(फोटो सौजन्य: अरुंधती जोशी)
पार्किन्सन्स मित्रमंडळाची ११ डिसेंबरची सभा नर्मदा या नव्या वास्तुत व्हायची होती.दिवंगत शुभार्थी चंद्रकांत दिवाणे यांचा मुलगा अतुल दिवाणे यांनी नवीन जागेचा नकाशा काढून त्याच्या प्रती काढून दिल्या होत्या. त्या सभासदांना नोव्हेंबरमध्येच पाठवल्या गेल्या.काही उत्साही शुभंकर सभेच्या दिवशी जागा शोधण्यात वेळ जायला नको म्हणून आधीच जागा पाहून आले होते.सभेच्या ठिकाणी श्यामला शेंडे,आशा रेवणकर,रामचंद्र करमरकर,अरुंधती जोशी यांनी लवकर जाऊन मंडळाचा बोर्ड लावला होता.नवीन जागेत प्रतिसाद मिळतो की नाही ही शंका ५०/६० सभासदांनी वेळेत येऊन निराधार ठरवली.नर्मदाच्या शुभांगी कुलकर्णी हवे नको पाहायला जातीने उभ्या होत्या.सर्वांनी चपला बाहेर काढायच्या होत्या. व्हरांड्यात सभासदांना बूट चपला काढणे सोपे जावे म्हणून दोन खुर्च्या ठेवल्या होत्या.एकूणच वातावरणात सकारात्मक उर्जा होती.
नारायण कलबाग या ९४ वर्षाच्या शुभार्थीनी म्हटलेल्या प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली.यानंतर नर्मदा हॉलच्या शुभांगी कुलकर्णी आणि वक्ते डॉक्टर संजय गांधी यांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
शुभांगी कुलकर्णी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.त्या व त्यांचे सर्व कुटुंबीय विवेकानंद केंद्राचे काम करतात.या जागेत पूर्वी गुरुदेव रानडे यांची ध्यान कुटी असल्याने येथे कोणत्याही व्यावसायिक कार्यक्रमास जागा देत नसल्याचे सांगितले.जागेचे पावित्र्य राखले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली.आशा रेवणकर यांनी त्यांची ओळख करून दिली.
डॉक्टर गांधी यांची रामचंद्र करमरकर यांनी ओळख करून दिली.
डॉक्टरांनी मधुमेह असो रक्तदाब किंवा अशा तऱ्हेचा कोणत्याही आजाराची नोंद मातेच्या गर्भात असतानाच होते असे सांगत आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली.टाईप १ आणि टाईप २ अशा मधुमेहाच्या प्रकारांची विस्ताराने माहिती सांगितली.मधुमेह होण्यात अनुवंशिकता हा एक भाग आहे. पण जीवनशैली योग्य ठेवून व्यायामाने तो लांबणीवर टाकता येतो.लठ्ठपणा,पोट सुटणे हे मधुमेहाला कारणीभूत असतात.डॉक्टर मधुमेह रुग्णाच्या कुटुंबियांना बोलवून त्यांचा मधुमेह लांबवण्यासाठी मार्गदर्शन करतात.’ब्रेकफास्ट विथ डॉक्टर’ असा उपक्रम सुरु करून अचानक पेशंटच्या घरी जावून आहारावर नियंत्रण करण्यास मार्गदर्शन केले.विविध शिबिरे घेऊन आहार काय असावा याबाबत जागृती केली.योग,मेडीटेशनची शिबिरे घेतली.
मधुमेहाचा स्वमदत गट सुरु करून त्यांच्यासाठी विविध उपक्रम केले.सहली नेल्या.रामचंद्र करमरकर यांचा या सर्वात मोठ्ठा सहभाग होता.करमरकर यांनी कधी न सांगितलेली ही माहिती डॉक्टरांच्या व्याख्यानातून समजली.पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काम करताना या अनुभवाचा नक्कीच उपयोग झाला.
रक्तदाबाच्या काही गोळ्या सातत्याने घेतल्यास, लघवीसाठी घेतल्या जाणाऱ्या काही गोळ्याही सातत्याने घेतल्यास मधुमेह होऊ शकतो तसे पार्किन्सन्सच्या कोणत्या गोळ्यांचा असा परिणाम होत नाही.
यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.