रक्षाबंधन! एक पवित्र दिवस! भावाबहिणीच्या नात्याची आठवण …तीही हल्ली वर्षातून दोनदाच होते. एक भाऊबीज आणि दुसरी राखीपौर्णिमा!!
राखी मागची भावना खूप पवित्र असते पण हल्ली मात्र राखी मुळे (सावंत किंवा गुलजार यांची नाही) गमतीजमती घडतात. नुकत्याच बघितलेल्या एका व्हिडिओत मास्क न घालता आलेल्या भावाला राखी ऐवजी नक्षीदार मास्क बांधणारी बहीण पाहायला मिळाली .
रस्त्यारस्त्यांवर लागणाऱ्या स्टॉल मधून लक्ष्य वेधून घेणाऱ्या रंगीबिरंगी राख्या , राखी पौर्णिमा आली याची आठवणही करून देतात .मग “भाऊ “”भैया” लोकांच्या दर्जाप्रमाणे, आवडीप्रमाणे राख्या खरेदी केल्या जातात. हा दर्जा बहुधा अपेक्षित ओवाळणी वरच ठरत असतो.
कॉलेजात तर आमच्या(म्हणजे सगळ्यांच्याच ) बहिणी खूप मज्जा करत असतात.” नकोशा नायकांना” सार्वत्रिक राख्या बांधून त्यांचा “मामा” करतात तर आपला असा “काटा” काढला जाऊ नये म्हणून काही “वीर पुंगव” त्यादिवशी कॉलेजात न येता अदृश्यच होतात. सुंदर सुंदर राख्या हातावर बांधून जेव्हा हे दिव्य भाऊ हिंडतात तेव्हा तर त्यांची कीव करावीशी वाटते. आपल्या बहिणींची टिंगल होत असली तर तिथे धावून जाण्याचे धैर्य काही हे धुरंधर दाखवत नाहीत. मग राखी बांधायची कशाला?? अर्थात हे धैर्य दाखवायला सामर्थ्य हवे! रक्षाबंधन म्हणजे रक्षणासाठी स्वीकारलेली बांधिलकी … प्रेमाचा करार! शिवाय भाऊरायांसाठी त्यात लपलेला अर्थ असा की माझे रक्षण करण्यासाठी प्रथम तू सक्षम व बलदंड व्हावेस. तुझ्या या पूर्ण वचनासाठी पूर्ण चंद्राला साक्षी ठेवूनच हे रक्षाबंधन ! आणि भाऊ नसेल तर चंद्रालाच भाऊ मानणाऱ्या बहिणीही अनेक आहेत. पूर्वी हातावर आठ दहा राखी बांधायचे! मला इतक्या बहिणी आहेत या अभिमानाने राख्यांनी भरून गेलेले हात मिरवत फिरायचे! आता बहीण शोधावी लागते. अनेक घरांमध्ये एक एकच अपत्य यामुळे भावाची किंवा बहिणीची उणीव जाणवते.एका राखी पौर्णिमेला एका रिक्षावाल्याने रिक्षातल्या पॅसेंजर ताईला आपल्याला राखी बांधायची विनंती केली होती.राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला या एकल मुलांची मनस्थिती कशी होत असेल ते आपण समजू शकतो. ही उणीव मानलेल्या भावा बहिणींच्या नात्यामधून भरून काढली जाते .आजही लहानपणचे बहीण भावाचे मानीव नाते चाळीस पन्नास वर्षे झाली तरी निगुतीने सांभाळणारी जपणारे बहीण भाऊ खूप दिसतात. ते सख्खे बहीण भाऊ नाहीत हे सांगूनही पटत नाही. राखी पौर्णिमेच्या दिवशी भावाच्या वाटेकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसलेल्या बहिणीचे डोळे पाझरत असतात तर बहिणीकडे न जाता येऊ शकणारा भाऊ तिची राखी पोस्टाने, कुरियरने नक्की येईल म्हणून दाराच्या घंटी कडे कान लावून बसलेला असतो .आपण पाठवलेली एक राखी सीमेवरच्या जवानालाही केवढी तरी मोठी शक्ती jदेते. माझे कोणी तरी आहे ही लाखमोलाची भावना त्यां=ना यातून मिळते. ज्यांना मोठी बहीण, ताई लाभते ते तर खूपच नशीबवान ! सगळे लहानपण तिच्या मागेमागेच जाते. लहानपणी त्या छोट्याशा मनगटावर ताईने राखी बांधणे ही मर्मबंधातली ठेवच असते
आज जग अगदी वेगवान झाले. इथली नीतिमूल्यं बदलली आहेत सख्खी नातीही ठोकरली जात आहेत अशावेळी भारतीयांनी हे संस्कार जपले पाहिजेत. रक्षाबंधनाच्या या प्रतिका मागे खरोखरची शक्ती उभी राहिली पाहिजे यासाठी आमच्या भावांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि बहिणींनाही सामर्थ्य देऊ केले पाहिजे तरच रक्षाबंधनाला अर्थ राहील.
किरण सरदेशपांडे