माझी मायबोलीकर मैत्रीण( खर तर माझी लेकच) सई कोडोलीकर हिच्याशी फोनवर बोलताना मी म्हटल,’मला खूप लिहायचे असते. पण हल्ली लिहिणे झेपत नाही’.तिने सुचविले,तुम्ही तुम्हाला जे म्हणायच आहे ते रेकोर्ड करून Whats App वर पाठवा..मी लिहून पाठवीन.आणि मी तसे केल्यावर तिने लगेच टाईप करून पाठवले.सई मनापासून आभार…………
दीनानाथ हॉस्पिटलमधे पार्किन्सन्स मित्रमंडळाचा मेळावा होता. तो संपवून आम्ही बाहेर पडलो. रिक्षा स्टँडवरून रिक्षा घेणा-यांमधे आमचे पार्किन्सन्सचेच पेशंटस् बरेच होते. आम्ही रिक्षात बसलो. रिक्षावाला म्हणाला, ‘आज्जी, एक विचारलं तर राग नाही ना येणार?’ मी म्हणाले, ‘नाही, विचारा ना.’ म्हणे, ‘अहो, बाहेर पडलेल्या सगळ्या लोकांचे हात थरथरत होते, ही काय भानगड आहे, कसली सभा होती ही?’ त्याच्या चेह-यावरून एकूण माझ्या लक्षात आले, की हे बहुतेक सगळे दारू पिणारे लोक आहेत की काय असे त्याला वाटत होते. त्यावरून लगेचच माझ्यातली शिक्षिका बाहेर आली. मग मी पार्किन्सन्स हा आजार म्हणजे काय, हे पार्किन्सन्सचे पेशंटस् आहेत, सभा कशी होते, ही सगळी माहिती त्याला सांगितली.
पार्किन्सन्सच्या पेशंटसना समाजात बाहेर पडल्यावर वेळोवेळी अशाच प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे होते काय, की पेशंटसच्या मनात एक सामाजिक भयगंड निर्माण होतो. ते मग बाहेर पडायचेच बंद होतात. बोलण्यातही दोष निर्माण झालेला असतो, त्या बोलण्याच्या दोषामुळेदेखिल हा बहुतेक प्यायलेला माणूस आहे किंवा पिणारा माणूस आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या लक्षणांमुळे लोकांच्या मनात जे गैरसमज निर्माण होतात, त्यामुळे ह्या पेशंटसचे बाहेर पडणे हळूहळू कमी होऊ लागते, ते आपल्या कोशात जातात. आणि मग पार्किन्सन्सच्या आजारापेक्षा ह्या मानसिकतेनेच ते आणखी खोल गर्तेत जाऊ लागतात.
आमच्या पार्किन्सन्सच्या पेशंटसना समाजात वावरताना कोणत्याही कारणामुळे भयगंड असू नये, ह्यासाठी मला वाटते, की समाजाला पार्किन्सन्सबद्दल जास्तीत जास्त माहिती होणं गरजेचं आहे. त्यासाठी आता ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून पार्किन्सन्सबद्दल सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे.