Tuesday, January 28, 2025
Homeक्षण भारावलेलेक्षण भारावलेले - १५ - शोभनाताई - भाग १

क्षण भारावलेले – १५ – शोभनाताई – भाग १

१३जुलै २०२० या दिवशीच्या पार्किन्सन मित्रमंडळाच्या कॉन्फरन्समध्ये आमच्या स्मरणिकेचे वेब एडिशन चे प्रकाशन झाले आमच्यासाठी हा क्षण आनंदाचा होता.२०१४ पुर्वी वेबसाईट असणे हे आमच्यासाठी
स्वप्नरंजन होते. मंडळाकडे तळमळीचे कार्यकर्ते असले तरी पैशाची आवक अशी नव्हतीच. सभासदांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मी वेबसाईट करण्याची कल्पना मांडली होती पण ती प्रत्यक्षात शक्य नाही असे सर्वांनाच वाटले. कारण मंडळात जेष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे.त्यातले सोशल मिडिया वर असणारे,वेबसाईट पाहणारे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत असे आमच्या प्रश्नावलीद्वारे केलेल्या पाहणीतून आढळले होते.इतक्या कमी सभासदांकरता वेबसाईटवर खर्च का करायचा हे सर्वांचे
मत तसे रास्तच होते.
पण २०१४ मध्ये
ध्यानीमनी नसतांना वेबसाईट झाली.आणि त्याचे श्रेय केवळ आणि केवळ डॉक्टर अतुल ठाकूर यांना जाते.
मार्च २०१४ मध्ये पार्किन्सन्स मित्र मंडळाला डॉक्टर अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार पुरस्कार मिळाला. या पुरस्कारा बरोबर एक अनमोल देणगी अचानकपणे मिळाली आणि ती म्हणजे डॉ.अतुल ठाकूर. त्यावेळी ते अजून डॉक्टर झाले नव्हते. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र हा त्यांच्या पीएचडी च्या केस स्टडी चा विषय होता. संघर्ष सन्मान पुरस्काराच्यावेळी त्यांची पहिली प्रत्यक्ष भेट झाली आणि वर्षानुवर्षे आपण एकमेकांना ओळखतो असे वाटले.
यापूर्वी आमचे मायबोलीकर मित्र आणि सुहृद अशोक पाटील यांच्याकडून अतुलची विद्वत्ता, त्यांचे सखोल वाचन,लेखन,लेखनातील विचारांची स्पष्टता आणि नेमकेपणा याविषयी बरेच ऐकले होते.मायबोली आणि अशोक पाटलांच्या मुळे आम्ही अतुल ठाकूर पर्यंत पोचलो आणि पुढचा इतिहास घडला.त्यामुळे मायबोली आणि अशोक पाटील यांच्याबद्दल पण कृतज्ञता वाटते.
अतुलनी समाजशास्त्रात एम.ए. करताना आणि नंतर पीएचडी करताना सेमिनारमध्ये बोलघेवडे विद्वान पहिले होते. प्रत्यक्ष समाजाशी त्यांचे देणेघेणे नव्हते. अशा स्वतःला विद्वान म्हणवणाऱ्या आर्मचेअर स्कॉलरसारखे आपल्याला व्हायचे नाही हे त्यांनी निश्चित केले होते. अनिल अवचट यांची पुस्तके वाचून आणि गांधी विचारांच्या आकर्षणातून त्यांच्या मनात ज्या प्रकारचे काम करावे असे होते तेच काम त्यांना पीएचडी करताना मिळाले. त्यांचा स्वमदतगट हा विषय फक्त अभ्यासापुरता न ठेवता कृतीतही आणावा हे त्यांनी पक्के ठरवले. ते वेब डिझाईनर आहेत. स्वमदत गटांच्या अधिक जवळ जाण्यासाठी आणि त्यांच्या कामाला उभारी देण्यासाठी वेब डिझायनिंगच्या कामाची सांगड घालायची, स्वमदत गटांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत वेबसाइट करून द्यायची त्यांनी ठरवले आणि त्याप्रमाणे आम्हाला विचारणा केली.आमच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानर एकदा पार्किन्सन मित्र मंडळातील सर्व कार्यकारीणी सदस्यांना ते भेटले.त्यांना काय आणि का करायचे त्यांनी सांगितले.त्यांच्या बोलण्यातील थेटपणा, नेमकेपणा आणि सच्चेपणा, विचारांची स्पष्टता, पारदर्शकता कामाबद्दलची तळमळ याचा सर्व सदस्यांवर प्रभाव पडला. त्यांची वेबसाईटची कल्पना सर्वांनीच उचलून धरली.
