मी’ रेडिएशनचा आनंददायी अनुभव.’ हा लेख लिहिल्यावर अनेकांनी माझ्या सकारात्मकतेचे,कॅन्सर सारख्या आजाराला आनंदाने स्वीकारल्याबद्दलचे भरभरून कौतुक केले.याचे बरेचसे श्रेय पार्किन्सन्स मित्रमंडळाला जाते.मंडळात सामील होण्यापूर्वीची मी आणि सामील झाल्यावरची मी यात महदंतर आहे.
पार्किन्सन्स मित्रमंडळात सामील झाल्यावर पार्किन्सन्ससह आनंदी राहण्याचा कानमंत्र मिळाला.आणि तो अनेकांना देण्याचा वसा आम्ही दोघांनी स्वीकारला. पार्किन्सन्ससह आनंदी जगणारे अनेक शुभार्थी आमचे रोल मॉडेल बनले .हे करता करता एक तप उलटलेले समजलेच नाही.आता कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहायचे हा स्वभावच बनून गेला.
,कॅन्सरचे निदान झाल्यावर आधीच पार्किन्सन्स आणि त्यात कॅन्सर झालेले आणि या दोनही आजारावर यशस्वीपणे मात करून आनंदी जगणारे अनेक शुभार्थी आठवले.त्यांची सकारात्मकता आमच्यापर्यंत झिरापली होतीच.त्यांचा स्वीकार पाहता माझा आजार काहीच नव्हता.त्यांच्याबद्दल आजच्या गप्पात लिहित आहे.
डॉ.महादेव ठोंबरे हे कृषीतज्ज्ञ कृषीसंशोधनादरम्यान कीटकनाशकांच्या संपर्कात होते. त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता.संशोधनावरचे त्यांचे प्रेम मात्र कमी झाले नव्हते.मंडळात आले त्यावेळी त्यांचे बोलणे व्हिस्परींग सारखे होते. त्यातच पार्किन्सन्स झाला.८० वर्षाचे वय पण या सर्वांवर मात करून ते सभेला एकटे येत.इतरांना उपयोगी होतील असे उपचार,माहिती शेअर करत.बोलण्याची समस्या असतानाही फोन करून काहीना काही सुचवत.
शीलाताई कुलकर्णी आणि अनिल कुलकर्णी दोघा पती पत्नींना पार्किन्सन्स.त्यात शिलाताईंना कॅन्सर झाला.सर्दीखोकला व्हावा इतक्या सहजपणे त्यांनी हे स्वीकारले.चित्रकला,विणकाम,नृत्योपचार यात मन रमवले.सगळे छान चालू असता अनिल कुलकर्णी पडल्याचे निमित्त होऊन त्यांचे दुखणे वाढतच गेले.शिलाताईंना ते स्वत:पासून दूर जाऊ देत नसत.सहा महिने त्या खोलीतून बाहेरही पडल्या नाहीत. त्यातच अनिल कुलकर्णींचे निधन झाले.हे दु:ख पचवून त्या सभांना सहलीला येतच राहिल्या.क्षण भारावलेले या लेख मालेत मी त्यांच्याबद्दल लिहिले आहे त्याची लिंक सोबत देत आहे.
मिलिंद तेलंग हे एका Architecture college चे प्रिन्सिपॉल होते.त्यांनाही पार्किन्सन्स होता त्यात कॅन्सर झाला.हे दोन्ही आजार सांभाळत त्यांनी आपला कार्यकाल पुरा केला.ते सभेला जेंव्हा यायचे तेंव्हा फोर व्हीलर चालवत यायचे.ते बासरी ,सिंथेसायझर अशी वाद्ये वाजवतात.२०१० सालच्या जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात त्यांनी बासरी वाजवली होती.आता निवृत्त झाल्यावर ते चिंचवडला राहायला गेले.ते अजूनही व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणून व्याख्याने देतात.नातवाबरोबर वाद्ये वाजवतात. कॅन्सरमधून बाहेर पडले आहेत परंतु पार्किन्सन्स आहेच. त्याला त्यांनी व्यवस्थित सांभाळले आहे.
स्वमदत गटाची हीच तर खासियत आहे.’अवघे धरू सुपंथ’ म्हणत आनंद देणे, आनंद घेणे हे दोन्ही चालूच राहते.