गुरुवार दिनांक ९ जुन रोजी डॉक्टर अमित करकरे यांचे ‘आनंदाचा खिसा’ या विषयावर पार्किन्सन्स मित्रमंडळाने व्याख्यान आयोजित केले होते.सभेस ४७ शुभंकर, शुभार्थी उपस्थित होते. प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली. यानंतर जागतिक कीर्तीचे मुष्टियोद्धा महमद अली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.७४ वर्षाच्या अली यांना ४४ व्या वर्षी पार्किन्सन्स झाला.आपल्या उदाहरणाने त्यांनी या आजारासह चांगल जगता येतं. हे दाखवून दिलं.पार्किन्सन्सवरील संशोधनासाठी हजारो डॉलर खर्च केले.
यानंतर व्याख्यात्यांचे स्वागत व ओळख करून देण्यात आली.डॉक्टर करकरे हे सुरुवातीच्या काळापासून पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या परिवारातले आहेत.व्यवसायाने होमिओपॅथिक डॉक्टर असून उत्तम समुपदेशकही आहेत.इंग्लंडच्या British Institute of Homeopathy मधून फ्लॉवर रेमेडीचा कोर्स केला आहे तसेच न्युयॉर्कच्या अल्बर्ट एलीस इन्स्टिट्यूटचा REBT चा कोर्स त्यांनी केला आहे.या विषयावरच्या विविध स्तरातील लोकांसाठी ते कार्यशाळा घेतात.
यानंतर जून महिन्यात जन्म असणाऱ्या शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
‘आनंदाचा खिसा’ म्हणजेच विवेकनिष्ठ उपचार पद्धती (REBT) ही केवळ उपचार पद्धती नसून जीवनपद्धती आहे.तीच्याबद्दल माहिती नसूनही काही सभासद आधीपासूनच ती आचरणात आणताना दिसतात असे सुरुवातीसच डॉक्टर करकरे यांनी सांगितले.
प्रथम खरा आनंद म्हणजे काय हे त्यांनी सांगितले.’आनंदाचे डोही आनंद तरंग ‘ असा तो आपल्याबरोबर आजूबाजूलाही व्यापून राहणारा हवा. यानंतर आनंदाचा खिसा असं नाव का दिल हे त्यांनी स्पष्ट केल.खिसा हा जन्माला येताना नसतो. नंतर चिकटतो.आनंदाचा खिसा शिवून घ्यावा लागतो.तो फाटतो. गळका होतो.वापरावा तसा घट्ट होत जाणारी शिवण असण्यासाठी काय करायचं हे व्याख्यानातून त्यांनी सांगितलं.
प्रतिकूल परिस्थिती,दु:ख,वेदना असूनही आनंद शोधण म्हणजे.REBT ( रॅशनल इमोटिव्ह बिहेविअर थेरपी )
आनंद कमी करणाऱ्या गोष्टी कोणत्या हे यासाठी पाहावे लागेल.
“मी अविवेकाची काजळी| फेडूनी विवेकदीप उजळी | तैं योगिया पाहे दिवाळी |निरंतर ||” (ज्ञानेश्वरी ४:५४) या ज्ञानेश्वरीतील ओवीने त्यांनी विवेचनास सुरुवात केली.लीखित स्वरुपात उपदेश उपलब्ध असणारे ज्ञानेश्वर हे पहिले समुपदेशक असं आपल्याला वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.भीती,उदासीनता,नैराश् य,चिडचिड,अधीरता या सर्वासाठी अविवेकाची काजळी दूर करावी लागेल.
आनंदाच्या आड येणाऱ्या चार बाबी त्यांनी सांगितल्या.
१) अपेक्षा – अपेक्षेचा हट्ट होतो तेंव्हा तो अट्टाहास होतो.या अपेक्षा स्वत:कडून,दुसऱ्यांकडून आणि जगाकडून अशा तीन प्रकारच्या असतात.
२) सहनशक्तीचा अभाव – आपणच आपल्याला कुंपणे घालून घेतो. जमतं पण जमवायचं नाही असं होतं. यासाठी त्यांनी ७६ व्या वर्षी चित्रकला शिकायला सुरुवात करून,१०० व्या वर्षी चित्रांच प्रदर्शन भरवणाऱ्या स्त्रीचं उदाहरण सांगितलं.
३)महाभयंकरीकरण – कोणत्याही गोष्टीला महाभयंकर केल्यास त्यापासून आनंद दूर होतो.काही गोष्टी वाईट असू शकतात. पण मरण सोडल्यास महाभयंकर काहीच नसतं.येथे त्यांनी मधुसूदन शेंडे यांचं उदाहरण दिलं. डॉक्टर त्यांचे शेजारी असल्याने शेंडेना त्यांनी पीडीच्या अनेक अवस्थांत पाहिलं पण त्याचा कधी बाऊ करताना पाहिलं नाही.
४) कोणत्याही गोष्टीवर शिक्कामोर्तब करून मोकळ होणं – माणूस चुकीचा नसतो कृती चुकीची असू शकते. कोणतीही व्यक्ती १०० टक्के बरोबर किंवा १०० टक्के चूक नसते.अपूर्णतेचा स्वीकार केला,गुण दोष आहेत हे मान्य केलं की शिक्के मारणं कमी होतं.
या सर्वांवर विवेकानी मात करायची तर सर्व विना तक्रार,बिनशर्त वास्तव स्विकारणं गरजेचं.ज्या प्रश्नांची उत्तरे नाहीत,ती शोधण्यापेक्षा स्वीकार करणं महत्वाचं.स्वीकार म्हणजे शरणागती किंवा तडजोड नाही.तर पूर्णपणे स्वीकार.भल्या बुऱ्याचं संयुक्तिक आकलन केल्यास समोरच्या परिस्थितीत चांगलं दिसतं,घेता येतं.आनंदाचा खिसा घट्ट करता येतो.
डॉक्टरानी रोजच्या व्यवहारातील आणि पीडी पेशंटचीच उदाहरणे देत कठीण विषय रंजक व सोपा केला.श्रोत्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
यानंतर ज्ञान प्रबोधिनीच्या डॉक्टर वनिता पटवर्धन यांनी त्यांनी हाती घेतलेल्या संशोधन प्रकल्पाची माहिती सांगितली आणि सहभाग घेण्याची विनंती केली.’अवलंबून असलेल्या रुग्णांच्या घराचा अभ्यास’ असा त्यांचा सर्व साधारण अभ्यास विषय आहे.यासाठी कुटुंबियांकडून प्रश्नावली भरून घेतली जाईल. यातील माहिती गुप्त ठेवली जाईल असे सांगितले. अनेकांनी यासाठी नावे दिली.
चहापानानंतर प्रार्थनेने सभा समाप्त झाली.
– शोभना तीर्थळी