Friday, October 4, 2024
Homeक्षण भारावलेलेक्षण भारावलेले - २० - डॉ. शोभना तीर्थळी

क्षण भारावलेले – २० – डॉ. शोभना तीर्थळी

शुभार्थी अरुण सुर्वे यांचा भिमाशंकर ट्रेकचा व्हिडीओ आला आणि तो पाहून मी थक्क झाले.अत्यंत खडतर असा हा ट्रेक होता.चढणे आणि उतरणे यासाठी अंदाजे ७ ते ९ तास लागले. घनदाट जंगल,धुके, पाणी, शेवाळ,काही ठिकाणी रॅपालिंग सारखे खडकाला धरून चालणे हे सर्व लागले.भोवतालचा निसर्ग,कोसळणारे धबधबे भान हरवून टाकत होते.त्यामुळे ही खडतरता जाणवलीच नसावी.त्यांच्या बरोबर असणाऱ्या,त्यांना सांभाळून नेणाऱ्या मित्रांचेही मला कौतुक वाटले.ही सर्व मंडळी रोज पहाटे.हत्ती डोंगरावरील पाचवड पठारावर फिरायला जातात.त्यांचा हत्ती पाचवड नावाचा ग्रुप आहे.हत्ती म्हणजे हत्तीचे आकाराचा डोंगर आणि पाचवड म्हणजे पाच वडांची एकत्र आलेली झाडे असलेले डोंगरावरील टेबल लँड.येथील मोकळ्या हवेत ही मंडळी व्यायाम करतात,निसर्गाचा आणि मित्रांच्या सहवासाचा आनंद लुटतात.चढायला एक तास लागतो उतरायला थोडा कमी वेळ लागतो.असा रियाज असल्याने त्यांना खडतर ट्रेक करणे शक्य झाले.

                   अरुण सुर्वे याना पार्किन्सन्सचे शिक्का मोर्तब ४३ व्या वर्षी झाले. १५ वर्षे तरी पीडी त्यांचा सोबती आहे. पण त्यापूर्वीच ७/८ वर्षे लक्षणे होती.पीडी असावा असे कोणाच्या लक्षात आले नाही.पुणे महानगरपालिकेत निदेशक टेक्निकल तांत्रिक शिक्षण या पदावरून नुकतेच ते निवृत्त झाले.या निरोप समारंभाला त्यांनी मला आवर्जून बोलावले होते.त्यावेळी पार्किन्सन्स बरोबरची नाही तर लहानपणापासूनची  जगण्यातील लढाई समजली.त्यांच्यातला फायटर त्याना अशी अचाट कामे करण्याचे बळ देतो हे लक्षात आले.          

              त्यांचे मुळगाव आणि शिक्षण भोर  येथे. दहावी पास झाल्यावर गावातच भाजीपाला व्यवसाय सुरु केला.७९ साली नोकरीसाठी पुण्यात आले. आणि तेथेच रमले. ५१२ आर्मी बेस वर्कशॉप खडकी येथे चार वर्षे नोकरी केली.नंतर पुणे महानगरपालिकेत निदेशक टेक्निकल तांत्रिक शिक्षण या पदावर १९९२ पासून कार्यरत होते.बोलण्यात थोडा दोष होता.प्रयत्नपूर्वक त्यावर मात करून विद्यार्थीप्रिय शिक्षक झाले.आईवडिलांची खूप सेवा केली.विवाहानंतर पत्नीला डी.एड. केले कार्पोरेशनच्या शाळेत नोकरी लावली.

