Sunday, October 6, 2024
Homeपार्किन्सन्सविषयी गप्पापार्किन्सन्सविषयक गप्पा - ७१ - शोभनाताई

पार्किन्सन्सविषयक गप्पा – ७१ – शोभनाताई

गेले काही दिवस पार्किन्सन्स मित्रमंडळाचा Parkinson info.. हा आमचा Whats app group लग्न घर झाले होते. शुभार्थी उमेश सलगर यांचा मुलगा प्रणव याच्या विवाहाची पूर्व तयारी,खरेदी,फराळ, देवकार्य,हळद असे विधी याची रसभरीत वर्णने आणि फोटो सलगर टाकत होते.त्यांनी स्वत: बनविलेला फराळ,एकट्याने लक्ष्मी रोडला जाऊन बस्ता काढणे, मुलाला आईची उणिव भासू नये म्हणून त्यांची चाललेली धडपड,त्यांनाच जाणवत असलेली पत्नीची उणीव.हे सर्व त्यांच्या पोस्टमधून जाणवत होते.तुम्ही एकटेच पालक नाही आहात तर आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहे.हा ग्रुपवरून जात असलेला मेसेज त्यांचे मनोबल वाढवत होता..सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या..घरचे लग्न असल्यासारखे सर्व जण सलगर यांच्या आनंदात सामील झाले.उत्साहात गोळ्या घ्यायला विसरू नका, तब्येत सांभाळा अशा कळकळीच्या सूचनाही केल्या,आता प्रणव आणि गौरी यांचा विवाह शासकीय नियमांचे पालन करून यथासांग पार पडला त्याचे,लक्ष्मीपुजनाचेही फोटो आले..इतर कोणी असे घरच्या समारंभाचे फोटो आणि वर्णन टाकले असते तर कदाचित विरोध झाला असता.पण सलगर याला अपवाद ठरले.

सलगर नेहमी ग्रुपवर व्हाईस मेसज टाकतात.कंप त्याना टाइप करू देत नाही.त्यांचा साधेपणा,उ मदेपणा,उत्साह,आनंद,टेन्शन सर्व पोचत असते.’भेटू आनंदे’ कार्यक्रमातील त्यांच्या भेटीत तर सगळेच त्यांचे फॅन झाले.त्यामुळेच त्यांना विरोध झाला नसावा.( त्या कार्यक्रमाची लिंक देत आहे ) या निमित्ताने मला एका वेगळ्याच मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधायचे आहे.

सलगर नुकतेच मंडळात सामील झाले होते.त्यांनी आपल्या आजारामुळे मुलाचे लग्न जमण्यात अडचण येईल अशी भीती व्यक्त केली होती..अशा भीतीतून समाजात मिसळणे कमी व्हायला लागते पण तरुण वयात पार्किन्सन्स झालेल्या सलगर यांची नोकरी असल्याने त्यांना बाहेर पडावे लागतच होते.पार्किन्सन्स मित्रमंडळात सामील झाल्यावर मात्र त्यांच्या विचार आचारात खूप बदल झाला.उलट इतरांसाठी ते रोल मॉडेल बनले.ही भीती ही निघून गेली. त्यांनी ‘अनुरुप’ या विवाह जमवणाऱ्या संस्थेमध्ये मुलाचे नाव नोंदवताना त्यांच्या पार्किन्सन्स आजाराबद्दल स्पष्टपणे लिहिले होते असे ते सांगत होते.तरीही अनेक मुली सांगून आल्या.सलगर यांच्यासारखी इतरही उदाहरणे आहेत.

