नाही पंढरीशी जाणे नाही कधी वारीशी जाणे
माझं कुटुंब हेच माझी पंढरी म्हणणे
नित्य पती सेवा हेच माझे टाळ मृदूंग
आस सेवेची धरुनी रोज रंगतो अभंग
मन मोकळं करण्या पती माझा साथीदार
त्यांच्या डोळ्यातल पाणी जणू चंद्रभागा तीर
त्यांचे दुःख निवारून देते दान आनंदाचे
काही वेगळे आहे का हो पुण्य विठू दर्शनाचे
निस्वार्थी सेवा हेच खरे माझे व्रत
मग कशाला जाऊ मी नित्य पंढरीस
जेव्हा येतात बापडे सुख दुखः वाटायला
जणू त्यांच्याच रुपानं येते माऊली मला भेटायला
नित्य हात जोडते मी घरातल्या
माझ्या देवाला
सदैव सुखी ठेव माझ्या कुटुंबाला
सौ अंजली महाजन
दिनांक 12/07/2019 आषाढी एकादशी