गुरुवार दि.१४ जुलै रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने वैद्य नरेंद्र पेंडसे यांचे ‘ पार्किन्सन्ससाठी आयुर्वेद‘ या विषयावर हॉटेल अश्विनी येथे व्याख्यान आयोजित केले होते.६० ते ७० जण उपस्थित होते.प्रार्थना आणि वाढदिवस साजरे करून सभेस सुरुवात झाली.वैद्य पेंडसे यांची शोभना तीर्थळी यांनी ओळख करून दिली.
सुरुवातीलाच त्यांनी आयुर्वेदाची सर्वसाधारण स्वास्थ्याची व्याख्या आणि एखादा आजार झालेल्या व्यक्तीच्या स्वास्थ्याबद्दलची व्याख्या सांगितली. पार्किन्सन्स ही व्याधी आहे पण प्रसन्न इंद्रिय,मन असेल तर स्वास्थ्य चांगले म्हणता येईल आणि सभेस जमलेले असे प्रसन्न चित्त असल्याचे जाणवले असे सांगितले.आपल्या भाषणात आयुर्वेदाच्या भूमिकेतून पार्किन्सन्स कसा होतो,उपचारात काय करावे आणि अॅलोपाथीची उपचार चालू असताना पूरक म्हणून काय करता येईल,अशा तीन पातळ्यांवर विचार मांडले.
चरक संहितेपासून अगदी नंतरच्या भैषीय रत्नावलीपर्यंत आयुर्वेदाच्या दृष्टीने या आजाराबद्दल कायकाय सांगितले गेले याचा आढावा घेतला.
अलीकडच्या काळात मधुमेह,रक्तदाब,हृदयविकार हे ५०/६० वयानंतर होणारे आजार तिशीतच होताना दिसत आहेत.बदललेली जीवन शैली यासाठीचे एक कारण आहे.आयुर्वेदात याचा सुरुवातीपासूनच विचार केला गेला आहे.पार्किन्सन्सबाबतही लहान वयात तो होण्याचे प्रमाण वाढले आहे.आयुर्वेदानुसार पीडी होण्याच्या कारणात अनुवंशिकता हे एक आहे.गर्भधारणेपुर्वी आई वडिलांचं आरोग्य कसे होते,गरोदरपणात आणि प्रसुतीनंतर आहार विहार कसा होता,उपचार काय केले हे महत्वाचे ठरते.
आयुर्वेदात औषधा इतकच किंबहुना औषधापेक्षा ऋतूनुसार आहार विहाराला जास्त महत्व दिले आहे.आहारात आपले पूर्वज जे खायचे आणि भौगोलिक प्रदेशानुसार जे जिथे पिकते ते खावे,
भूक लागल्यावरच खावे असे सांगितले आहे.झोपेची वेळ आणि दर्जा यांनाही महत्व दिले आहे.
भारतात आयुर्वेदावर बऱ्याच जणांचा विश्वास असतो.पण वैद्यकीय सल्ल्याऐवजी बाजारात उपलब्ध औषधे आपल्या मनाने घेण्याचे प्रमाण जास्त आहे.यातही प्रसुतीनंतर घेण्याची औषधे,मालीशची तेले,पोट साफ करण्यासाठीची औषधे यावर भर असतो.बऱ्याच पीडी पेशंटना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. सल्याशिवाय ही औषधे सर्रास घेतली जातात.पण हे चुकीचे आहे.यामुळे पोट साफ होते असे वाटले तरी त्यात सोनामुखीसारखी औषधे असतात आणि ती आतड्यातील गट फ्लोरा मायक्रो बायो यांच्या कॉलनीज बदलतात.त्याचा दूरगामी परिणाम होतो.याचा मेंदूशी संबंध असतो.आयुर्वेदानुसार खाण्यापिण्यात बदल आणि बस्ती चिकित्सा महत्वाच्या ठरतात.त्याचा मेंदूलाही उपयोग होतो.पण यासाठी ३ ते ६ महिने वेळ द्यावा लागतो.लीओडोपा,तत्सम औषधाप्रमाणे ८/१० दिवसात फरक पडत नाही. अॅलोपाथीच्या दिलेल्या गोळ्यांनी बाह्य लक्षणे लवकर आटोक्यात येतात.बौद्धिक क्षमता,निर्णयक्षमता,विषाद,नैरा श्य,झोप,लघवी या समस्या नंतर लक्षात येतात. आयुर्वेदात या सर्वांचा एकत्रच विचार होतो.यासाठी लागणारा अवधी ६ महिने ते एक वर्ष किमान परिणाम दिसण्यास लागत असल्याने अडचणी निर्माण होतात.यातही अॅलोपाथीची औषधे जितकी जास्त दिवस घेतली त्यांना परिणाम त्यामानाने उशिरा दिसतो.आयुर्वेदीय उपचारात पोटात घ्यायची औषधे गौण मानली आहेत.बस्ती,एनिमा, शिरोधारा, नस्य यावर भर दिला आहे.हे व्यक्तीनुसार वेगळे आहे आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली हे केले पाहिजे.
पेंडसे यांनी अमेरिका, इंग्लंड येथे झालेल्या अनेक संशोधनाचे निष्कर्ष आयुर्वेदीय तत्वांना पुष्टी देणारे असल्याचे विविध संशोधनाची उदाहरणे देऊन सांगितले.परंतु ही संशोधने तेथील पेशंटवर झालेली असल्याने तिथले राहणीमान, सांस्कृतिकदृष्ट्या वेगळेपण असल्याने येथल्या पेशंटवर प्रयोग होण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.
यानंतर श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
जुलै महिन्याचा संचारचा अंक उपस्थिताना देण्यात आला.
पद्मजा ताम्हणकर यांनी वाढदिवसानिमित्त आणि अश्विनी दोडवाड यांनी नातीच्या जन्माची बर्फी दिली.
-शोभना तीर्थळी