Wednesday, October 2, 2024
Homeपार्किन्सन्सविषयी गप्पापार्किन्सन्सविषयक गप्पा ६१ - शोभनाताई

पार्किन्सन्सविषयक गप्पा ६१ – शोभनाताई

मागच्या गप्पात डॉ. सतीश वळसंगकर यांच्यावर लिहिले होते.या गप्पात त्यांच्या पत्नी भूल तज्ज्ञ( Anesthesiologist ) डॉ.क्षमाताई वळसंगकर यांच्यावर लिहित आहे.शुभंकर, शुभार्थीची ही युनिक जोडी आहे.त्या आमच्या संपर्कात एकदोन वर्षापूर्वी whats app द्वारे आल्या.आणि आमच्यातल्याच होऊन गेल्या.

आमच्या Whats App group चे नाव Parkinsons info & sharing असे आहे.पार्किन्सन्सशिवाय काही बोलायचे नाही असे ठरले होते.पण करोनाचे संकट आल्यापासून थोडी मोकळीक दिली गेली आणि शुभंकर आणि शुभार्थींच्या क्रिएटिवीटीला उधाण आले आहे.गीता पुरंदरे यांची ताजी टवटवीत फुलांची आरास आणि भूल तज्न डॉ.क्षमाताई वळसंगकर यांच्या तितक्याच टवटवीत नित्य नूतन कविता सर्वांची मने प्रफुल्लीत करत असतात.पर्किन्सन्सला थोडे विसरायला लावतात.अनेकाना त्यांच्या कविता वाचून बा.भ.बोरकर,इंदिरा संत,अरुणा ढेरे यांच्या कवितांची आठवण येते..क्षमा ताईंची कविता सखी त्यांच्या कामाच्या व्यापातून त्या आपल्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही हे लक्षात येऊनही स्वस्थ होती आता त्या थोड्या मोकळ्या आहेत म्हटल्यावर ती उफाळून वर आली आणि आता ती पिच्छा सोडत नाही आहे.खरे तर त्यांच्या कविता हा स्वतंत्र लेखाचा विषयआहे.

त्यांची पहिली ओळख झाली ती त्यांनी शेअर केलेल्या ‘दूर चांदण्याच्या गावा’ या अलबम मधून.क्षमाताईंनी लिहिलेल्या गाण्यांना नीरज करंदीकर यांनी स्वरसाज दिला होता.सुरेशजी वाडकर,आर्या आंबेकर आणि प्रियांका बर्वे यांच्यासारख्या वलयांकितांनी गाणी गायली होती.२२ डिसेंबर २०१९ ला याचे सोलापूर येथे प्रकाशन झाले होते.पहिली एन्ट्रीच अशी दमदार झाली होती.नंतर त्यांच्या नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेचे अविष्कार आम्ही आ वासून पाहतच राहिलो.यापूर्वी उधाण हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला होता.आता दुसरा कविता संग्रह बनेल इतक्या कविता तयार आहेत.

अतुल ठाकूरनी तुमच्या कविता वेबसाईटवर टाकल्या तर चालतील का विचारले.त्यावर त्यांनी ‘चालेल ना’ म्हणत लगेच परवानगी दिली. ‘ माझा हेतू फक्त दुसऱ्याच्या आयुष्यात आंनदाचे काही क्षण देता यावे एवढाच आहे.व्यवसायाने मी anesthesiologist असल्याने दुसऱ्याच्या वेदना कमी करणे हे काम मी गेली ४० वर्षे करत आहे.कविता वेबसाईटवर दिल्याने मला आनंदच होईल असे त्यांनी मनमोकळेपणाने सांगितले.आणि त्यांच्याशी फोनवर बोलण्याईतका मोकळेपणा माझ्यातही आला.फोनवर बोलताबोलता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समाजत गेले.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे बाळकडू लहानपणीच मिळाले.छानछोकीपेक्षा वडिलांनी वाचनाची चैन पुरविली.हवी ती पुस्तके विकत आणून दिली.पुण्यात वाचनालयांचीही कमी नव्हती.मराठी हिंदी,इंग्रजी सर्व भाषातील विविध विषयावरची पुस्तके वाचली.व्यक्तिमत्वाची परिपक्वता,सारासार विवेक,मनाचा उमदेपणा,सर्जनशीलता असे आयुष्यभरासाठी पुरणारे पाथेय यातून मिळाले.

एम.बी.बी.एस.झाल्यावर इंटर्नशिप चालू होती आणि डॉ.सतीश वळसंगकर यांच्याशी विवाह झाला.पुरोगामी उदारमतवादी सासरी व्यक्तिमत्व आधीकच उजळले.सासऱ्यांचे हॉस्पिटल होते.गरिबांचे डॉक्टर म्हणून ते ओळखले जात.तेथेच इंटर्नशिप पूर्ण केली.सासऱ्यांनी जर्मन शिकायला लावले.ड्रायव्हिंगही शिकल्या.पुण्यात येवून बीजेमधेच एम.डी.( Anesthesiology ) प्रथम क्रमांकाने पारितोषिकासह केले.आणि स्वत:च्याच हॉस्पिटलमध्ये आणि स्वतंत्रपणेही Practice सुरु केली.

