दिवाळीची साफसफाई, दिवाळीचा फराळ आणि नंतर दिवाळी साजरी करणे यात सर्वजण एका वेगळ्याच मूडमध्ये असतात म्हणून गप्पांना थोडी विश्रांती दिली होती.आता खूप बोलायचे आहे.
गप्पा सुरु केल्या तेंव्हा मी खूप साशंक होते.सई कोडोलीकरने शब्दांकन करायची तयारी दाखवली आणि गप्पा सुरु झाल्या.मध्यंतरी अतुल सुलाखे आमच्याकडे आले असताना म्हणाले सई तुमच्या जवळ राहतात का? मी म्हणाले’ नाही.ती आता कोल्हापूरला राहते.पुण्यात होती तेंव्हाही जवळ राहत नव्हती.’ अतुलला वाटले होते मी सांगते आणि ती लिहून घेते असेच चालत असेल.पण तसे नव्हते.
मला जे म्हणायचे आहे ते रेकार्ड करून Whats App वर मी पाठवते.सई ते लिहून पाठवते.आणि मी ते फेसबुक,पार्किन्सन्सचा Whatsapp ग्रुप आणि वेबसाईटवर देते.त्याला नाव देणे,आकडे टाकणे हेही सईच्या सुचनेतूनच झाले.तिचे शब्दांकन प्रत्येक लिखाणानंतरचा तिचा पहिला प्रतिसाद उत्साह वाढविणारा असायचा.सर्वसामान्यांपर्यंत
तिचे शब्दांकन असल्याने मी तिला Tag केले.इतर अनेकांनाही Tag करण्याचेही तिनेच सुचविले. त्याचा गप्पा मला तरुण पिढीपर्यंत पोचविण्यासाठी खूप उपयोग झाला.माझ्या मुलीची अमेरिकेतील मैत्रीण मला मुद्दाम भेटायला आली तुमचे फेसबुवरचे लिखाण मी वाचते म्हणाली.दुसऱ्या मुलीची ठाण्याची मैत्रीण ‘मी तुझ्या आईचे सदर नियमित वाचते’ असे तिला सांगत होती.मराठी भाषिक असणाऱ्या देशपरदेशातील शुभार्थींच्या मुला नातवंडापर्यंत मंडळाची माहिती पोचत होती.आणि ते शुभार्थी आमच्यापर्यंत पोचत राहिले.ज्यांच्याकडे पीडी पेशंट नाही असे अनेकही जोडले गेले.आमच्या टीमवी मधल्या शेणोलीकरबाई अनेक वर्षांनी येथे भेटल्या.फोनवर भरभरून बोलल्या.माध्यमिक शाळेतला वर्गमित्र श्रीशैल्य सारखा सुजाण वाचक ६४ सालानंतर भेटला.ही काही वानगीदाखल उदाहरणे.
आपला भरभरून प्रतिसाद,प्रेम याबद्दल मनापासून धन्यवाद.