Wednesday, October 2, 2024
HomeArticlesएक धावती भेट पार्किन्सन्स मित्रमंडळाबरोबर - अतुल ठाकुर

एक धावती भेट पार्किन्सन्स मित्रमंडळाबरोबर – अतुल ठाकुर

pmmpA

आजचा दिवसच वेगळा होता. मुक्तांगणमधुन निघालो होतो. सर्व समुपदेशकांना माझ्या संशोधनाची कल्पना दिली होती. बहुतेकांनी आनंदाने वेळ देण्याचे कबुल केले होते. संशोधनातील प्रत्यक्ष माहिती गोळा करायला सुरुवात करायची होती. त्यामुळे निघताना खुशीतच होतो. आता दुपारी आपल्या मायबोलीवरच्या शोभनाताईंना भेटायचं होतं. त्यांच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या मासिक भेटीचा तो दिवस होता. मंडळाचे कार्यकारीणीतील सदस्य मला भेटणार होते. मंडळाची वेबसाईट मी बनवली होती. त्याबद्दल मला काही गोष्टी त्यांना सांगायच्या होत्या आणि त्यांच्या काही शंकांचे निरसन करायचे होते. मला मुंबईला जाणारी संध्याकाळची गाडी पकडायची होती त्यामुळे जास्त वेळ थांबता येणार नव्हते. आणि माझ्यासाठी ही माणसे त्या दुपारच्या रणरणत्या उन्हात अर्धा तास आधी येणार होती यामुळे नाही म्हटलं तरी मला संकोच वाटला होता. पण वेगळ्या दिवशी मुद्दाम बोलावण्यापेक्षा त्यांच्या मासिक भेटीच्या दिवशीच भेट घेणे जास्त सोयीचे पडणार होते. आणि चार वाजल्यापासुन त्यांचे कार्यक्रम सुरु होणार असल्याने कार्यकारीणीच्या सदस्यांबरोबर अगोदरच बसणे शक्य होते. मी पाच एक मिनीटे आधी पोचलो. अश्विनी हॉटेलचा तो हॉल या मंडळाला मोफत वापरायला दिला होता. तेथे येण्याअगोदर शोभनाताईंशी फोनवर नीट पत्ता विचारला तेव्हा त्या वाटेवरच आहेत हे कळले आणि त्या आल्यादेखिल. त्या आल्या आणि अगदी घरचेच माणुस आल्यासारखे वाटले. त्यांचे व्यक्तीमत्वच असे आहे कि त्यांच्यापुढे आपोआपच वाकुन आपले हात त्यांच्या पायाकडे जातात.

मंडळी हळुहळु जमु लागली होती. बहुतेक सारे ज्येष्ठ नागरीक होते. काही शुभार्थी म्हणजे पार्किन्सन्सचा आजार झालेले तर काही शुभंकर म्हणजे त्यांची काळजी घेणारे. बहुतेकांचा आजार आटोक्यात होता असे वाटले. कारण एखाद दुसरा व्यक्ती वगळता कंप हे पार्किन्सन्सचे प्रमुख लक्षण जे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना माहित आहे ते फारसे दिसत नव्हते. अगदी हाताकडे पाहिले तरच कंप दिसत होता. काही जणांच्या बाबतीत तर यांना पार्किनसन्स आहे हे मुद्दाम सांगावे लागत होते. बाकी आमच्या शोभनाताई म्हणजे पार्किन्सन्सवरचा चालता बोलता शब्दकोशच झाल्यात. अगदी झोकुन दिलंय त्यांनी या कामात. प्रत्येक शुभार्थी आणि शुभंकराची खडानखडा माहिती त्यांना आहे. त्यांना कसले औषधोपचार सुरु आहेत, त्यांचा आजार कुठल्या अवस्थेत आहे. त्यांना कशा प्रकारचे त्रास होतात, प्रत्येक शुभार्थीची लक्षणे कशी वेगवेगळी असु शकतात, फार काय कुठल्या औषधाने त्यांना भास होण्याचा त्रास होते इथपासुन ते पार्किन्सन्ससाठी अत्याधुनिक उपचार कुठले उपलब्ध आहेत इथपर्यंत माहिती शोभनाताईंना मुखोदगत आहे. त्यातुन त्या समाजशास्त्रज्ञ आहेत त्यामुळे या आजाराच्या सामाजिक पैलुंवर त्या बोलु शकतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर बोलणं हे एक तर्‍हेचं शिक्षण असतं.

