सकाळी साडे आठलाच कराडचे शुभार्थी सुर्यकांत पाटील यांचा फोन आला.पुण्यात आलोय मी येऊ का तुमच्याकडे असे ते विचारत होते.ते यवतमाळहून प्रवास करून आले होते.मी लगेच होकार दिला.दीड दोन वर्षापूर्वी त्यांचा फोनवर संपर्क झाला होता.त्यांच्याशी बोलून मी खूपच प्रभावित झाले होते.ते पुण्याला येणार होते पण ते घडले नाही.कोणीही प्रभावित व्हावे असाच त्यांचा पार्किन्सनसह जीवन प्रवास आहे.१९९५ मध्ये त्यांच्या पार्किन्सनचे निदान झाले त्यावेळी ते ३४ वर्षाचे होते.म्हणजे त्याना पीडी होउन २७ वर्षे झालेली आहेत.याबाबत ते सर्व शुभार्थीना बरेच सिनियर आहेत.
त्यांचा २७ वर्षाचा पार्किन्सन लक्षात घेता त्यांच्याबरोबर कोणी तरी असेल असे मला वाटत होत.थेट रिक्षा किंवा उबरनी आमच्याकडे येतील असे वाटले होते पण ते मार्केटयार्ड पर्यंत बसने आले होते.तेथून रिक्षानी.रिक्षा जवळच सोडून दिली.मी फोनवरून त्याना पत्ता सांगत होते.ते पुढच्या गल्लीत गेले.१५/२० मिनिटे तरी फिरत राहिले शेवटी पोचले.एकटेच होते.हातात भली मोठ्ठी Handbag आणि एक पिशवी होती.इतके होऊनही दमल्याची कोणतीही खुण नव्हती.आल्याआल्या त्यांनी खणखणीत आवाजात बोलायला सुरुवात केली.पार्किन्सनने त्यांच्या बोलण्यावर परिणाम झालेला नव्हता.ते भरभरून बोलत होते.
कोल्हापूरला पीडीचे निदान झाल्यावर खात्री न वाटल्याने सांगली मुंबई,पुणे अशा विविध ठिकाणी न्यूरॉलॉजिस्टना दाखवले निदान पक्के झाले.पुण्याला त्यावेळी हर्डीकर हॉस्पिटलमध्ये त्यांना शरच्चंद्र पटवर्धन यांनी ठेवलेले पार्किन्सन रुग्ण मित्रमंडळ ग्रुपचे पत्रक मिळाले.ते पटवर्धन याना भेटले.त्यावेळी पटवर्धन यांच्या घरी सभा होत त्यानाही ते हजर होते.ही साधारण २००४ दरम्यानची गोष्ट आहे.मंडळाच्या इतिहासातील निसटलेला दुवा सापडल्याचा आनंद झाला.पटवर्धन याना एखादी व्यक्ती भेटली की ती Positive होऊन जाते.त्यांचा पार्किन्सन्ससह आनंदी राहण्याचा कानमंत्र पाटील यांनी पुरेपूर आत्मसात केला.पटवर्धन याना आम्ही फोन केला. त्यांनाही इतकी वर्षे पार्किन्सन असून ते एकटे प्रवास करतात याचे कौतुक वाटले. पाटील याना न्यूरॉलॉजिस्टनीही Be Positive असा सल्ला दिला होता.त्यांनी तो दिलेल्या गोळ्या नियमित घ्याव्या तसाच आचरणात आणला.हेच त्यांचे पीडिला थोपवण्याचे हत्यार असावे का की त्यांच्या निष्काम कामाचा ध्यास? काही असो पण त्यांचा वावर थक्क करणारा होता.
बीएस्सी अग्रीकल्चर करून ते शेतकी खात्यात नोकरीला लागले होते. खेड्यापाड्यात फिल्ड वर्कसाठी जावे लागे ते काम त्यांनी निवृत्तीपर्यंत उत्तम केले आणि आता निवृत्तीनंतरही करत आहेत.
ते बरेच काही सांगत होते. त्यांचे बोलणे थांबवून मी त्याना दडपे पोहे आणि चहा दिला.शुभार्थींना असे पदार्थ खाणे तसे कठिण जाते त्यामुळे त्यांना ते खाताना त्रास तर होणार नाही ना अशी भिती मनात होती.त्यांनी अजिबात न सांडता ते खाल्ले.चहाही सहज पिता आला. मला थोडे बरे वाटले.बोलताना त्यांच्या डोक्यात,मनात,हालचालीत जराही पार्किन्सन नव्हता.मी मात्र त्यांचे पार्किन्सन शुभार्थी म्हणून निरीक्षण,विचार करत होते.याना पीडी आहे की नाही अशीही शंका मला आली.तितक्यात आता माझ्या डोसची वेळ झाली म्हणून त्यांनी गोळ्या काढल्या. Amentrel , अर्धी Paciten असा डोस होता.तेवढ्यापुरतेच पिडीने अस्तित्व दाखवले आणि पाटील पुन्हा पूर्वपदावर.त्याना दिवसातून तीनदा गोळ्या घ्याव्या लागत होत्या.
एरवी कोणी शुभंकर, शुभार्थी आले की पार्किन्सनवर चर्चा चालते.पण हे त्याबाबत अवाक्षरही बोलत नव्हते.त्यांचा मूड पाहता मीही पार्किन्सनचा विषय काढला नाही.
नोकरीत असताना त्यांनी विजेशिवाय शेतीला पाणी पुरवणारा परंपरा आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालणारा प्रकल्प उभा केला होता,आता निवृत्त झाले तरी गावोगावी जाऊन ते पाठपुरावा करत होते.त्यांच्या कामाबाबतचे बरेच साहित्य, वर्तमान पत्रातील कात्रणे त्यांनी आणली होती. कराड, किर्लोस्करवाडी हा त्यांचा कामाचा एरिया पाहता मी मृदुला कर्णीला फोन केला तीही त्या भागात बरेच वर्षे होती.ती लगेच आली ही.प्रभावित झाली.तिनी त्यांच्या माहितीच्या मजकुराची झेरॉक्स करून आणले.आता त्यांच्या कामावर ध्यासावर ती स्मरणिकेत लिहिणार आहे आणि भेटू आनंदे मध्ये त्याना सर्वाना भेटवायला हवे असे आम्हाला वाटले.त्यामुळे मी त्यावर अधिक लिहित नाही.त्यांचा पार्किन्सन्स. त्याला रोखण्यात ते कसे यशस्वी झाले हे सर्व त्यांना भेटु आनंदेमध्ये विचारता येईल.
ते जायला निघाले त्याना रिक्षा आणून देऊ असे सांगितले तर ते अजिबात ऐकत नव्हते.मृदुलाने जबरदस्तीने त्यांची Handbag रीक्षापर्यंत नेली.ते स्वारगेटला जाऊन कराडची बस घेणार होते.ते गेले तरी आम्ही मात्र आवक होउन त्यांच्या बद्दलच बोलत राहिलो होतो.
या लेखाद्वारे लहान वयात पीडी झालेल्यांना आपण नोकरीचा कार्यकाल पुर्ण करू शकतो असा दिलासा मिळेल. आणि सर्वच शुभार्थींना पार्किन्सन्सची ऐशीतैशी म्हणणारे Role model मिळेल.