Sunday, October 6, 2024
Homeपार्किन्सन्सविषयी गप्पापार्किन्सन्सविषयी गप्पा - १० - शोभनाताई

पार्किन्सन्सविषयी गप्पा – १० – शोभनाताई

“डॉ. शोभना तीर्थळी आहेत का? त्यांच्याशी जरा पार्किन्सन्स मित्रमंडळासंबंधी बोलायचे होते.” फोनवरून एक व्यक्ती विचारत होती. ‘डॉक्टर’ शब्दावर विशेष जोर आणि सूर थोडा भांडणाचा होता. मला कोणी डॉक्टर असे संबोधले की मी पहिल्यांदाच सांगून टाकते, की मी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर नसून माझी डॉक्टरेट आहे. नाहीतर लगेच समोरच्यांकडून औषधोपचारासंदर्भात चौकशीला सुरुवात होते. त्याप्रमाणे मी ह्या फोनवरच्या गृहस्थांनाही प्रथमच तसे सांगितले. तरीदेखिल त्यांचा सूर अजूनही भांडणाचाच होता. “ते असू द्या हो! मला आधी सांगा, तुम्हाला मराठीचा अभिमान वगैरे काही आहे की नाही?” त्यांचा अशा त-हेने दरडावून विचारण्यामागचा हेतू मला समजेना. मी म्हणाले, “अर्थातच आम्हाला अभिमान आहे! आमच्या मंडळाचा सगळा कारभार मराठीतच चालतो. आम्ही आजपर्यंत तीन पुस्तके मराठीतून प्रकाशित केली आहेत. ह्यापूर्वी पार्किन्सन्सविषयी फारसे साहित्य मराठीतून उपलब्ध नव्हते. आम्ही वर्षातून एकदा स्मरणिका काढतो, जी मराठीत असते. संचार नावाचा एक मराठी अंक काढतो. आमच्या मंडळात होणारी व्याख्याने मराठीत असतात. एवढेच नाही, तर आमची वेबसाईट, ब्लॉग आणि फेसबुक पेजसुद्धा मराठीतच आहे.” त्यांनी मला तेथेच थांबवत पुन्हा चढ्या आवाजातच विचारले, “अहो हो हो, ठीक आहे! पण नावाचे काय? पार्किन्सन्स हे इंग्रजी नाव का वापरत आहात तुम्ही? कंपवात म्हणता येत नाही का? सर्वात आधी तुमच्या मंडळाचे ते नाव बदला.” मी निरुत्तर झाले. कोणी अशी तीव्र हरकत घेईल हे माझ्या स्वप्नातही नव्हते.

श्री. मधुसुदन शेंडे आणि श्री.शरच्चंद्र पटवर्धन ह्यांनी जेव्हा पार्किन्सन्स मित्रमंडळाची स्थापना केली, तेव्हा त्यांनी हे नामकरण केले आणि आत्तापर्यंत आम्हा कोणालाही त्यात काही गैर वाटले नाही. पण ह्या गृहस्थांचा त्या नावाला आक्षेप होता आणि आम्ही ते बदलले पाहिजे, नाव बदलले नाही तर आम्हाला मराठीचा अभिमान नाही असे त्यांचे म्हणणे होते.

मुळात १८१७ साली जेम्स पार्किन्सन ह्यांनी ह्या आजारावर शेकींग पाल्सी हा निबंध लिहीला आणि त्यांच्या स्मरणार्थ ह्या आजाराला हे नाव दिले गेले आहे. त्यामुळे आम्ही हे नाव बदलू शकत नाही, हे त्यांना समजावण्याचा मी पुष्कळ प्रयत्न केला. पण ते गृहस्थ काही आपला हेका सोडायला तयार नव्हते. त्यांचा कंपवात म्हणण्याचा आग्रह मान्य करणे किंवा मंडळाचे नाव बदलणे शक्य नव्हते, पर्यायाने त्या गृहस्थांचा रोष कायम राहिला.

ह्या प्रसंगाच्या निमित्ताने मला ह्या संदर्भात तपशीलाने बोलणे आवश्यक वाटते. आमच्या दृष्टीने लोकांना पार्किन्सन्सविषयी माहिती मिळणे, त्यांना पार्किन्सन्ससह आनंदी रहायला शिकवणे, ह्या उद्दिष्टांशी आम्ही बांधील आहोत. असे असताना अशा किरकोळ मुद्द्यांवरून भांडत किंवा वाद घालत बसणे योग्य नाही, असे माझे मत आहे.