आणि आमची वेबसाईट तयार झाली.
२०१४ मध्ये वेबसाईट तयार झाल्यापासून आत्तापर्यंत आम्हाला वेबसाईट साठी १ पैसाही खर्च करावा लागलेला नाही. सुरुवातीला त्यांच्या अनुबंध डॉट कॉम या साइटवर वेबसाईट होती. हळूहळू व्याप वाढल्यावर त्यांनी मंडळाच्या नावाने स्वतंत्रपणे वेबसाईट करून दिली आणि आत्ताचेwww.parkinsonsmitra.org हे नाव पक्के झाले.
वेब डिझायनर, समाजशास्त्राचा अभ्यासक आणि संवेदनशील माणूस या सर्वांचे मिश्रण वेब डिझाईन मध्ये उतरले आणि वेबसाईटला अतुल टच आला. टेक्नॉलॉजीचे विशेष ज्ञान नसलेल्यानाही हाताळायला ती सोपी असावी हा त्यांचा आटापिटा होता. त्यांनी डिझाइन मध्ये वेळोवेळी बदल केले आणि सर्वांसमोर सुधारणा सुचविण्यासाठी ते ठेवले. त्यांच्या मनाचा उमदेपणा मनाला भावणारा होता. या काळात त्यांचे पीएचडीचे काम ऐरणीवर होते. पुणे मुंबई जा ए चालू होती. स्वतःचे सेंट झेवीयर कालेजमधील लेक्चरर म्हणून काम होतेच तरीही ते या कामाशी एकरूप होऊन गेले. मला त्यांना हे काम इतके महत्त्वाचे नाहीये तुमच्या पीएचडीच्या कामाला महत्त्व द्या असे वेळोवेळी सांगावे लागत होते.
अतुलला विविध विषयात रस असल्याने अनुबंध या त्यांच्या साईटवर त्यावरचे लेखन सुरूच असते. संस्कृत, योगशास्त्र, स्वमदतगट, व्यसनमुक्ती, हॉलीवुड, बॉलीवुड वरील लेखन,जी.एं.चे साहित्य इत्यादी त्यांचे आवडीचे विषय. यातील हॉलीवुड, बॉलीवुड वरील लेखन आणि जी.एं.चे साहित्य स्वान्त सुखाय असं म्हणता येईल पण इतर विषयावरील त्यांचे लिखाण सामाजिक भानातून असते. आजूबाजूला घडणार्‍या बर्‍या-वाईट घटनांवरही ते सडेतोड भाष्य करत असतात. विषय विविध असले तरी मन, विचार, कृती यात या सर्वांची एकरूपता दिसते. विचारांचा पाया गांधी विचार हा असतो. त्यांच्या लेखमालेची, लेखांची शीर्षके वाचल्यावरही हे लक्षात येते. ‘गांधी तत्वे आणि व्यसनमुक्ती’ ही लेखमाला ‘व्यसना संदर्भात संस्कृत सुभाषितांचा विचार’, ‘व्यसनमुक्तीसाठी योग,’ ‘सहचरींसाठी योग’ ‘पार्किन्सन्स आणि योग एक सकारात्मक शक्यता’ ही लेखमाला ही काही उदाहणासाठी नावे. याशिवाय ते लिंग्विस्टिक मध्ये एम.ए. करत आहेत. त्यांच्या स्वतःच्या वाडवळी समाजाच्या बोलीवर अभ्यास करत आहेत. ‘योगाभ्यास आणि नैराश्या’ यावर त्यांना अभ्यास करायचा आहे. विचारांच्या मुळाशी जाऊन शोध घेणे हा त्यांचा स्थायीभाव आहे हे सर्व करताना आमची वेबसाईट ते सांभाळतात ते आमच्यासाठी महत्त्वाचे. ते आमच्या परिवारातील एक होऊन गेलेले आहेत.
वेबसाईट सुरु झाली आणि हळूहळू पार्किन्सन्स मित्र मंडळाच्या चेहरामोहराच बदलून गेला. मंडळाच्या उद्दीष्ट पुर्ततेची गती वाढली. अनेकांपर्यंत मंडळ पोहोचले
(क्रमशः)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क