११ मे २०१७ रोजी अश्विनी हॉटेल येथे पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली होती.सूर्या जिमचे डॉक्टर अरुण दातार यांना शुभार्थिंच्या मागणीवरून पुन्हा पाचारण केले होते.
प्रार्थनेने सभा सुरु झाली.अजित कट्टी यांनी डॉक्टरांची ओळख करून दिली.नुकताच त्यांना क्रीडा महर्षी कै. बा. प्रे. झंवर क्रीडा जीवन गौरव पुरस्कार मिळाला त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.डॉक्टरांनी मागच्या वेळचे व्यायाम कितीजणांनी घरी केले आणि काय उपयोग झाला असे विचारले.तिघांनीच हात वर केले.व्यायामाचा फायदा काय होतो हे ते केल्याशिवाय कसे समजणार? असा निरुत्तर करणारा प्रश्न त्यांनी विचारला.येथे येणे लांब पडत असेल तर छोटे गट करून वेगवेगळ्या ठिकाणी आठवड्यातून एकदा व्यायाम शिकवण्याची त्यांनी तयारी दाखवली.
व्यायामाचे प्रात्यक्षिक दाखविण्यास टाळ्यांनी सुरुवात झाली.बोटे पसरून दोन्ही हाताची बोटे एकमेकांवर ठेऊन जोरात टाळ्या वाजविण्यास सांगितले. हळूहळू वेग वाढवत नेला. यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते,हातावरील प्रेशर पॉइंट दाबले जातात.यानंतर मागच्यावेळी दाखवलेले काही सोपे आणि विविध ठिकाणचे सांधे मोकळे करणारे व्यायाम करून घेतले.(स्मरणिका २०१७ मध्ये हे सर्व व्यायाम दिलेले आहेत.सर्वांनी आवर्जून पाहावे.) यानंतर’वेट लिफ्टिंग विदाउट वेट’ असे ज्याला डॉक्टरनी नाव दिले आहे ते व्यायाम करून घेतले.पुढे आणि मागे चालणे,९० अंशात वळणे अशा तऱ्हेचे व्यायाम ही घेतले.याचा उपयोग पीडी पेशंटना चालताना तोल जातो, त्यावर मात करण्यासाठी होईल..शेवटी व्यायामाचा राजा असे ज्याला म्हटले जाते त्या सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक,दिलीप कुलकर्णी,शैलजा कुलकर्णी आणि प्रतिभा पारखे यांनी डॉक्टरांच्या सूचनेनुसार केले.ज्यांना सूर्य नमस्काराच्या सर्व हालचाली जमत नाहीत त्यांनी काय करावे हे सांगितले.
यानंतर शुभंकर शुभार्थिंचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
अनेक शुभार्थिंनी आपल्याला येणाऱ्या अडचणी विचारल्या. डॉक्टरानी त्यांना उत्तरे दिली.
डॉक्टरानी आणलेल्या साहित्यातील,शून्यातून सूर्याकडे,भारतीय व्यायाम साधना ही पुस्तके आणि सूर्यनमस्काराची सीडी अनेकांनी विकत घेतली.