Lock down जाहीर झाल्यावर मला सर्वात प्रथम आठवण आली ती रेखा आचार्य आणि कलबाग काका (नारायण कलबाग ) यांची. कारण हे दोघे एकटे राहतात कलबाग काका तर नव्वदी ओलांडलेले आहेत.
रेखाला फोन केला तर तिच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन मुली पेइंगेस्ट म्हणून राहतात त्या दोघीही आपल्या गावाला गेल्या आहेत.परंतु तिच्याकडे काम करणारी बाई आता 24 तास राहते त्यामुळे तिला काही प्रॉब्लेम नाही. ऋषिकेशचा ऑनलाइन डान्स क्लास आठवड्यातून तिनदा चालू असल्याने तिला छान वाटते. टॅबलेटवर तिला तो छान हाताळता येतो. याशिवाय शेखर बर्वे यांनी मध्यंतरी महाशब्दकोडे असलेले मासिक सर्वांना दिले होते ती कोडी सोडवण्यात तिला मजा येते असे ती सांगत होती एकूण ती आनंदात होती.
कलबागकाकांना सारखा फोन करत होते त्यांचा लैंडलाइन लागत नव्हता. ते हल्ली काही वेळा मुंबईला भाच्याकडे राहतात. तेथे असतील असे वाटले. मोबाईलही लागत नव्हता. थोडी काळजी वाटत होती आणि एक दिवशी त्यांचाच फोन आला मला हायसे वाटले. नेहमी सारखा स्पष्ट आवाज.त्यांच्या पत्नीच्या पार्किन्सन्स बद्दल,त्यांच्या मातीने पाठवलेल्या सपोर्ट ग्रुपच्या पुस्तकाबद्दल अशा खुप गप्पा झाल्या.
मधल्या काळात त्यांना भोवळ आली होती त्यांचे भिंतीवर डोके आपटले ते खाली पडले. बराच वेळ पडून होते. काम करणारा माणूस आल्यावर भाची ला फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे दोन-तीन दिवस राहावे लागले. भाची काही दिवस राहिली आणि ती आता परत कॅनडाला गेली आहे डॉक्टरने सांगितले आता एकटे राहायचे नाही त्यामुळे आता चोविस तास एक माणूस असतो. हे सर्व कथन ते कोणतेही भयंकरीकरण न करता सांगत होते. अगदी सर्दी खोकला झाला होता आणि डॉक्टर कडे गेलो होतो इतक्या सहजतेने सांगत होते.
पेपर येत नाही.टी.व्ही.बंद पडलाय परंतु कॅनडाहून भाची रोज दोन वेळा फोन करते आणि भारतातील सर्व बातम्या सांगते त्यामुळे आजूबाजूला काय चालले आहे ते इत्थंभूत समजते. मुंबईचा भाचा काकांना विचारून आठवड्याचा मेनु ठरवतो. स्वीगीद्वारे सकाळचा ब्रेकफास्ट दुपारचे जेवण आणि संध्याकाळी काही स्नाक्स असे रोज घरपोच येते एकूण सर्व सुशेगात चालले आहे.
त्यांच्या फोनच्या डीपीवर वसू देसाई आणि सरोजिनी कुर्तकोटी त्यांच्याशी बोलत असताना फोटो आहे ते मला सांगत होते तुमच्या दोघांचा बाकावर बसलेला फोटो आहे तो माझ्यासमोर ठेवलेला आहे. मला नीट समजले नाही.यावर मी एकदम नीशब्द झाले.बहुता भाचीने काही फोटोची हार्ड कॉपी काढून दिली असावी का? त्यांच्यासाठी आम्ही सर्व त्यांचे कुटुंबीय होतो म्हणून ते मुंबईवरूनही मोठ्या आवडीने मासिक सभेला येतात पार्किन्सन मित्रामुळे अनेकांशी असे ऋणानुबंध जोडले गेले आहेत.एकमेकांबद्दल प्रेम, काळजी, कौतुक यातूनच तर येते.
पार्किन्सन्सविषयक गप्पा – ५३ – शोभनाताई
RELATED ARTICLES