वयाने वाढताना “प्रौढत्वी निज शैशवास जपणे” हा बाणा सांभाळावाच लागतो कारण माझा पहिला गुरु “अब्बा अरे असं नाही करायचं ,तुला काही येत नाही “असं म्हणत मला काहीतरी शिकवत असतो तर बाबा म्हणणारी मुलगी किंवा अहो बाबा म्हणणारी सून( दोन्ही योगगुरू ) सूर्यनमस्काराची ,व्यायामाची आठवण करून देतात तर घरातली सुपर पॉवर वुमन तोंड धुण्याची, औषधाची, लिंबू पाण्याची,गोड न खाण्याची विद्रोही स्वरांमध्ये स्मरण करून देते .
रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर चालायला शिकवणारी शुश्रुषा गुरु, रस्त्यात तुटलेली चप्पल शिकताना कशी वापरावी ते शिकवणारा चर्मकार बंधू, माझे लिखाण सुधारणारे मुद्रितशोधक, या वाढत्या वयात आळशी होणाऱ्या मेंदूला तरतरीत ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शिकवणारी, इतकेच नव्हे तर हॉटेलात नवीन पदार्थांची ऑर्डर देणे,तेआलेले पदार्थ कसे खाणे, सहलीसाठी परदेशी गेल्यानंतर तिथल्या वातावरणाशी अनुकूल कसे व्हायचे हे शिकवणारी आमची मुले जावई नातवंडे हे ही आमचे गुरुच!
स्वतःच्या हाताने खायला शिकवण्या पासून ते लिहिणे ,वाचणे ,उड्या मारणे, कपडे घालणे, पोहणे ,वाहने चालवणे ,दाढी करणे,स्मार्ट फोन वापरणे इतकेच नव्हे तर आयुष्यात इतरही गोष्टी शिकवणारे गुरू पदोपदी भेटत असतात !काही गुरूंचा एक अविर्भाव (अटिट्यूड) असतो. त्याच्या सकट आपल्याला काहीतरी शिकवत असल्याचा त्यांना गर्व ही असतो आणि हे मी तुला शिकवले आहे याची ते वारंवार आपल्याला आठवण करून देतात तर याउलट कसलाही आविर्भाव न ठेवता पण सहजपणे अनेक गोष्टी शिकवणारी गुरु मंडळी आपल्याला भेटत असतात. कधी त्यांच्याकडे नुसतं बघून तर कधी त्यांच्या कथा ऐकून कधी त्यांच्या बद्दल वाचून त्यांच्याकडून गुरुत्वाचे संस्कार आपण आपल्यावर करून घेत असतो असे खूप गुरू माझ्याही आयुष्यात आले आणि अजूनही येत आहेत.
त्यात राजकारणातल्या .व्यवसायातल्या सामान्य माणसापासून ते समाजातल्या उच्च स्तरांमध्ये किंबहुना सर्वच क्षेत्रांमध्ये स्वतःला सिद्ध करणाऱ्या अनेक गुरूंचा मी शिष्य आहे .काहीजण मला शिष्य मानत नसतील पण ते माझे गुरू आहेत आणि माझ्या आयुष्यातली ही जडणघडण अनाहूतपणे करणाऱ्या आणि मुद्दामही करून घेणाऱ्या या सर्व गुरूंना माझा शिरसाष्टांग नमस्कार! माझे आत्तापर्यंतचे आयुष्य त्यांच्यामुळेच सुखाचे आणि सोपे झाले आहे