मला माझ्या नातवाने संगणकावरील “रोड रॅश” ही मोटारसायकल शर्यत शिकवली. हा खेळ खेळत असताना स्वाभाविकपणेच मी त्या खेळातील एका पादचाऱ्याला धडकलो आणि पडलो. तो खेळातला पादचारी जखमी झाल्यामुळे मला वाईट वाटले व मी थांबलो. पण नातू म्हणाला “आजोबा, थांबायचे नाही! आपण पळून जायचे! तो आपोआप उठेल आणि जाईल घरी ” त्याने मला पुढची कमांड दाखवून पुन्हा मोटर सायकल चालवायला लावली. मी पुन्हा धडकलो आणि पडलो. आता मला स्वतःलाच ( कॉम्प्युटर मधल्या) भरपूर लागले होते आणि मी डोकेही धरले होते. पुन्हा मी थांबल्यावर नातू म्हणाला ,”काही होत नाही. परत मागे या. ही गाडी घ्या आणि स्टार्ट व्हा. खेळ पुढे सुरू ठेवा. अशी आपल्याला किंवा दुसऱ्याला लागले याची पर्वा करायची नाही.” मी सहज विचार केला ,हीच प्रवृत्ती प्रत्यक्षामधल्या वाहनचालकांमध्ये येते आहे आणि म्हणून तर अपघातांचे प्रमाण वाढत नसेल?? या कृत्रिम खेळांमधून सुद्धा नियमांचे पालन करण्याचे संस्कार …दुसऱ्याच्या जिवाची काळजी करण्याचे संस्कार टाकायला हवे ! किंबहुना कंपन्यांनी त्याच प्रमाणे संगणकीय खेळांचे प्रोग्राम्स तयार केले पाहिजेत आणि नव्या पिढीतल्या मुलांवर नव्या खेळांबरोबरच नवीन संस्कार घडवू शकतील !! कोरोना लॉक डाऊनमुळे घरात बसलेल्या मुलांच्या हातातले मोबाईल,व्हिडिओ काय दाखवतात ते पालकांनी बघितले पाहिजेच.
लेखक : किरण सरदेशपांडे