              निरोप समारंभात त्यांच्यातले अनेक गुण कळले.समारंभाला जुने सहकारीही आवर्जून आले होते.मुळात पार्किन्सन्स असताना सर्व कार्यकाळ पूर्ण करणे हेच मोट्ठे आव्हान होते आणि ते त्यांनी स्वीकारले.एवढेच नाही तर शेवटच्या वर्षात शिक्षणाधिकाऱ्यांनी शालाप्रमुखपद दिले.शिक्षक म्हणून काम करतानाच हे करायचे होते.धडधाकट माणसासाठीही ते कठीण होते. विना मोबदला असलेले ते  पद यशस्वीरित्या पार पाडले.सहकारी मित्रांची साथ मिळाली.'पाणी तेरा रंग कैसा जिसमे मेलाये वैसा'.असे एका मित्रांनी त्यांच्याबद्दल सांगितले.मनमिळाऊ स्वभाव, संघर्षा ऐवजी समन्वयाने प्रश्न सोडविणे,अजिबात न चिडता लोकांकडून गोडीगुलाबीने कामे करू घेणे,कितीही मोठ्ठी अडचण आली तरी त्यातून मार्ग काढून काम तडीस नेणे,शिक्षणाधिकारी,कार्पोरेशांचे अधिकारी,सहकारी,विद्यार्थी या प्रत्येकाकडे कसे बोलायचे याचे कसब.असे अनेक गुण प्रत्येकजण सांगत होते.

               शिक्षक म्हणून ही गोड बोलण्याने,प्रेमाने समजावून सांगण्याने विद्यार्थी संख्या वाढवली,तांत्रिक विषय रंजक करून सांगण्याचे कसब विद्यार्थ्याना विषयची गोडी वाढवण्यास शिक्षणाचा दर्जा वाढविण्यास उपयुक्त ठरले.विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे,त्यांचे प्रश्न सोडविणे हेही केले.विध्यार्थी संख्या वाढवली.नोकरीच्या कार्यकाळात कायम १०० टक्के एसएससी बोर्डाचा निकाल लावला. हडपसरची बंद झालेली  नावाजलेली सेमीइंग्लिश महात्मा फुले विद्यानिकेतन शाळा नव्या दिमाखात चालू केली.तेथील मुलांची स्वतःची मुले असल्याप्रमाणे जबाबदारी स्वीकारून काळजी घेतली.या सर्वाचा परिणाम म्हणून पुणे महानगरपालिकेतर्फे  दोन वेळा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.

           पार्किन्सन्स झाला म्हणून पाट्या टाकत कसेही काम न करता मनापासून काम केले.पार्किन्सन्समुळे अपंग भत्ता मिळतो तो घेऊन त्याचा उपयोग समाजोपयोगी कामा साठी केला. विशेष म्हणजे याचा गाजावाजा केला नाही.समारोपाच्या भाषणात सगळे छानच बोलले जाते पण बोलणार्यांची देहबोली, डोळ्यातले अश्रू आणि प्रत्येकाच्या बोलण्यातील समान सूत्र यामुळे ते खोटे वाटले नाही. मी आणि अंजली महाजन कार्यक्रमाला गेलो होतो.आम्हीही त्यांच्याविषयी बोललो.त्यांच्याबद्दल ऐकून आम्हाला त्यांचा अभिमान वाटला.

          त्यांच्या पीडीचा विचार करता सकारात्मक विचार. पिडीचा अनकंडीशनल स्वीकार,नियमित व्यायाम यामुळे पिडीशीही जुळवून घेतले आहे.टूव्हीलरवर कात्रजहून गावातील शाळेत जातात.गावात आणि हायवेवरही फोर व्हीलर चालवतात.मंडळाच्या सहलीत सुर्वे असले की उत्साह असतो.त्याना उत्तम डान्स करता येतो आणि नाचायला आवडतेही.सहल वाढदिवस यांचे सुंदर व्हिडिओ करून ते ग्रुपवर टाकतात.पार्किन्सन्ससह आनंदाने जगूया हे मंडळाचे ब्रीद वाक्य ते प्रत्यक्षात जगतात.लहन वयात पीडी झाल्यावर हताश ,निराश झालेल्यांना सुर्वेंचे जगणे दिशादर्शक आहे.

       सुर्वे तुम्हाला सलाम.शाळेतून निवृत्त झालात आता पार्किन्सनस मित्रमंडळ मदतीसाठी तुमची वाट पाहतेय.तुम्ही याल याची खात्रीच आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क