लॉक डाऊनमध्ये रेखा आणि कलबागकाकांना 24 तासासाठी केअरटेकर मिळाला पण अनेकांच्या कडे सकाळी जाऊन संध्याकाळी परत जाणारे केअरटेकर आहेत त्यांची पंचाईत झाली. अंजली महाजन कडे ही समस्या आली पण आमची अंजली कोणतेही संकट आले तरी न डगमगता त्याचा स्वीकार करून त्याला कणखरपणे सामोरे जाणारी. तातडीने योग्य ती कार्यवाही करणारी. Lock down सुरू झाल्यावर तिने केअरटेकर येण्यासाठी काय करता येईल याचा अंदाज घेतला. लगेचच जवळचे पोलीस स्टेशन गाठले. तिने जे केले ते लगेच इतरांसाठी व्हाटस्अपवर शेअर केले.
‘कोरोना व्हायरस साठी मा .पंतप्रधान यांनी संचार बंदी जाहीर केली तेव्हा आमच्या केअर टेकरने त्याच्या येण्याजाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला कारण काही ठिकाणी पोलिसांनी लोकांना मारहाण केली होती म्हणून तो घाबरला. मग मी त्यांना घाबरू नका आपण पोलिसांची मदत घेऊ आणि यातून चांगला मार्ग काढू असे सांगितले त्या साठी मी स्वतः खालील प्रमाणे एक अर्ज आणि काही कागद पत्र घेऊन बिबवेवाडी पोलिस चौकीत गेले
अर्जात मनुष्यबळ कमी असल्याने आम्ही …..या केअर टेकरची नेमणूक या……।वेळेत केलेली आहे कारण माझ्या पतीला पार्किन्सन्स हा आजार झालेला आहे. त्यांच्या सेवेकरिता केअर टेकर ची नितांत गरज आहे तेव्हां आमच्याकडे येताना अथवा आमच्या कडून घरी जाताना पोलिस खात्याकडून संचार बंदीच्या काळात केअर टेकरची अडवणूक होऊनये ही नम्र विनंती.
माझे पती हे ज्येष्ठ नागरिक आहेत याची ही नोंद घ्यावी
जोडलेली कागदपत्रे
1)डॉ. चे वैद्यकीय प्रमाणपत्र
2)पतीचे आधारकार्ड
3)केअर टेकरचे आधारकार्ड
4) पोलिस चौकीकडे केलेला अर्ज
5)संपर्क मोबाईल नंबर
वरील सर्व प्रस्ताव पोलिसांनी पाहून तो केअर टेकर कडे सदैव ठेवायला सांगितला रोडवर कोणी अडवले तर ती कागदपत्रे दाखवून पेशंटच्या घरी पोलिसांनी फोन करून त्याची शहानिशा करायची आहे
आता आमचा केअर टेकर त्याच्या घरातून नियमित कामाला येतो आहे. आवश्यक ती सर्व काळजी घेत आहे.’
असे असले तरी काही वेळा तर याची दांडी असते कधी उशीरा येतो.कामवाल्या मावश्या नाहीत सगळी कामे एकटीला करावी लागतात खूप तारांबळ उडते.अंजली सांगते, ‘अशावेळी मग मनाशी गाणी म्हणते
” याला जीवन ऐसे नाव
अरे संसार संसार
तुझ्यामाझ्या संसाराला आणि काय हवं?’हे सर्व करतांना केशवरांवाना आनंदी ठेवण्यासाठी त्यांना आवडतील अशा गोष्टी वाचून दाखवणे, जुन्या हिंदी गाण्यांचे व्हिडिओ लावणे हे ती करत असते.
Lock down च्या काळात अनेक ऑनलाईन कविता, कथा अशा स्पर्धा चालू आहेत अंजली यात सहभागी होते बक्षिसेही मिळवते. एरवी केशवरावांना सोडून तिला बाहेर जाऊन या गोष्टी करता यायच्या नाहीत आता मात्र घरी राहून सहभागी व्हायचे असल्याने तिलाही हौस पुरविता येते. एकूणात lock down कडे आपत्ती म्हणून न पाहता संधी म्हणून ती पाहते.