल होत आहेत का हे पाहून त्यानुसार डॉक्टरांना सांगणे हे आवश्यक आहे. तब्येत सांभाळण्यासाठी हे सर्व  १० टक्केच असते. ९० टक्के आपल्या हातात असतात. यासाठी   आहार, व्यायाम, व्यसने टाळणे , तपासण्या आणि मानसिक आरोग्य ही पंचसूत्री वापरायला लागेल. आजार पूर्ण बरा होणार नसला तरी तो काबूत ठेवण्यासाठी ही आयुधे आहेत.

                   आहार समतोल असावा. त्यात कर्बोदके,  प्रथिने, स्निग्ध पदार्थ, क्षार , जीवनसत्वे यांचा समावेश आवश्यक आहे. पाणी ही महत्त्वाचे आहे. दोन – तीन लिटर तरी पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी पिणे शक्य नसल्यास सरबत प्यावे. रक्तदाब असणाऱ्यांनी मीठ कमी घालावे आणि मधुमेह असणाऱ्यांनी साखर कमी घालावी. पार्किन्सन्स व्यक्तींसाठी तंतुमय पदार्थ आहारात असणे ही अत्यंतमहत्त्वाची बाब आहे. यात पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये असावीत.याशिवाय दूध असावे. पार्किन्सन्स पेशंटसाठी Omega 3  Fatty Acid  ही आवश्‍यक आहे. यामुळे  चांगले  कोलेस्टेरॉल वाढू शकते. गाईचे तूप,अक्रोड,बदाम ई. मध्ये ते असते.पार्किन्सन्समध्ये गिळण्याची, चावण्याची समस्या असू शकते. यासाठी सर्व आवश्यक अन्न घटक असलेल्या  पावडरची रेडीमेड  पाकीटे मिळतात. तेही वापरण्यास हरकत नाही. हाताला कंप असल्यामुळे पाणी पिण्यासाठी स्ट्रॉ असलेले ग्लास वापरावे.एकावेळी जास्त खाणे शक्य नसते म्हणून थोड्या थोड्या वेळाने खावे.

                                आहाराइतकेच महत्व व्यायामाला आहे. व्यायामात आधी उद्दिष्ट ठरवावे. फिटनेस महत्त्वाचा. व्यायाम केल्यावर हालचाली सुकर होणे आणि व्यायाम केल्यावर ताजेतवाने वाटणे,दमल्यासारखे न वाटणे याला फिटनेस म्हणता येईल. सर्वात सोपा आणि उपयुक्त व्यायाम चालणे हा आहे. चालताना टाच आधी टेकायची.चालताना पोश्चर योग्य असावे.खाली पाहून चालू नये.समोर पाहून चालावे म्हणजे तोल जाणार नाही. वळताना यु टर्न घेतला जातो तसे वळा. पाऊल टाकताना दोन पायात जास्त अंतर असावे, हातात काही घेऊ नये. पाण्यात चालणे, पोहणे, पाण्यात खेळ खेळणे हेही व्यायामासाठी उत्तम. यात तोल गेला आणि पडले तरी लागण्याची भीती नसते. कोणताही व्यायाम करताना दमलात की थांबा. अर्थात कंटाळा आला म्हणून थांबणे असे नको. जे शय्याग्रस्त आहेत त्यांनी गादीवर झोपून  हातापायाच्या, सांध्यांच्या हालचाली कराव्यात. ज्यांनी योगासने,सूर्यनमस्कार आधी केले आहेत त्यांनी ते  करण्यास हरकत नाही, पण ज्यांनी केले नाहीत त्यांनी मात्र तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते करावे. नृत्योपचारही शरीर,मनासाठी चांगला.बोलण्याचा व्यायामही महत्वाचा.

           विश्रांतीही महत्वाची आहे.रोजची झोप आवश्यक.झोप किती असावी हे प्रत्येकासाठी वेगळे असेल.झोपून उठल्यावर मन आणि शरीर फ्रेश वाटले तर झोप झाली,अंग जड वाटले तर ती अधिक झाली.झोपेची वेळ पक्की ठरवा. रात्री उठावे लागल्यास थोडे थांबून नंतर उठा.

         कोणतीही व्यसने टाळावीत. शारीरिक तपासण्या नियमित कराव्यात.

         मानसिक शांतता,समाधान महत्वाचे.स्वास्थ्यासाठी तणावाचे नियोजन करावे. यासाठी आजार स्वीकारणे महत्वाचे.मन स्वस्थ राहण्यासाठी ध्यान महत्वाचे.ध्यान म्हणजे मन विचार विरहित असणे.पूजा करताना, कोणतीही कृती करताना मनापासून करा.एकाग्रता महत्वाची.वर्तमानात राहावे. कोणत्या ना कोणत्या गोष्टीत व्यग्र राहावे. छंद जोपासावे.आजार दुर्धर असला तरी वरील  सर्व गोष्टी सांभाळून आनंदी राहू शकता.

        विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असल्याने अनेक प्रश्न विचारले गेले.डॉक्टर भोंडवे यांनी त्याची समर्पक उत्तरे दिली. WhatsApp वरून येणाऱ्या आरोग्यविषयक पोस्टवर, डाएटवर विश्वासू नका. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्या, असा सल्ला दिला.

                यावेळी  जानेवारीचा संचारचा अंक सर्वांना देण्यात आला. मंडळाकडून तिळगुळ देण्यात आला. इतरांचीही तिळगुळाची देवाण घेवाण चालू होती.औरंगाबादहून आलेल्या शुभार्थी आरती तिळवे यांनी संक्रांतीनिमित्त स्वत: विणलेले रुमाल महिलांना दिले.

        हे सर्व चालू असताना डॉक्टरांच्या भोवती प्रश्न विचारण्यासाठी अनेकांनी कोंडाळे केले होते.ते आता वक्ते न राहता आमच्यातील एक होवून गेले होते. हा सिलसिला त्यांनी स्कुटरला किक मारेपर्यंत चालू राहिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क