खेळ, करमणुकीचे कार्यक्रम,ओरिगामीच्या कलाकृतीतून बक्षिसासाठी निवड अशा अजून बऱ्याच
गोष्टी व्हायच्या होत्या. विश्रांती न घेता लगेच सर्व कामाला लागले.अंजलीनी प्रत्येकाला काय कार्यक्रम करणार याची विचारणा केली.सुमनताई आणि श्यामाताईनी ओरीगामीचे नंबर काढले.इतर गोलाकर खुर्च्या मांडत होते. कोण शुभंकर कोण शुभार्थी कोणालाच ओळखता आले नसते.सर्वांचा उत्साह पाहून पीडीनेच शरमेने मान खाली घातली होती.अंजलीनी खेळ तयार करून आणला होता १० प्रश्न आणि त्याला दिलेल्या पर्यापैकी अचूक पर्याय निवडायचा होता.सर्वाना कागद वाटण्यात आले.दहा मिनिटे वेळ दिला होता. चीद्दरवार यांचे १० पैकी १० बरोबर आले.सुरेश बागल,केशव महाजन,रामचंद्र करमरकर,स्नेहलता जोशी,आशा रेवणकर यांचे ९ बरोबर आले.सर्वाना लगेच बक्षिसे देण्यात आली.ओरिगामी मध्ये सविता ढमढेरेच्या फुलपाखराला प्रथम आणि आशाच्या इस्त्रीच्या शर्टला दुसरा क्रमांक मिळाला.
यानंतर जोस्ना सुभेदार यांच्या गीतेच्या १५ व्या अध्यायाने करमणुकीच्या कार्यक्रमास सुरुवात झाली.अंजलीने आपल्या खुसखुशीत शैलीत सूत्रसंचालन केले.सविता ढमढेरे आणि शोभना तीर्थळीसह सर्व शुभंकर शुभार्थिनी ‘चांदणं,चांदण झाली रात’ हे कोळीगीत म्हटले.उमेश सलगर यांनी आईची महती सांगणाऱ्या कवितेचे वाचन केले.सुरेंद्र महाजन यांनी ‘शिवशक्तीचा अटीतटीचा’ हे नाट्यगीत म्हटले.केशव महाजन यांनी पाकिजातील संवाद म्हटले,स्नेहलता जोशी यांनी’या सुखानो या’ आणि लोकाग्रहासाठी’ केतकीच्या बनी तिथे ‘ हे गीत म्हटले.अंजलीने स्वरचित कवितेत एका चिमुकलीचे मनोगत व्यक्त केले. श्रीपाद कुलकर्णी यानी विनोदी पुणेरी पाट्यांचे वर्णन करून सर्वाना हसवले ‘मेरा दिल मचल.गया तो मेरा क्या कसूर’ हे गीत गाऊन सर्वाना जुन्या काळात नेले.विजया मोघे यांनी ‘गौरिहारी दिनानाथा’ हे भक्तीगीत म्हटले.शोभना तीर्थळी यांनी’ रसिक बलमा’ म्हटले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.सहभागी सर्वाना श्यामाताई यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
तोवर चहा आलाच.चहा घेऊन लगेच निघायचे होते.यावेळी सर्वांचा एकत्रित फोटो काढायचाच असे दीपाने ठरवले होते. आणि ते पूर्णत्वास आणले.अंजलीने हजेरी घेतली आणि बस परतीच्या प्रवासाला निघाल्या.खवय्या उमेश सलगर यांनी तेवढ्यात नीर फणस विकत घेतले. जेवणात त्याची भजी होती.जाताना अनोळखी असणाऱ्यात आता जवळीकीचे नाते निर्माण झाले होते.