ह्यापूर्वीदेखिल अशा घटना घडल्या आहेत. एका वृत्तपत्राला मी आमच्या अकरा एप्रिलच्या कार्यक्रमाबद्दल ‘पार्किन्सन्सला दिली ओसरी’ अशा शीर्षकाचा एक लेख दिला होता. तो प्रकाशित करताना त्यांनी संपादन करून त्याचे शीर्षक परस्परच ‘कंपवाताला दिली ओसरी’ असे बदलून टाकले. आणखी एकदा मी एका मासिकात लेख दिला होता, त्यांनीही संपादकीय संस्करण करून पार्किन्सन्स शब्द बदलून कंपवात हा शब्द वापरला. पण त्या बदलांवर हरकती घेऊन उगाचच त्या त्या संपादकांशी त्यावर वाद घालत बसणे मला तितके महत्त्वाचे वाटले नाही. माझ्या दृष्टीने त्या लेखांद्वारे लोकांना पार्किन्सन्स मित्रमंडळ नावाचा एक स्व-मदत गट चालतो हे समजणे जास्त महत्त्वाचे होते.

पार्किन्सन्सचे भाषांतर बरेच जण कंपवात असे करतात. ह्याबद्दल माझे जे मत आहे – जे चूक की बरोबर ह्याची कल्पना नाही – ते म्हणजे, कंपवात हे भाषांतरच मुळात चपखल नाही. कंपवात हा शब्द आयुर्वेदात वापरला जातो. आयुर्वेदानुसार केवळ कंप असणारे पीडी (पार्किन्सन्स डिसीज) रुग्णच कंपवात ह्या श्रेणीमध्ये येतात. तर पार्किन्सन्समध्ये सगळ्याच रुग्णांना कंप नसतो. मग कंप नसलेले जे रुग्ण असतात, ते इतर वातविकारांमध्ये मोडतात. पण त्याला कंपवात म्हणत नाहीत. ह्या दोन्ही शास्त्रांचा पाया आणि विचारपद्धती हे पूर्णपणे वेगळे आहेत. त्यामुळे ‘पार्किन्सन्स डिसीज’ हे विशिष्ट आणि आयुर्वेदाला अभिप्रेत असणा-या कंपवाताहून वेगळी लक्षणे दाखविणा-या आजारासाठी योजलेले एक विशेषनाम आहे आणि ते योग्य आहे असे मला वाटते.

जेम्स पार्किन्सन ह्या व्यक्तीने सर्वप्रथम त्याचे वर्णन करून त्याबद्दल शेकींग पाल्सीमध्ये सांगितल्यामुळे त्याच्या नावावरून त्या आजाराला हे नाव देण्यात आले. अशा विशेषनामाचे भाषांतर कसे करता येईल? मग तेच जसेच्या तसे मराठीत वापरले तर हरकत असण्याचे कारण नाही. आपण जेव्हा मराठीत रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे म्हणतो, तेव्हा त्यातून आजाराचे स्वरूप स्पष्ट होते. त्यामुळे तेथे मराठीकरण योग्य आहे. पण आपण जेव्हा आर्किमिडीजचा सिद्धांत म्हणतो, न्यूटन्स लॉ म्हणतो, रामन इफेक्ट म्हणतो, तेव्हा तेथे भाषांतर अपेक्षितच नसते. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संशोधने अशी आहेत, ज्यांना त्यासंबंधित संशोधक भारतीय डॉक्टरांची नावे दिलेली आहेत. मग ती नावे वापरताना मराठी नसणा-या लोकांनी त्या त्या संशोधकांच्या नावाची भाषांतरे करावीत का? तर तसे करणे संभव नाही. तद्वतच येथेही पार्किन्सन्स हेच नाव वापरले पाहिजे, त्यासाठी कंपवात असे भाषांतर वापरणे योग्य नाही, असे माझे स्पष्ट मत आहे.

हे माझे मत अर्थातच ह्याविषयावरचे माझे आजपर्यंतचे प्रदीर्घ वाचन आणि अभ्यासाच्या निष्कर्षांवर आधारीत आहे. ते मी येथे मुद्दाम मांडले आहे, जेणे करून ते कोणाला अयोग्य वाटले तर त्यांनी योग्य माहितीच्या आधारे ते खोडायला हरकत नाही. त्याचबरोबर अशा स्वरुपाच्या तांत्रिक मुद्द्यांमध्ये मराठीचा इतका आग्रह धरणे गरजेचे आहे का, ही शंकाही मी उपस्थित करते. ह्यानिमित्ताने तुम्हा वाचकांना ह्या गप्पांमध्ये सहभागी होऊन ह्यासंदर्भातील आपापले मत सांगण्याचे आवाहन करावेसे वाटते. माझ्या ओळखीतील आयुर्वेदाचार्यांनासुद्धा मी ह्या चर्चेत सामील करून घेत आहे.

शब्दांकन – सई कोडोलीकर.

अधिक माहितीसाठी http://parkinson-diary.blogspot.in हा ब्लॉग पहा.

www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.

Parkinson’s Mitramandal, Pune हे युट्युब चॅनेलसुद्धा अवश्य पहा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क