११ एप्रिलच्या जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त दरवर्षी पार्किन्सन्स मित्रमंडळ मेळावा आयोजित करते. हा मंडळासाठी आनंदोत्सव असतो.यावर्षी शनिवार १३ एप्रिल रोजी एस.एम.जोशी हॉल येथे हा मेळावा आयोजित केला होता.दुपारी चार वाजताच्या कडक उन्हाची पर्वा न करता साधारण २५० च्या आसपास श्रोते उपस्थित होते.आल्याआल्या मोरेश्वर मोडक, प्रकाश जोशी सर्वांचे अत्तर लावून आणि ताक देऊन स्वागत करत होते आणि सर्वाना रजिस्ट्रेशन टेबलकडे जाण्यास सांगत होते.
रजिस्ट्रेशन टेबलवर नाव नोंदणी,नवीन आलेल्या शुभार्थींचे फॉर्म भरून घेणे,पुस्तक विक्री, स्मरणिका देणे या सर्व कामांची व्यवस्था केली होती.वैशाली खोपडेकडे हे काम सोपवले होते.
हॉलबाहेर शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
डॉक्टर प्रकाश जावडेकर,विजय देवधर,रमेश रेवणकर, केशव महाजन,उमेश सलगर, आरती तिळवे,उल्हास बापट या शुभार्थींनी आपल्या कलाकृती ठेवल्या होत्या.सोनाली मालवणकरला गिरीश कुलकर्णी आणि वैभव शिरसाट या कामात मदत करत होते.
मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटल येथील न्यूरॉलॉजिस्ट, पीडीएमडीएस या स्वमदत गटाच्या अध्यक्ष आणि पार्किन्सन्सवर अनेक वर्षे संशोधन करणाऱ्या डॉ.चारुलता सांखला या प्रमुख वक्त्या म्हणून आल्या होत्या.त्यांनी ‘पार्किन्सन्सच्या औषधांचे दुष्परिणाम आणि औषधांचे नियोजन’ या विषयावर व्याख्यान दिले.वक्त्या आणि विषय या दोन्हींचेही सर्वांना आकर्षण होते.
मृदुला कर्णी यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले.त्यानंतर ९६ वर्षाचे शुभार्थी नारायण कलबाग यांनी इशस्तवन म्हटले.तब्येत बरी नसतानाही ते मुंबईहून कार्यक्रमासाठी आले होते.यानंतर संस्थेचे संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृदुला कर्णी यांनी केले.
यानंतरचा कार्यक्रम शुभार्थींच्या नृत्याविष्काराचा होता. नृत्यामध्ये रेखा आचार्य, प्रज्ञा जोशी नारायण जोगळेकर, उषा शर्मा, शीला वाघोलीकर,मंगला तिकोने,विजय देशपांडे, श्री. पारेख, कर्नल प्रमोद चंद्रात्रेय,धीमंत देसाई,श्रीराम भिडे,पारिजात आपटे,मंजिरी आपटे, या शुभार्थी व शुभंकरांनी सहभाग घेतला.सुरुवातीला त्यांचे शिक्षक हृषीकेश पवार यांनी नृत्योपचाराची पार्श्वभूमी सांगितली.त्यानंतर नृत्यास सुरुवात झाली.’बार बार देखो हजार बार देखो’ ‘इना मीना डिका’ या उडत्या चालीच्या गाण्यांवर नृत्याविष्कार झाला. श्रोत्यांनीही ठेका धरला.यानंतर ‘तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालंना’ हे गाणे सादर केले.या गाण्याला वन्समोअर मिळाला.
यानंतर कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी डॉक्टर चारुलता सांखला यांचे शोभना तीर्थळी आणि रामचंद्र करमरकर यांच्यासह मंचावर आगमन झाले. शरच्चंद्र पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचा सत्कार केला.मृदुला कर्णी यांनी डॉक्टरांची ओळख करून दिली.
मंडळ दरवर्षी या कार्यक्रमात स्मरणिका प्रकाशित करते.डॉक्टर चारुलता सांखला यांच्या हस्ते टाळ्यांच्या गजरात स्मरणिकेचे प्रकाशन झाले.याचवेळी वेबसाईटवरही अतुल ठाकूर यांनी स्मरणिका प्रकाशित केली.
वक्त्यांच्या व्याख्यानासाठी सर्वच उत्सुक होते.डॉक्टर सांखला यांनी सोशल मिडीयावर फिरत असलेल्या एका व्हिडिओमुळे ‘Apomorphine मुळे पार्किन्सन्स बरा होतो ‘हा गैरसमज निर्माण झाला आहे, तो प्रथम दूर.केला.असे व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका असे त्यांनी सुचविले. यानंतर डीबीएस सर्जरीबाबतही ती सर्वांनाच उपयोगी नाही, त्याबाबतही न्यूरॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा असे प्रतिपादन केले. विविध औषधे, ते घेण्याच्या पद्धती,त्यांचे दुष्परिणाम,नियोजन याबाबत विस्ताराने चर्चा केली.भारतात आलेल्या आणि येऊ घातलेल्या नविन उपचारांविषयीही माहिती सांगितली.
विषय जिव्हाळ्याचा असल्याने प्रश्नांची सरबत्ती झाली.हळूहळू वैयक्तिक प्रश्न सुरु झाले. परंतु वक्त्यांनी अजिबात न कंटाळता सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.या उपयुक्त व्याख्यानाची लिंक पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या www.parkinsonsmitra.org या वेबसाईटवर दिलेली आहे ती सर्वांनी जरूर पहावी.
यानंतर वसू देसाई यांनी काही निवेदने सांगून आभार प्रदर्शनाचे काम केले.
डॉ. सांखला या मुंबईहून स्वत: गाडी ड्राईव्ह करत आलेल्या होत्या. पुन्हा त्यांना लगेच मुंबईला परत जायचे होते तरीही त्यांनी जाताना शुभार्थींच्या कलाकृती पाहून त्यांचे कौतुक केले.
दरवर्षी जाताना वाहन मिळत नाही म्हणून अनेक लोक लवकर उठतात किंवा यायचे टाळतात.यावर्षी कार्यक्रम संपल्यावर पाऊस पडत होता त्यामुळे वाहने मिळणे अधिकच कठीण झाले होते.परंतु विद्यार्थी सहाय्यक समितीचे गिरीश कुलकर्णी आणि वैभव शिरसाट यांनी शेवटपर्यंत थांबून सर्वाना रिक्षा आणून द्यायचे काम केले.
सर्व कार्यक्रमाचे सविस्तर वृत्त पत्रकार अमोल आगवेकर यांनी Bytes of India वर ईशस्तवन आणि नृत्याच्या व्हिडिओसह दिले.