वर्षातून एकदा जाणारी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल शुभंकर शुभार्थींसाठी आनंदोत्सव असतो.शब्दांपेक्षा हा आनंद छायाचित्रातून (फोटोतून ) अधिक पोचेल असे वाटल्याने टप्प्याटप्प्याने तो आपल्यापर्यंत छायाचित्रातून पोचवत आहे.
यावर्षीची सहल १ नोव्हेंबरला पानशेत जवळील अभिरुची फार्म हाऊस येथे गेली होती.३१ शुभंकर, शुभार्थी सहभागी झाले.४५ वर्षापासून ९५ वर्षापर्यंतचे शुभार्थी सहभागी होते.सात शुभार्थी शुभंकराच्या सोबतीशिवाय एकटे आले होते हा यावेळच्या सहलीचा विशेष होता.सहल सकाळी साडे आठ वाजता हॉटेल अश्विनी पासून निघाली.सर्वजण अगदी वेळेत हजर होते.चिंचवडहून आलेल्या पाडळकर पती पत्नीना वेळ गाठण्यासाठी पहाटे ६.३० लाच घरातून निघावे लागले.सर्व मंडळी बसमध्ये स्थानापन्न झाल्यावर अंजलीने हजेरी घेतली. केशवरावांसाठी लवकर व्हीआरएस घ्यावी लागलेल्या अंजलीतील शिक्षिकेचे हे आवडते काम.सुरुवातीलाच ती हे काम करताना आजार विसरून सर्वांना शाळकरी मुले व्हायला लावते.सर्वाना ओरिगामी साठी कागद वाटण्यात आले.बसमध्येच sandwich आणि खोबऱ्याच्या वड्या देण्यात आल्या.शुभार्थी उमेश सलगर यांनी रात्री बारापर्यंत जागून खास स्वत: बनवलेले रव्याचे लाडू आणले होते.अंताक्षरी,गप्पा यात अभिरुची कधी आले समजलेच नाही.आल्या आल्या चहापान झाल्यावर उन्हे वाढण्याआधी ज्यांना शक्य आहे त्यांनी आजूबाजूचे निसर्ग दर्शन करायचे ठरले.सर्वजण निसर्ग पाहताना हरखून गेले होते.मोबाईलमध्ये आठवणी साठवून ठेवत होते.