मात्र त्यादिवशी माझे काही गैरसमजही दुर झाले. मला शुभार्थी आणि शुभंकर यांचा एकच अर्थ माहित होता. मात्र त्याचे वेगळे पैलु देखिल आहेत हे त्या दिवशी कळले. हे समोर खुर्च्यांची ने आण करणारे गृहस्थ यांचा पार्किन्सन्सशी काहीच संबंध नाही. यांच्या घरातही पार्किन्सन्स नाही. यांचं नाव श्री. करमरकर. हे मंडळाचे आधारस्तंभ आहेत. अगदी सुरुवातीपासुन ते मंडळाबरोबर आहेत. मंडळाच्या जडणघडणीच्या प्रमु़ख शिल्पकारांपैकी ते एक आहेत. हे समोर टेबल लावणारे श्री. पटवर्धन. यांच्या पत्नीला पार्किन्सन्स होता. त्या अलिकडेच गेल्या. सेवाव्रती या स्त्रीयाच असतात असा ज्यांचा समज आहे त्यांना पटवर्धनांचे उदाहरण चकीत करेल अशी सेवा त्यांनी आजारपणात आपल्या पत्नीची केली. आणि आज ते सुहास्य मुद्रेने सभेसाठी हजर होते. हे देखिल प्रमुख शिल्पकारांपैकी एक. मी तेथुन निघेपर्यंत त्यांच्या चेहर्‍यावरचे हसु मावळलेले पाहिले नाही. अतिशय मार्मिक विधान करणे हे त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मला जाणवले. नेमक्या मुद्द्यावर हा माणुस बोट ठेवत होता. संस्थापक सदस्यांपैकी श्री. शेंडे आजारी होते पण त्यांचा अमेरिकेत प्राध्यापक असलेला मुलगा खास या सभेसाठी आला होता. सभेत अशी मंडळी होती ज्यांच्या पतीला पार्किन्सन्स आहे. जे काही कारणास्तव येत नाहीत मात्र त्यांच्या पत्नी हजेरी लावतात इतका या मंडळाचा त्यांना आधार वाटतो.

सर्वजण सिनियर सिटीझन्सच होते. कुणाच्या पाठीला पट्टा होता. सार्‍यांच्या शारिरीक शक्तीला मर्यादा होता. मात्र त्यांच्यासकट पार्किन्सन्स झालेली मंडळीदेखिल टेबल खुर्च्या लावत होती. मंडळाचा बॅनर लागला. काही मिनिटातच कार्यकारीणीचे सदस्य टेबलाभोवती खुर्च्यांवर बसले. थंड पेय देऊन श्रमपरिहार झाला. सभेचे कामकाज सुरु झाले. सर्वांनी आपापली ओळख करुन दिली. माझ्या शेजारी बसलेले गृहस्थ म्हणजे श्री. अनिल कुलकर्णी यांना पार्किन्सन्स आहे. मात्र ते सगळीकडे एकटेच जातात. सारं काही एकटेच मॅनेज करतात. पत्नीकडुन सेवा घेत नाहीत. कुणी इंजिनियर, कुणी समाज शास्त्रज्ञ, कुणी प्रोफेसर, कुणी लेखक, कवयित्री अशी ती विद्वान मंडळींची सभा होती. मी माझी ओळख थोडक्यात करुन दिली आणि वेबसाईट बनवण्याच्या माझ्या उद्देशाबद्दल सांगितले. त्यांच्याकडुन काही सुचना आल्या. काही शंका विचारल्या गेल्या. काही चर्चा झाली. मला एकच समाधान होते. या सार्‍या ज्येष्ठ मंडळींच्या अनुभवी नजरेत मला आनंद दिसत होता. त्यांना माझ्याबद्दल विश्वास वाटला असावा. आमची भेट संपली. त्यानंतर मुख्य कार्यक्रम व्हायचा होता.

