Tuesday, December 3, 2024
Homeक्षण भारावलेलेक्षण भारावलेले - ४ - शोभनाताई

क्षण भारावलेले – ४ – शोभनाताई

पार्किन्सन्स मित्रमंडळाचे स्वतंत्र असे ऑफिस नाही. कार्यकारिणीची बैठक आम्ही आम्हा सदस्यांपैकीच कोणाच्या ना कोणाच्या घरी घेतो. साधारण सर्वांना सोयीचे पडेल असे मध्यवर्ती ठिकाण ठरवतो. आमची शुभार्थी रेखा आचार्य गेली सात ते आठ वर्षे ही बैठक तिच्याकडे घेण्यासाठी आम्हाला बोलावीत होती. पण ती एमआयटी महाविद्यालय परिसरात रहात असल्यामुळे तिच्याकडे जमणे सर्वांना सोयीचे होत नव्हते. आता तिच्या मुलाने तिला प्रभात रस्त्यावर नवे घर घेऊन दिले आहे. त्यामुळे इकडे रहायला आल्यानंतर रेखाने पुन्हा आवर्जून सर्वांना ‘मी आता जवळ रहायला आले आहे, तेव्हा कोणीही कोणतीही सबब देऊ नये,’ असे प्रेमाने दटावत जानेवारीची बैठक तिच्या घरी घेण्याचा आग्रह केला आणि त्याप्रमाणे जानेवारी महिन्याची बैठक तिच्याकडे ठरली.

बैठकीचा दिवस उजाडेपर्यंत अनेक सदस्यांना काही ना काही अपरिहार्य अडचणी येत गेल्या, एकेकाचे गैरहजेरीचे निरोप येत गेले आणि प्रत्यक्षात बैठकीला येऊ शकतील असे सदस्य म्हणजे पटवर्धन, करमरकर, आम्ही दोघे आणि आशा रेवणकर इतकेच राहिले. अशा वेळी खरेतर आम्ही बैठक रद्द केली असती. कारण आमचे काही ठरावीक वेळापत्रक नसते. फोनवरून किंवा आता व्हॉट्सपच्या माध्यमातून पुन्हा एकमेकांच्या वेळा घेऊन आम्ही बैठकीचा दिवस व वेळ बदलतो.

मात्र रेखाकडे जमायचे इतक्या वर्षांनी ठरले असल्यामुळे आणि तिने त्याप्रमाणे काही तयारी करून ठेवली असण्याची शक्यता वाटल्यामुळे तिला नाही म्हणणे आम्हाला रास्त वाटेना. म्हणून जेवढे सदस्य येऊ शकत आहेत तेवढ्यांनी जाऊ, काही नेहमीचे विषय चर्चेला घेऊ, असे ठरले. खरे म्हणजे रेखाच्या आग्रहाचा मान ठेऊन तिच्याकडे जाणे हाच आमचा मुख्य हेतू होता.

त्यापूर्वी रेखाने कार्यकारिणीतल्या तिच्याकडे येणार असलेल्या आम्हा प्रत्येक सदस्याला आमच्या रहाण्याच्या ठिकाणापासून तिच्या घरापर्यंत कसे पोहोचायचे ह्याचे मार्गदर्शन आणि त्यानुसार खाणाखुणा असे सर्व मुद्दाम फोन करून समजावून दिले होते. तेव्हाही तिने सर्वांना नक्की या असे पुन्हा एकदा आवर्जून सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही सगळे ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी तिच्याकडे पोहोचलो.

पुढे जाण्यापूर्वी थोडीशी रेखा आचार्यची ओळख करून देणे आवश्यक आहे. तीनचार वर्षांपूर्वी तिच्या यजमानांचे निधन झाल्यापासून ती एकटी रहाते. एक शुभार्थी म्हणून तिचे वर्तन अगदी आदर्श म्हणावे असे आहे. अतिशय उत्साही व्यक्तिमत्व. आमचा जो ११ एप्रिलचा पार्किन्सन्स दिन असतो, त्यासाठी लागणारे फुलांचे गुच्छ आणि फुलांची आर्थिक जबाबदारी रेखाने कायमची स्वत:कडे घेतलेली आहे. मंडळाच्या दरवर्षीच्या सहलीलासुद्धा ती आनंदाने येत असते.

