ऑनलाईन डान्स क्लासमध्ये आम्ही सर्व हृषिकेशची वाट पाहत होतो.मुंबईहून तो येत होता.त्यामुळे १५ मिनिटे वेळ होईल असा मेसेज आला.कॅमेरा ओंन असणारे सर्व स्क्रीनवर दिसत होते.सरोजिनी कुर्तकोटी या कुर्तकोटीना सांगत होत्या.मी आत चाललेय अजिबात उठू नका. ज्याना पडण्याची समस्या आहे त्या सर्वानच ही काळजी असते आणि ५ मिनिटातच कुर्तकोटी उठताना दिसले.माझ्याच काळजाचा ठोका चुकला आता हे पडतील का? इतक्यात सरोजिनी ताई आल्याच.हे दृश्य पार्किन्सन्स पेशंट असणाऱ्या घराघरातील आहे.शुभंकर शुभार्थीला पडण्यापासून वाचविण्यासाठी आटापिटा करत असतो आणि आणि बर्याच ठिकाणी शुभार्थी शुभंकराचे कधी लक्ष नसते याकडे लक्ष ठेऊन असतो/असते.आमच्या ‘भेटू आनंदे’ या ऑनलाईन कार्यक्रमात शुभंकरांच्या शेअरिंगचा कार्यक्रम होता.त्यावेळी अनेकानी याबाबत आपल्या भावना बोलून दाखवल्या.वसू देसाई तर म्हणाली,हे इतक्यांदा पडलेत मला एकदा ह्यांचे टाके मोजायचे आहेत.
मंडळाचे संस्थापक मधुसूदन शेंडेही अनेकदा पडत टाके घालून घेत आणि सभेला हजर राहत.मनीषा लिमये यांचे पती त्यांना पडताना दिसत असतात. त्या ओरडतात अहो पडाल आणि ते पडले की म्हणतात तू ओरडल्याने मी पडलो.रमेश रेवणकरही असेच अनेकदा पडले आहेत.एकदा तर ते खुर्चीवर स्टूल ठेऊन वरून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत होते.एका गप्पामध्ये मी रेवणकरांच्याविषयी लिहिले होते त्यांच्या पडण्यामुळे झालेल्या समस्येतू बाहेर यायला त्यांना५/६ महिने लागले.मंडळाचे कार्यकारिणी सदस्य अनिल कुलकर्णी हे पडल्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया करावी लागली.त्यातून एकामागोमाग एक समस्या निर्माण होत गेल्या.त्यातून ते बाहेर आलेच नाहीत.मला येथे घाबरवायचे नाही तर ही समस्या शुभार्थीनी गांभीर्याने घ्यावी आणि शुभंकराला त्यासाठी साथ द्यावी हे सुचवायचे आहे.
कधीकधी जपून असतानाही अपघाताने व्यक्ती पडते.त्याला इलाज नसतो पण आपल्या नाहक हट्टापायी असे होऊ न देणे आपल्या हातात असते. पार्किन्सन्स बरोबर रक्तदाब,मधुमेह असे आजार असल्यास समस्या आणखीनच वाढते.आमच्याकडेही लक्ष चुकवून कोणी बरोबर नसताना चालायला पाहणे आणि पडणे हे अनेकदा झालेले आहे.प्रत्येकवेळी थोडक्यात निभावले.पण नेहमीच असे होईल असे नाही.jजखमा होणे,हाड मोडणे प्लास्टर घालावे लागणे.शस्त्रक्रिया अशा अनेक बाबींची शक्यता निर्माण होते.वृद्धत्वात तोल जाण्याचा आणि पडण्याचा धोका असतोच पार्किन्सन्समध्ये तो अधिक वाढतो.ताठरता,मंद हालचाली,पोश्चरची समस्या अशी अनेक कारणे यामागे असतात.मला या कारणांच्या आणि उपायांच्या अधिक खोलात जायचे नाही.शेखर बर्वे यांच्या ‘पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत’ या मंडळाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात याविषयी काय खबरदारी घ्यावयाची याची उपयुक्त माहिती आहे.मला येथे शुभार्थीसाठी कळकळीची विनंती आहे,पार्किन्सन्स पूर्ण बारा करणे आपल्या हातात नाही,त्याची वाढ रोखणे आपल्या हातात नाही परंतु पडण्यापासून रोखणे बर्यापैकी आपल्या हातात आहे.त्यामुळे आपल्या नियंत्रणात असणाऱ्या बाबी तरी आपण सांभाळूयात.