चार पाच दिवसापूर्वी मला एका शुभंकर स्त्रीचा फोन आला.शुभार्थीला आणि त्याना पतीच्या पार्किन्सन्समुळे मुलीचे लग्न जमण्यात समस्या निर्माण होईल असे वाटत होते.त्यामुळे शुभार्थीनी घरगुती कार्यक्रमाना जाणे बंद केले होते.काही ठिकाणी तर मुलांनाच अशी भीती वाटते असे आढळले. शुभार्थीकडे ते आपल्या मार्गातील अडचण म्हणून पाहताना दिसले. अशावेळी शुभार्थीची अवस्था काय होत असेल.याची आपण कल्पना करू शकतो.एकुणात सामाजिक भयगंड निर्माण होण्यात हा मुद्दा मला तसा नवा नव्हता. यापूर्वीही अनेकांनी ही भीती व्यक्त केली होती. पार्किन्सन्स झाल्यावर एका प्राध्यापक असलेल्या शुभार्थीनाही या भयगंडाने पछाडले होते.मुलीला पाहण्यास मुलाकडची मंडळी यायची असली की हे घराजवळच्या बागेत जाऊन बसत.कामासाठी जावे लागले असे सांगावयास सांगत.यथावकाश त्यांच्या उच्च शिक्षित मुलींची उत्तम स्थळे मिळून लग्नेही झाली.अशी भीती बाळगणार्यांची भीती अनाठायी आहे हे सांगण्यासाठी आजच्या गप्पाचा लेखन प्रपंच आहे.प्रणवचा विवाह हे यासाठी निमित्त ठरले.

पार्किन्सन्स हा आजार सर्वसाधारणपणे वृद्धावस्थेत होणारा आजार असल्याने बऱ्याच जणांच्या मुलांचे विवाह पालकाना हा आजार होण्यापूर्वीच झालेली असतात. ज्याना पन्नास साठीच्या आत पार्किन्सन्स होतो त्यांनाच या समस्येला सामोरे जावे लागते किंबहुना ही नसलेली समस्या समस्या बनवली जाते. समाजात आणि आजार झालेली व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयात या आजाराबाबत अज्ञान,गैरसमज असल्याने अशा शंका येत राहातात..माझ्या पूर्वीच्या गप्पात अशा गैरसमजाबाबत लिहिले असल्याने.त्याबाबत येथे लिहित नाही.पार्किन्सन्स झालेल्या शुभार्थींच्या मुलांचे विवाह जमण्यात पार्किन्सन्स अडसर झाला नाही हे अनेक उदाहरणे देवून सांगणे इतकाच मर्यादित हेतू येथे आहे.

आमच्या दोन मुलींची लग्ने माझ्या नवऱ्याला पार्किन्सन्स झाल्यावर झाली.श्रद्धा भावेंनी आपल्या मुलाच्या लग्नाला आम्हाला आवर्जून बोलावले होते.तिला लग्नाची दगदग झेपेल का अशी मला काळजी वाटत होती. पण लाग्नादिवशी तिचा उत्साही,आनंदी चेहरा पाहून छान वाटले.तिचा पार्किन्सन्स त्यादिवशी गायब झाला होता.

मीनल दशपुत्रला लहान वयात पार्किन्सन्स झाला तिचा पार्किन्सन्स वाढला होता.डीबीएस सर्जरी करायचे चालले होते.ही सर्जरी होण्यापूर्वी तिच्या मुलीचा विवाह झाला.त्यानंतर दोन महिन्यातच तिची शस्त्रक्रिया झाली.मुलीच्या सासरच्या लोकांनी नागपूरला दोघेच न राहता मुलीकडे राहण्याचा आग्रह केला आणि हे पती पत्नी दोन महिने.नवपरिणीत जोडप्याकडे राहिले..लग्न जमणे हा अडसर न राहता उलट एक आधार देणारे समंजस कुटुंब जोडले गेले.

ही नमुन्यादाखल उदाहरणे दिली.तेंव्हा नको त्या शंका मनात ठेऊन भयग्रस्त न होता ‘पार्किन्सन्ससह आनंदी जगूया’ हे मंडळाचे ब्रीदवाक्य लक्षात ठेवा आणि असे जगणारे अनेक आहेत त्यांच्या रांगेत सामील व्हा.

https://www.youtube.com/watch?v=P1dMCz2ugLQ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क