नेहेमी आजारासंबंधी व्याख्याने आणि कार्यक्रम ठेवणार्‍या या मंडळींनी यावेळी निखळ मनोरंजनाचा, खळखळुन हसायला लावणारा, दोन घटका आजाराला विसरायला लावणारा विडंबन काव्य गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रम सुरु होण्याआधी जमलेल्या सदस्य मंडळींसमोर माझी ओळख करुन दिली गेली. आणि श्रीफल देऊन पटवर्धनांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. मला अवघडल्यासारखे झाले होते. मी काहीच केले नव्हते. मात्र या मोठ्या माणसांनी त्यांच्या प्रचंड लढ्यात मी उचललेल्या खारीच्या वाट्याचा फार मोठा सन्मान केला होता. पाय शिवायला मी पटवर्धनांपुढे वाकलो तेव्हा त्यांनी मला वर उठवुन जवळ घेतले. सार्‍या मंडळाचाच आशीर्वाद मला लाभला. कार्यक्रम सुरु झाला. सुरेल आवाज असलेल्या कलाकारांनी विडंबन काव्य गायन करायला सुरुवात केली. “कठीण कठीण कठीण किती” या पदात डायेट बद्दलचे विनोद गुंफुन सुरुवात झाली आणि हळुहळु कार्यक्रमात रंग भरत गेला. गाडीची वेळ झाल्याने शोभनाताईंचा निरोप घेऊन मी निघालो. त्यांनी माझ्यासाठी वेगळ्याने पुस्तकांनी भरलेले फोल्डरच आणले होते. ते बरोबर घेतले. त्यात त्यांनी त्यांच्या सासर्‍यांची “अमरकोशा”ची मला दिलेली प्रत ठेवली होती. शोभनाताईंच्या मिस्टरांचा नेहेमी आनंदी दिसणारा चेहरा आठवला कि आता वाटतं शोभनाताई आजुबाजुला असताना नैराश्याला जागा नसणारच.

ज्येष्ठ मंडळींची धडपड पाहिली होती. टेबल खुर्च्या लावण्यापासुन ते थंड पेय वाटण्यापर्यंत सारी कामे शुभार्थी आणि शुभंकरच करत होते. त्यात तरुण कुणीही दिसले नाहीत. मंडळाला नक्की कसली गरज आहे हे अधोरेखित झाले. काम करणारी तरुण मंडळी नाहीत. कामे अनेक आहेत. मासिकातले लेख टाईप करायचेत. घरोघरी संपर्क करायचा आहे. गावोगाव मंडळाचा संपर्क वाढवायचा आहे. मंडळाची माहिती हिन्दी आणि इंग्रजी भाषेत वेबसाईटवर टाकायची आहे. स्कॅनिंगपासुन ते इतर अनेक बारीकसारीक संगणकिय कामासाठी माणसे हवी आहेत. सारे काही या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या शुभार्थींचे आरोग्य आणि आपापली प्रकृती सांभाळुन करावे लागत आहे. मात्र सारेच जिद्दी आहेत. अथक प्रयत्न करत आहेत. मंडळात कुणीही येऊन आपले कार्यक्रम लगेच करु शकत नाहीत. त्यांना कार्यकारीणीबरोबर भेट घेऊन आपल्या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करावा लागतो. या कार्यक्रमामुळे शुभार्थींचा लाभ होणार असेल तरच कार्यक्रम करायला परवानगी मिळते. इतके जागरुक सदस्य येथे आहेत. परंतु अपेक्षित कार्यकर्त्यांची फळी अजुन तयार झाली नाही ही खंत आहे. मात्र ती क्षणभरच त्यांच्या चेहर्‍यावर दिसते. आज कुणाचा तरी वाढदिवस असतो. त्यासाठी फुगा फोडायचा असतो. सारे आपापले गाल फुगवुन फुगा फोडल्याचा आवाज करतात. हा त्यांच्यासाठी एक प्रकारचा व्यायाम आहे. अभिष्टचिंतन होते. आणि मंडळी विडंबनाचा आस्वाद घेऊ लागतात. आता विचार करताना जाणवतं. येथे दिसली ती दुर्दम्य इच्छाशक्ती. त्याला डोळस प्रयत्नांची जोड. माझ्या संशोधनात मी मानवी प्रयत्नांना सामाजिक परिस्थिती आणि अडथळ्यांपेक्षा जास्त महत्त्व दिले आहे. मित्रमंडळाला भेट दिल्यावर मी योग्य मार्गावर आहे हे मला जाणवलं. या धावत्या भेटीने मला दिलेली ही अनमोल भेट होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क