रेखाला सत्तेचाळीसाव्या वर्षी पार्किन्सन्स झाला. पण त्याचे निदान होण्यास जवळपास तीनेक वर्षे गेली. ती मुलाकडे अमेरिकेत गेली असताना तेथील डॉक्टरांनी तिला पार्किन्सन्स असल्याचे निदान केले. पण त्यावेळी रेखाने ते अतिशय सकारात्मकतेने स्विकारले. एकुणात समोर आलेल्या कोणत्याही परिस्थितीशी स्वत:ला जुळवून घ्यायचे हे तिच्या स्वभावाचेच वैशिष्ट्य म्हणता येईल. लग्नापूर्वी ती फिजिओथेरपी शिकत होती, लग्नानंतर ते शिक्षण तिला अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर तिने एम्. ए. केले, पण त्याच काळात यजमानांनी नायजेरीयात नोकरी स्विकारल्यावर रेखाही त्यांच्याबरोबर नायजेरीयाला गेली. तेथे असताना ती तेथील शाळेत शिकवत असे.

रेखा जेव्हा नायजेरीयाहून पुण्याला परतली तेव्हा येथे बी. एड्. चे महत्त्व वाढलेले होते. रेखाला बी. एड्.शिवाय शिक्षिकेची नोकरी मिळण्याची शक्यता कमी होती. मग तिने स.प. महाविद्यालयातून बालवाडीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याचवेळी एमआयटीमध्ये बालवाडी शिक्षिकांसाठी मुलाखती सुरू होत्या. तेव्हा हजारो अर्जांमधून रेखाची निवड झाली. अल्पावधीतच शिक्षिकेच्या पदापासून बालवाडीची धोरणे ठरविणा-या कार्यकारिणीची सदस्य होण्यापर्यंत तिने मजल मारली आणि मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांच्या बालवाड्या तिने उत्तमरित्या यशस्वीपणे उभ्या केल्या. थोडक्यात जशी संधी येत गेली तशी ती संधीचे सोने करत गेली आणि सतत कार्यरत राहून तिने स्वत:ला कायम गुंतवून ठेवले. हा एक तिचा फार मोठा गुण होता. त्यामुळे पतीच्या निधनानंतरही ती एकटी छान राहू शकली.

आम्ही गेलो तेव्हा रेखाच्या शारिरीक अवस्थेबद्दल थोडे साशंक होतो. कारण तिचा ऑन पिरीयड साधारण तीन तास टिकतो आणि ऑफ पिरीयड सुरू होतो. आता तिने सत्तरी ओलांडली आहे आणि सत्तेचाळीसाव्या वर्षापासून मुक्कामाला आलेला पार्किन्सन्सही आता बराच मुरलेला आहे. त्यामुळे आम्ही ह्या कल्पनेत होतो की, रेखाने खाद्यपदार्थ वगैरे बाहेरून मागवले असतील. पण तिने केलेली जय्यत तयारी पाहून आम्ही थक्क झालो. गुळपोळ्या, दहीवडे आणि तुरीच्या ओल्या दाण्यांच्या कचो-या असा जोरदार बेत होता. हे सगळे तसे क्लिष्ट पाककृतींचे पदार्थ रेखाने स्वत: घरी केले होते, कुठूनही मागवले नव्हते! घरी मदतनीस येते, फक्त तिची मदत घेतली होती. त्यावरही ती म्हणाली, ‘मला तिला हे सगळे शिकवायचे होते. त्यासाठीही मी हे पदार्थ केले.’ तिने एवढा मोठा घाट घालणे आम्हाला अपेक्षितच नव्हते. सगळे पदार्थ उत्तम केले होते. ती म्हणाली, ‘गुळपोळीसाठी पीठ मी मळले, कचो-यांमध्ये सारण मी भरले.’ म्हणजे मुख्य काम रेखानेच केले होते, त्या बाईंकडून फक्त वरकाम करून घेतले. ती अगदी आग्रह करकरून आम्हाला खाऊ घालत होती. ती पुढे मला असेही म्हणाली, ‘शोभनाताई, तुम्हाला हरभ-याची डाळ चालत नाही ना, म्हणून कशातही मी ती वापरलेली नाही. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त खा.’ म्हणजे हे सगळे पदार्थ करताना तिने आम्हा सर्वांच्या पथ्यांचाही काळजीपूर्वक विचार केला होता. मला हरभरा डाळ चालत नाही हे तिला माहिती असल्याचे ऐकून मला खूप नवल वाटले. ह्याचा अर्थ तिने किती प्रेमाने आमचा पाहुणचार केला पहा! एकंदरीतच जे करावेसे वाटते ते सगळे कोणताही विचार न करता पूर्ण मनापासून करून टाकण्याचा तिचा स्वभाव.