पुण्याहून सोलापूरसारख्या छोट्या गावात गेल्यावर जमवून घेणे त्याना फारसे कठीण गेले नाही.सकाळी पाच वाजल्यापासून दिवस सुरु व्हायचा.रात्री आठपर्यंत शस्त्रक्रिया असायच्या.भूल तज्ञाचे काम किती महत्वाचे असते. ताण प्रचंड असणार.पण हे काम त्यांच्या आवडीचे. मेंदूच्या शस्त्रक्रीयानाही भूल दिली.सोलापूरला असल्याने विविध तर्हेच्या शस्त्रक्रिया हाताळता आल्या.पुण्यात कदाचीत इतका अनुभव मिळाला नसता असे क्षमाताईना वाटते.एकुणात आहे त्या परिस्थितीतून चांगले शोधायचा त्यांचा गुण त्यांच्याशी बोलताना मला जाणवला.

या नियमित कामाबरोबर १९९८ मध्ये ‘इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेशियालॉजिस्टस,सोलापूर’ शाखेचे अध्यक्षपद भूषविले.राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील भूलतज्ञांच्या परिषदेत अभीभाषणे केली.शास्त्रीय निबंध आणि शोध निबंधासाठी प्रथम पारितोषिके मिळवली.स्वत:चे हॉस्पिटल असल्याने व्यवस्थापकीय जबाबदार्या होत्याच. वळसंगकरांच्या घरात या सर्वाला प्रोत्साहनच मिळाले.दीर.पुतण्या,जाऊ,नणंद,मुलगा ,सून सर्वच डॉक्टर.कुटुंब रंगलय वैद्यकीय व्यवसायात असे यांच्याबाबत म्हणता येईल.या सर्वात करियर आणि पैसा यामागे न धावता मिशन म्हणून व्यवसायाकडे पाहिले.हे करताना नाते संबंध, सगेसोयऱ्यांची ये जा,त्यांचे अदारातीथ्य,सणसमारंभ हेही आवडीने सांभाळले.आमची कार्यकारिणी सदस्य सविता ढमढेरे त्यांच्या न्यूरॉलॉजिस्ट दिराना दाखवण्यासाठी सोलापूरला गेली होती.येताना परतीच्या रेल्वे प्रवासात क्षमाताईनी डबा करून दिला. एवढ्या व्यापातून त्यांनी दाखवलेल्या अगत्याचे तिला अप्रूप वाटले होते.त्या, नणंद आणि जाऊ एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेतच पण सुनेच्या वैद्यकीय कर्तुत्वाबद्दल बोलतानाही त्याना किती सांगू किती नको असे होते.

हे सर्व पाहिल्यावर सुखी माणसाचा सदरा यांच्याकडेच मागावा असे वाटेल नाही का? पण तसे नाही.त्यांच्या आयुष्यातही कठीण निर्णय घ्यावे लागलें असतील,अडचणी आल्या असतील पण त्यांचा बाऊ न करता, त्यांनाच कुरवाळत न बसता आनंदाने जगण्याचे मार्ग दोघांनीही शोधले.
डॉक्टरना पर्किन्सन्स झाला तेंव्हा एका प्रतिथयश सर्जनला हाताला कंप सुरु झाल्यावर मानसिक त्रास झालाच असेल. शस्त्रक्रिया करणे करणे बंद केल्यावर त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून शस्त्रक्रिया करणाऱ्या क्षमाताईना निश्चितच त्यांची उणीव जाणवली असेल.हॉस्पिटची बरीच जबाबदारी क्षमा ताईना सांभाळावी लागली असेल.खाजगी हॉस्पिटल सांभाळणे आजचे वैद्यकीय क्षेत्रातले नियम,कायदेकानू ,पेशंटची बदलती मनोवृत्ती,डॉक्टरना मारहाण करण्याच्या घटना पाहता तारेवरची कसरत असते.क्षमा ताई या त्रासदायक बाजूबद्दल न बोलता या व्यवसायाने दिलेल्या आनंदा बद्द्लच बोलतात.

वास्तवाकडे तटस्थतपणाने पाहता आल्याने आलेल्या परिस्थितीनुसार योग्यवेळी योग्य निर्णय त्यांनी सहजपणे घेतले.अद्ययावत अशी नवी हॉस्पिटलची इमारत बांधली होती.१५ वर्षे हॉस्पिटल चालवले.पण वेळ आल्यावर हॉस्पिटल विकण्याचा निर्णयही घेतला. भूलतज्ज्ञ म्हणून त्यांचे काम मात्र चालूच होते.प्रकृती अस्वास्थ्यामुळे एप्रिल २०२० मध्ये काम बंद केले आणि त्यानंतर राहून गेलेल्या छंदाकडे वाट वळवली.यापूर्वीही ६२ व्या वर्षी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते.आता कविता करणे आणि त्या सादर करणे या छंदासाठी त्यांना वेळ मिळू लागलाय.चित्रकलेच छंदही नव्याने डोके वर काढत आहे.
एक शुभंकर म्हणून जबाबदाऱ्या आहेतच.डॉक्टरांचा स्वभाव कामात झोकून देण्याचा.एक डॉक्टर म्हणून आणि पत्नी म्हणून त्यांच्या औषधाच्या वेळा सांभाळण,पार्किन्सन्सला मोनिटर करण्याचे काम करावे लागतेच.डॉक्टरांचा पार्किन्सन्स आटोक्यात राहण्यात त्यांच्या सकारात्मकतेचा वाटा आहे तसा क्षमाताईंच्या बरोबर असण्याचाही आहे.

पार्किन्सन्स मित्रमंडळात त्यांच्या असण्याने आम्हालाही विशेषता मला आधार वाटतो.माझ्या पार्किन्सन्स विषयक विविध लेखातून चुकीची माहिती जात नाही ना अशी मला भीती असते. क्षमाताईंचा त्या डॉक्टर असल्याने यासाठी आधार वाटतो.क्षमा ताई तुम्ही आमच्या ग्रुपसाठी asset आहात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क