२९ सप्टेंबर च्या सकाळमध्ये हवाई दलातील माजी अधिकारी सुधाकर परांजपे यांनी गच्ची वरून उडी घेऊन आत्महत्या केली असे वृत्त वाचनात आले. माझे मन सुन्न झाले. कर्तव्यनिष्ठ अधिकारी ते समाजसेवक अशी त्यांची वाटचाल असल्याचे वृत्तात दिले होते. त्यांनी का आत्महत्या केली हे समजले नाही पण त्यांना पार्किन्सन्स होता असे ही वृत्तात होते.
‘नैराश्य हा या आजाराचा विशेष असल्यामुळे या आजारात संवादाची गरज आहे’ अशी मेंदू विकार तज्ञ राहुल कुलकर्णी यांची टिप्पणी त्यावर होती.
या विषयावर लिहावे असे बरेच दिवस मनात घोळत होते.पण लेखणी धजावत नव्हती.या विषयावर बोलण्याचा माझा अधिकार नाही.संवादासाठी आम्ही स्वमदतगटाद्वारे आहोत एवढेच मला सांगायचे आहे.
मृत्यू, आत्महत्या अशा विषयावर आपण बोलायला टाळतोच.पण असे करणे योग्य नाही.
घटना घडली तो क्षण हुकला की माणूस भानावर येतो. इडली ऑर्किड आणि मी चे लेखक विठ्ठल कामत व्यवसायात खोट आल्यामुळे आत्महत्या करायला निघाले होते.. तो क्षण हुकला आणि आज ते आयुष्यात इतके यशस्वी झाले आहेत.अनेक प्रसिद्ध व्यक्तीबद्दल हे घडले आहे. हा विचार आलेल्या क्षणी कोणी सावरणारे असले तर व्यक्ती आत्महत्येपासून वाचू शकते. लहान वयात पार्किन्सन झालेली आमची शुभार्थी अश्विनीने सांगितले होते,’ मला आत्महत्या करावीशी वाटली होती परंतु पटवर्धन यांनी समजावले आणि मी यातून बाहेर आले’ प्रज्ञा च्या बाबतीत स्वमदत गटात आल्यावर तिच्या मनातील आत्महत्येचे विचार गेले अशी अनेक उदाहरणे आहेत.डॉक्टर कुलकर्णी यांनी या आजारात संवादाची गरज आहे असे सांगितले, स्वमदत गट तर यासाठीच आहे.हास्यक्लब,जेष्ठ नागरिक संघ अशा ठिकाणीही संवादासाठी वाव असतो.स्वमदत गटात सर्व एकाच नावेचे प्रवासी असल्याने तुमच्या समस्या, दु:ख समजणे अधिक सोपे होते.याच समस्यांना कणखरपणे, सकारात्मकतेने भिडणारेही असल्याने त्यांच्यापासून प्रेरणा मिळू शकते.
आता संवाद हा प्रत्यक्ष भेटीतूनच व्हायला हवा असे नाही.फोनवरून,सोशलमीडीयातूनही तो होऊ शकतो.येथे सातत्याने संपर्कात राहिल्याने प्रत्यक्ष भेट न होताही जवळिक निर्माण होऊ शकते.आमच्या व्हाटसअप ग्रुपवर मुंबई, इंदूर,चिपळूण,बेळगाव,नगर,औरंगाबाद,गोवा, नागपूर अशा विविध ठिकाणचे शुभंकर, शुभार्थी आहेत.यातील कोणीना कोणी हतबल होवून आपली व्यथा मोकळेपणे सांगतो आणि अनेकजण आपापल्यापरी समजूत काढतात.एखादी व्यक्ती निराश आहे असे जाणवले तर थोडा पुढाकार घेवून फोनवर संभाषण करून त्या व्यक्तीचे दु:ख हलके करतात.तुमच्याशी बोलून खूप छान वाटले अशा संभाषणाने फोनच्या दुसऱ्या बाजूची व्यक्ती फोन ठेवते तेंव्हा फोन करणाऱ्या व्यक्तीलाही समाधान मिळते.बेळगावच्या आशा नाडकर्णी एकदा म्हणाल्या, ‘खरच या ग्रुपचा किती मोठ्ठा आधार आहे.’शुभंकरही गोंधळलेला,हतबल झालेला असतो.काहीवेळा फक्त संवादातून काम भागणारे नाही.समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञ यांना भेटा असा सल्ला देवून तो पटवणे, हेही येथे घडते.
२०१८ च्या जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्ताच्या मेळाव्यात मानसोपचारतज्ज्ञ उल्हास लुकतुके यांचे व्याख्यान होते.त्यावेळी ‘शुभार्थीच्या मनात आत्महत्येचे विचार येवू लागले तर शुभंकरांनी कसे हाताळावे’ असा प्रश्न त्यांना विचारला होता.ते म्हणाले होते,
‘आत्महत्या हे कोणत्याही समस्येवरचे उत्तर नाही. नातेवायीकांचे आणि आपले सर्व विचार इन Continuation आणि इन फेवर ऑफ लिविंग असे आणावे लागतात.याला री मोडेलिंग ऑफ थॉट असे म्हणतात.हे त्याच्यावर उत्तर आहे. ते शिकवायला ५/६ सेशन्स लागतात’
त्यामुळे सर्वाना कळकळीची विनंती की, मोकळे व्हा,संवाद साधा,नैराश्याला फिरकू देवू नका,आणि आलेच,ते हाताबाहेर गेले तर तातडीने मानसोपचारतज्ज्ञांना गाठा.
सोबत ‘पार्किन्सन्स आणि नैराश्य’ या लेखाची लिंक दिली आहे.