क्षण सौख्याचे क्षण दुःखाचे
ओंजलीतले माणिक मोती
गुंफीत बसले हार तयांचा
तन्मय होऊन मी एकांती
ताक घुसळीता लोण्यासाठी
हात चिमुकले समोर येती
ठेवता गोळा क्षणात फिरुनी
हात रिकामे , डोळे हसती
डब्यातल्या त्या लाडू वड्याही
कधी अचानक संपून जाती
कुणा न ठाऊक ,कुणी पळविले
वाट पहाती डबे तयांची
गडबड घाई शाळेची ती
बडबड ऐकण्या वेळच नाही
आज सभोती निशब्द शांतता
वेळही जाता जातच नाही
आठवणींचा खास खजिना
हरवून जाते बघता बघता
नवरत्ना चा असा नजारा
हार तयांचा दिसे साजीरा