रेखा हरेक गोष्टीत तिच्या अनेक मैत्रिणींना सोबत घेत असते. आम्ही गेलो त्याहीदिवशी तिने नयना मोरेंना खास बोलावले होते. नयना मोरे म्हणजे आमचे एक दिवंगत शुभार्थी कर्नल मोरे ह्यांच्या पत्नी. रेखाप्रमाणेच नयना मोरेही एमआयटीजवळ रहायच्या. त्यामुळे त्या दोघींची मैत्री. नंतरसुद्धा आनंदवनच्या सहलीला रेखा आली तेव्हा तिच्या शुभंकर म्हणून नयना मोरेच आल्या होत्या. तशाच जानेवारीतल्या ह्या बैठकीलादेखिल आम्हाला भेटायला म्हणून त्या आल्या होत्या. नयना मोरेंचीे रेखाला अशी सगळीकडे सोबत असते. त्या सिनेमा-नाटकांना एकत्र जातात. त्यांना गाण्यांचे कार्यक्रम आवडतात. प्रत्येक कार्यक्रमावेळी रेखाची कोणी ना कोणी वेगळी मैत्रिण असते. तिचे सगळ्यांशी जमते.

पूर्वीच्या घरापासून एमआयटी जवळ असल्यामुळे रेखाने घरी दोन मुली पेईंग गेस्ट म्हणून ठेवल्या होत्या. सकाळचा नाश्ता वगळता दोन्ही वेळचे जेवण त्यांना रेखाच देत असे. महाविद्यालय जवळ असल्यामुळे मुली दुपारी जेवायला घरी यायच्या. स्वत:बरोबरच त्यांनाही चांगलेचुंगले, गरम, ताजे खायला घालण्याची रेखाला सवय. नंतर प्रभात रस्त्यावरच्या नव्या घरात रहायला जायच्या वेळी मुलींना कदाचित महाविद्यालयाचे अंतर लांब पडेल, त्यामुळे त्या कदाचित इकडे येणार नाहीत असे रेखाला वाटले. पण मुलींना ह्या आचार्यआजींचा इतका लळा लागला की, महाविद्यालयात जाणेयेणे लांब पडत असूनही मुली त्यांच्याबरोबर इकडे रहायला आलेल्या आहेत. आम्ही गेलो होतो तेव्हा रेखाने आमच्याबरोबर त्या मुलींनासुद्धा सर्व पदार्थ अगदी मनापासून पोटभर खाऊ घातले.

