गुरुवार १० सप्टेंबरला अश्विनी हॉटेल येथे सभा आयोजित केली होती. पुण्यात कोसळणार्या पावसात धडधाकट माणसालाही बाहेर पडाव अस वाटणार नाही अशी परिस्थिती होती.अशा अवस्थेत शुभार्थीना घेऊन यायचं म्हणजे शुभंकरांसाठी दिव्यच.त्यामुळे उपस्थितीबद्दल शंकाच होती.५५ ते६० जणांनी उपस्थिती लाऊन आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली.त्यानंतर रामचंद्र करमरकर यांनी काही महत्वाची निवेदने केली.सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असणार्या शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.शीलाताई कुलकर्णींचा त्यादिवशीच वाढदिवस होता.त्यांनी मोठ्ठा केक आणला होता.केक कापून झाल्यावर अंजली महाजनने त्यांना विचारले, आनंदाचा क्षण विचारल्यावर पटकन काय सांगाल? त्यांचे उत्तर होते मित्र मंडळ. राजीव ढमढेरेनी गाण म्हणायला सांगितल्यावर’ जीवनसे भरी तेरी आंखे ‘ हे गाणे म्हणून आणि त्यावर ‘आय मीन इट’ अशी पुस्ती जोडून पत्नीच्या चेहर्यावर आनंद फुलवला.श्री. बिवलकर यांची अवस्था पाहता त्याना आणण्याचे धाडस करणार्या सौ बिवलकरांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच.
यानंतर’ मित्रा पार्कीनसना’ या शोभना तीर्थळी लिखित, संकलित आणि ई प्रतिष्ठानने प्रकाशित केलेल्या ई पुस्तकाचे श्री शरच्चंद्र पटवर्धन यांच्या हस्ते प्रकाशन झाले.या पुस्तकातील ‘मित्रा पार्कीनसना’ हा भाग आरती खोपकर यांनी वाचून दाखवला.शोभना तीर्थळी यांनी समाजात या आजाराबाबत गैरसमज दूर करून जागृती निर्माण करण्यासाठी,पार्किन्सन्स मित्रमंडळासारख्या स्वमदत गटामुळे पार्किन्सन्ससह आनंदाने जगता येते. हे सांगण्यासाठी अशा पुस्तकाची आवश्यकता प्रतिपादन केली.रामचंद्र करमरकर यांनी पुस्तकासाठी घेतलेल्या कष्टाबद्दल शोभना तीर्थळी यांचे कौतुक केले.
डॉक्टर अशोक झंवर यांचे यानंतर निसर्गोपचार या विषयावर व्याख्यान झाले.त्यांचा परीचय श्री रामचंद्र करमरकर यांनी करून दिला.व्याख्याने, स्वत:वर आणि इतरांवर प्रत्यक्ष निसर्गोपचार हे त्यांनी एखाद्या व्रतासारखे स्वीकारले आहे.वडिलांच्या कडून आलेल्या वारसा आपल्या व्यासंगाने, अभ्यासाने आणि
प्रयोगाने त्यांनी वृद्धिंगत केला.
निसर्गोपचार म्हणजे काय यावर त्यांच्या व्याख्यानाचा भर होता. पृथ्वी,आप,तेज वायू आकाश या पंचमहाभूतापासून सृष्टी निर्माण झाली.मनुष्यदेहही पंचतत्वात्मक.चुकीच्या जीवनशैलीमुळे आजार निर्माण होतात.औषधोपचारविरहीत असा निसर्गोपचाराचा दृष्टीकोन आहे.निसर्ग चूक करत नाही हा निसर्गोपचाराचा सिद्धांत आहे.भारतात निसर्गोपचाराचा पाया.आचार्य के.लक्ष्मण शर्मा यांनी घातला महात्मा गांधीनी तो लोकप्रीय केला.
निसर्गोपचारानुसार शरीरात साचलेले विजातीय विषद्रव्य हाच एकमेव आजार.मेंदूला सगळ कळत.चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरात कचरा निर्माण होतो तो तात्पुरता वेगवेगळ्याअवयवात ढकलला जातो ज्या अवयवात गेला त्यानुसार त्या त्या अवयवाचे आजार निर्माण होतात.यातून सुटकेसाठी पंचमहाभूताचाच आधार घ्यावा लागतो.अनेक उदाहरणे देऊन निसर्गोपाचारात आहार विहार,व्यायाम इत्यादींचे महत्व त्यांनी सांगितले.डॉक्टरांनी आशा सोडली आहे असे अनेक पेशंट शेवटचा उपाय म्हणून निसर्गोपाचाराकडे येतात आणि चमत्कार झाल्याप्रमाणे बरे होतात. असा त्यांचा अनुभव सांगितला.पार्किन्सन्सच्या पेशंटवर मात्र अजून उपचार करण्याची वेळ आली नाही असे त्यांनी सांगितले.
श्रोत्यांच्या अनेक प्रश्नाना त्यांनी उतरे दिली.
ई साहित्यच्या सोनाली घाटपांडे अचानक आलेल्या अडचणीमुळे प्रकाशनाच्यावेळी येऊ शकल्या नाहीत त्या नंतर आल्या.ईसाहित्यबद्दल त्यांनी माहिती सांगितली.
वाढदिवसानिमित्त शिला कुलकर्णी यांनी केक,सविता ढमढेरे यांनी बिस्कीट आणि कॅडबरी.वृंदा .बिवलकर यांनी चकली,पद्मजा ताम्हनकर यांनी पेढे दिले.अश्विनी दोडवाड यांनी चहा दिला.वृंदा बिवलकर यांनी एक हजार रुपयाची देणगीही दिली.औपचारिकरीत्या समारंभ संपला तरी.अनेकजण थांबले होते गप्पांची देवाण घेवाण चालूच होती.एकंदरीत सभाना येऊन व्याख्याने ऐकण्याबरोबर एकमेकाना भेटण्याच्या ओढीनेही शुभंकर शुभार्थी येतात हे जाणवले.