दिनांक १९ नोव्हेंबर रोजी आश्विनी हॉटेल येथे पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली होती.महेंद्र शेंडे आणि मानसी शेंडे यांचा विठ्ठलाची गाणी हा कार्यक्रम होता. नेहमीच्या प्रथेप्रमाणे प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली.श्री.रामचंद्र करमरकर यांनी स्वागत, प्रास्ताविक व कार्यक्रमातील सहभागींची ओळख करून दिली.
श्री.महेंद्र शेंडे बँकेतून मोठ्या पदावरून निवृत्त.अनेक सामजिक संस्थामध्ये काम.विशेषत: वनवासी कल्याण आश्रम संस्थेत अनेक वर्षे काम.गाण्याची आवड.एम.एस.इ.बी.तून अधिकारी पदावरून स्वेच्छया निवृत्ती घेतलेल्या,आणि गांधर्व महाविद्यालायातुन् प्रथम वर्गात विशारद झालेल्या पत्नी मानसी शेंडे यांच्या उत्तम साथीमुळे विठ्ठलाची गाणी हा कार्यक्रम सुरु केला. कार्यक्रमात त्यांच्या साथीला, संवादिनीवर ८० वर्षाचे श्री.भूतकर आणि तबल्यावर सनतकुमार राजगुरू होते.
वारकरी पद्धतीने भजन असल्याने पंचपदीने भजनास सुरुवात झाली. त्यांनतर सर्वाना परिचित अमृताहुनी गोड,मूर्त रूप जेथे,समाधी साधन,झाला महार पंढरीनाथ अशी लता मंगेशकर, आशा भोसले,सुमन कल्याणपूर,भीमसेन जोशी,माणिक वर्मा,सुधीर फडके वगेरेंची गाजलेली भजने म्हटली याशिवाय काही अपरिचित भारुड,पोवाडा अशा ढंगाची गाणीही म्हटली.रुक्मिणी रुसली, कोपर्यात बसली या भारुडात व इतर काही गाण्यात त्यांनी प्रेक्षकानही सहभागी करून घेतले.
मध्यंतरामध्ये चहापान,सहलीविषयी निवेदन आणि रमेश फडणीस,अनिल कुलकर्णी,गोपाळ तीर्थळी,सुरेश शिधये या,शुभार्थिंचे आणि अंजली व केशव महाजन यांची शुभंकर उमा खिलारे यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.अनिल कुलकर्णी यांनी वाढदिवसानिमित्त चॉकलेट दिली.श्री काशीकर यांनी बाकरवडी आणली होती.यानंतर अंजली महाजन यांनी रंगतरंग आणि विविध दिवाळी अंकात लेखन केले आहे.त्यांचे कौतुक करण्यात आले.त्यांचे पती केशव महाजन यांनीही पत्नीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.त्यांना उभे राहून बोलण कठीण होत होत.ते इतके हलत होते कि एका बाजूने तीर्थळी आणि एका बाजूने पटवर्धन यांनी त्यांना घट्ट धरून ठेवले होते. अशा अवस्थेतही त्यांना जे काही सांगायचे होते ते त्यांनी पूर्ण केले.त्यांची ही कृती सर्वांच्याच मनाला स्पर्शून गेली.
मध्यंतरानंतर पुन्हा काही लोकप्रिय भजने आणि शेवटी नामदेव विठ्ठलाला भोजन देतात या प्रसंगावर एक नवीनच भैरवी झाली.’येई हो विठ्ठले माझे माउली’ या आरतीत सर्वानीच सहभाग घेतला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.