त्या मुली नंतर चित्रपट बघायला निघाल्या होत्या. रेखाने कोणता चित्रपट वगैरे चौकशी केली. मुली उत्तरल्या, ‘ये रे ये रे पैसा.’ त्यावर चटकन रेखा म्हणाली, ‘अगं अजिबात बघू नका तो, मी परवाच बघून आले.’ रेखा तो चित्रपट आधीच बघून आली आहे हे ऐकल्यावर तिच्या हौसेला कशी आणि किती दाद द्यावी हे आम्हाला उमगेना. बैठकीतल्या चर्चेत ती म्हणाली, ‘नर्मदा सभागृहात आता आपली सभा आहे ना, जेमतेम पन्नास-साठ लोकांचाच चहा लागतो, तो माझ्या घरूनच नेता येईल.’ बाप रे! तिचे हे एकेक उत्साही बोलणे ऐकून आम्ही पुन्हा पुन्हा थक्क होत होतो.

हे सगळे सुरू असताना मी मात्र इकडे वेगळ्याच विचारात गढले. मला मी रेखाच्या जागी ठेऊन पाहिले. मी अशा परिस्थितीत असते तर स्वत:चा स्वत: कपभर चहा करून घेण्याचासुद्धा विचार केला नसता. तेथे बाकीच्यांना बोलावून, असा बेत स्वत: रांधून खायला घालणे तर दूरचीच बाब! नंतरही तिचे मला म्हणणे होते, ‘शोभनाताई, मिटींग संपल्यावर तुम्ही येथेच येत चला ना! जेऊन वगैरे मग सावकाश घरी जात जा.’ मी आपली परत एकदा आश्चर्यात बुडून गेले.

आमची जेवणे आटोपल्यावर रेखा छानशा नॅपकीन्सचा एक ढीग घेऊन आली आणि तिने आम्हाला त्यातले आवडतील ते निवडून घ्यायला सांगितले. ‘नल्ली’चे ते नॅपकिन्स तिने चेन्नईहून आणले होते. मग आम्ही सर्वांनी ते प्रेमाने घेतले. नुकतीच संक्रांत होऊन गेली होती. त्यामुळे तिने आम्हाला तिळगुळसुद्धा दिला. थोडक्यात सांगायचे तर रेखाला फिरायची आवड आहे, खरेदीची आवड आहे, सगळ्याची हौस आहे. आणि पार्किन्सन्स असूनही कोठेही तिच्या जगण्यात फरक पडलेला नाही, आनंद घेण्यात आणि तो इतरांना वाटण्यात फरक पडलेला नाही.

रेखाच्या ह्या उमद्या व्यक्तिमत्वाने मी नेहमीच अगदी भारावून जाते. मला खूप दिवसांपासून असे वाटत आहे की, एकट्या रहाणा-या शुभार्थींकडे जाऊन, त्यांना भेटून, ते कसे रहातात ते बघावे, त्यांच्या जगण्याचे चित्रिकरण करावे. पण ते अजून तरी मला जमू शकलेले नाही. म्हणून निदान ह्या ‘भारावलेले क्षण’ मालिकेमध्ये तरी त्यांच्याबद्दल सगळे सांगावे असे ठरवले. रेखाकडून निघताना मी तिला मिठी मारली, असे वाटले तिच्यातील ती प्रचंड सकारात्मक उर्जा आपण आपल्यातही ओढून घेतली पाहिजे. तिचे चालणे पाहिले तर पहाणा-याला ती आत्ता पडेल की मग पडेल असे वाटत रहाते. प्रत्यक्षात मात्र ती घरभर फिरत होती, सतत आम्हाला काही ना काही दाखवत होती. हे सगळे पाहिल्या-अनुभवल्यावर आता केवळ ‘रेखा, तुला सलाम!’ इतकेच म्हणता येईल!

शब्दांकन – सई कोडोलीकर.

अधिक माहितीसाठी http://parkinson-diary.blogspot.in हा ब्लॉग पहा.

www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.

Parkinson’s Mitramandal, Pune हे युट्युब चॅनेलसुद्धा अवश्य पहा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क